Wednesday, 28 March 2012

कटकटींचा 'डेली सोप'

आपल्या रोजच्या त्रासात आणि त्राग्यात भर घालणाऱ्या गोष्टी बहुधा घडतच असतात. आपला दिवस चांगल्या पद्धतीने सुरु होऊ नये याकरता अनेक घटक प्रयत्नशील असतात. सकाळी उठून घरातील कामे हातावेगळी करण्यास सुरवात  करावी एवढ्यात बेल वाजते. 'आज पानी कम है. भरके रखो. कभी भी जा सकता है.' या वॉचमनच्या प्रेमळ सूचनेमुळे आपण मनोमन वैतागतो. दिवसाची नांदी काही चांगली झालेली नसते त्यामुळे पुढील दिवसभरात आणखी काय काय सोसावं लागणार आहे ह्याचं काल्पनिक चित्र आपण रंगवू लागतो. आता स्वयंपाकाऐवजी पाणी भरण्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं.  
आपल्याला घरातील कामे उरकून बाहेर जायचे असते. आपण थोड्या घाईनेच वॉशिंग मशीन लावतो. पाणी, साबण आणि कपडे अशी जय्यत तयारी करून आपण दुसरे एखादे काम करावयास जातो. परत येऊन बघतो तो वॉशिंग मशीन फिरण्याच्या मूड मध्ये नसतेच मुळी! आतील कपडे स्वच्छ होण्यासाठी केव्हाचे आसुसलेले असतात. वॉशिंग मशिनच्या आतील यंत्रणेचे फिरणे, न फिरणे आपल्या ज्ञानकक्षेत येत नसल्याकारणाने ते दुरुस्त करणाऱ्या माणसाला पाचारण करावे लागणार असते. आपले बाहेर जाण्याचे मनसुबे विस्कटून जातात.  
यू.एसला स्थायिक झालेल्या मैत्रिणीची मेल आलेली असते. तिला रिप्लाय देण्यासाठी आपण उत्सुकतेने बसतो आणि तत्क्षणी घरातील वीज गायब होते. इन्व्हरटर नामक उपकरणाने दुरुस्त न होण्याचा विडा उचललेला असतो त्यामुळे वीज महामंडळाने कृपा केल्याखेरीज आपण आपल्या मैत्रिणीला मेल लिहिण्यास असमर्थ असतो. 
आपण जामानिमा करून लग्नाला निघालेले असतो. मुहूर्ताची वेळ नीट वाचून त्यानुसारच आपण घरातून निघालेलो असतो. लग्नाचा हॉल रेल्वे स्टेशनच्या जवळ नसल्याने आपण वातानुकुलीत बसने जाण्याचे ठरवतो. आपण अधिरतेने त्या इच्छित बसची वाट पाहू लागतो. 'शायद आज बस नाही है ' अशा आजूबाजूच्या शेऱ्यांना न जुमानता आपण वाट बघण्याचं महत्कार्य सुरु ठेवतो. हळूहळू संयम आणि विवेक आपली साथ देईनासे होतात. आपल्या कपाळावर आठ्यांचे जाळे हातपाय पसरू लागते. डोक्यावरचे ऊन जास्तच त्रास देऊ लागते. 'कुठल्या मुहूर्तावर ही शिंची बस येणार आहे कोण जाणे! जीव नुसता उबून चाललाय. कटकट झालीय नसती. एव्हाना सगळेजण आपली वाट पाहत असतील. सगळं शरीर नुसतं घामेजून गेलंय. मेरुने जावे का?  नको ते केवढ्याला पडेल आपल्याला. सगळं पुढचं बजेट अपसेट होईल. अजून या महिन्यात तीन लग्ने आहेतच. शिवाय कृपया आहेर आणू नये असं एकाही पत्रिकेवर लिहिलेले नाही. काय मेलं नशीब आहे आपलं!' हा संवाद काहीवेळ असाच चालू राहतो. आपल्या धुसफुसण्यावर इलाज म्हणून आरामात बस येते. आणि मुहूर्ताच्या नाही पण जेवणाच्या तयारीने आपण बसमध्ये एकदाचे चढतो. 
आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीहून घरी परतायचे असते. रात्रीचे बारा वाजलेले असतात. चांगलाच उशीर झाल्यामुळे वाहन मिळेल का ही काळजी सतावत असते. बरोबरची मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी असतात. बाहेर कुणाकुणाच्या गाड्या निघू लागतात. शास्त्रीनगर, बोरीवली  कुणाला सोडायचे आहे का? आपण आनंदात भरधाव धावतो. कारमध्ये विसावतो. ओळख जुजबी असली तरी आयतीच सोय झाल्यामुळे आपण भलत्याच खुशीत असतो. आपले घर येते आणि 'thank you ' चा उपचार पार पडून आपण कारमधून उतरतो. कारमधील माणसांच्या नजरा जरा वेगळ्याच वाटतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून घराची बेल वाजवतो. घरात प्रवेश केल्यानंतर चपला ठेवण्यासाठी म्हणून आपण जातो आणि आपल्या लक्षात येते की आपण पादत्राणे न घालताच इथवर आलो आहे. आता कारमधील लोकांच्या नजरांचा उलगडा आपल्याला होतो आणि आपण खूप ओशाळतो. आपल्याला गाडीत बसण्याची एवढी घाई झाली होती की आपल्याला चपला घालायचेही भान राहिले नाही ह्या विचाराने आपण अर्धमेले होतो. एवढ्या लांब यजमानांकडे जाऊन चपला आणणे आपल्याला कसेसेच वाटते. परिणामी ओशाळेपणाची भावना मनात घेऊन आपण नव्या चपला घ्यायला जातो. 
आपल्याकडे पाहुणे आलेले असतात. त्यांची सरबराई करण्यात आपण मग्न असतो. गप्पाही रंगलेल्या असतात. इतक्यात दारावरची बेल वाजते. दारात सेल्सवूमन उभी असते. आपण दार जरुरीपुरतेच उघडल्याने तिला आतील चित्र स्पष्ट झालेले नसते. तिच्या हातात महिन्याकाठी स्त्रियांना लागणारे आवश्यक असे सामान असते. आपण तिला 'मला काही नको' असे सांगायच्या आतच तिची वाणी पाणलोटासारखी धबाधबा आदळू  लागते. तुम्ही कोणता ब्रांड वापरता? हा तिच्या टिपेच्या स्वरातील प्रश्न पाहुणेमंडळींनी न ऐकल्याची शक्यता फारच कमी असते. आपली परिस्थिती एकदम विचित्र होते. आपण तिला डोळ्यांनी, खाणाखुणा करून, टळ बाई एकदाची असे सुचवीत असतो. पण तिला आपले नाव, फोन नंबर आणि आपण वापरतो तो ब्रांड सावकाशीने टिपून घेण्यात भलताच आनंद असतो. आपला वेळ आणि आपल्या अब्रूचे खोबरे झाल्यावर तिचा आत्मा शांत होतो आणि तिचे चालतेबोलते संकट पुढील घरावर आदळते. आपण दरवाजा बंद करून जमेल एवढ्या जलदगतीने आत जातो आणि त्या आगाऊ विक्रेतीचा मनोमन उद्धार करतो.  
आपण महत्वाच्या कामासाठी निघालेले असतो. तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये आपण स्वत:ला झोकून दिलेले असते. भाजीवाले, फेरीवाले, तृतीयपंथी, भिकारी यांच्या भाऊगर्दीतून मार्ग काढत आपण कसेबसे आतमध्ये सुरक्षित उभे राहण्याचा प्रयास करत असतो. लोकलमध्ये परफ्युम, घाम, भाज्या, सोललेली संत्री आणि बटाटेवडा यांचा संमिश्र दरवळ पसरलेला असतो. बऱ्याचदा प्रचंड गर्दीमुळे बगळ्यासारखी एका पायावर उभे राहण्याची सर्कसही आपल्याला करावी लागते. आतमध्ये सीटवरून भांडणांना उत आलेला असतो. एकमेकांची आयमाय उद्धारल्याशिवाय भांडणाऱ्या बायकांना चैन पडत नाही. अशावेळी इयरफोन कानात खुपसून बसलेल्या भाग्यवान असतात. एवढ्यात एकाच कल्लोळ होतो आणि काही समजायच्या आतच  आपल्या अंगावर आंबट वासाचे काही शिंतोडे उडाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. आपल्याला तसूभरही हलता येत नाही. संतापाने आपल्याला रडावेसे वाटू लागते. अंगावरची वस्त्रे भिरकावून द्यावीशी वाटू लागतात. पुढील काही स्टेशने नाकाला रुमाल धरून, अपमानित स्थितीत आपण काढतो. स्टेशनावर उतरल्यानंतर वेटिंग रुममध्ये जाऊन जमेल तितके स्वत:ला पाण्याने पुसून घेतो आणि रडवेला झालेला आपला चेहरा सावरण्याचा प्रयत्न करत कामाच्या जागी कूच करतो.
टी.व्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर डेली मालिकांचा रतीब सुरु असतो.  प्रत्येक मालिकेला नाके मुरडत आपण ती पाहत असतो. तिला नावे ठेवता ठेवता तिच्यात गुंतत असतो. महत्वाचा प्रसंग सुरु असतो. उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. काय होणार या प्रश्नाने डोक्याचा भुगा व्हायला लागलेला असतो. या क्षणी आपण आणि ती मालिका या व्यतिरिक्त इतर गोष्टींचे आपले भान हरवलेले असते. मालिकेतील दरवाज्याचे दार उघडते आणि नायिकेच्या भयभीत चेहऱ्यावर फोकस विसावतो. आपण हातातली उशी घट्ट धरतो. तेवढ्यात मोबाईल वाजतो आणि आपली साधना भंग होते. मैत्रिणीचा फोन असतो. आपली चिडचिड होते.घरचे यावेळी आपल्याला डिस्टर्ब  करणार नाहीत अशी आपल्याला खात्री असते. एका मिनिटाचा ब्रेक होतो. आपण मैत्रिणीला SMS करतो की 'very busy at the moment & will call you back'. ब्रेक संपतो आणि आपण पुन्हा त्या मालिकेच्या अवकाशात रुजू होतो.  

No comments:

Post a Comment