तुम्ही थोटे-पांगळे-आंधळे-बहिरे-मुके यांपैकी कोणत्याही व्यंगाची कवचकुंडले घेऊन निपजला नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुम्ही अशिक्षित, असंस्कृत आई-वडिलांच्या पोटी जन्माला येण्याचे पुण्य केले नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुमचे शैशव आणि तारुण्य अभ्यासाची अवास्तव कटकट मागे न लागता व्यतीत झाले असेल आणि तुम्ही आत्मघाताचा विचार करावा अशी परिस्थिती तुमच्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसांनी निर्माण केली नसेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांव्यातिरिक्त इतर वैयक्तिक गरजांचीही पूर्तता विनासायास झाली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
कडाक्याच्या थंडीत किंवा धो धो पावसात तुम्हाला भल्या पहाटे घरोघरी पेपर आणि दुध टाकायला जायला लागलं नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून पैसे कमवायची पाळी तुमच्यावर आली नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुम्हाला मणामणाची ओझी पाठीची हाडे खिळखिळी होईपर्यंत कधी वाहायला लागली नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.
पाचवीला पुजलेला आजार आणि आजारी माणसे यांनी तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जर बिछाना अडवला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
शिळीपाकी भाकरी, आंबूस वरण किंवा अशा अन्य खराब झालेल्या अन्नपदार्थांनी तुमची थाळी कधी सजवली गेली नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
दुपारच्या रणरणत्या उन्हात घामाने थबथबून, घशाला कोरड पडल्याने कासावीस होत जर सेल्समन, पोस्टमनची कामे तुम्ही केली नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.
ब्रोंकोग्राफी करायला गेलेला तुमच्या घरातील धडधाकट मनुष्य डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे संवेदनाशून्य होऊन स्ट्रेचरवरून परत आला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुमच्या घरातील एखादा सदस्य 'स्वाईन फ्लू' सारख्या सार्वजनिक साथीचा बळी ठरला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
लोकलच्या जीवघेण्या गर्दीत आपले शरीर रोज अपरिहार्यपणे गलितगात्र होणाऱ्यांच्या यादीत जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
कुठेही, कधीही होणाऱ्या बॉम्बस्फोटात किंवा एखाद्या राष्ट्रीय आपत्तीत जर तुम्ही किंवा तुमचे जिवलग कधी सापडले नसतील तर तुम्ही भाग्यवान आहात.
सार्वजनिक ठिकाणी देवदर्शन घेण्यासाठी उभे असता चेंगराचेंगरी होऊन देवाज्ञा होण्याचा बिकट प्रसंग जर तुमच्या निकटवर्तीयांवर ओढवला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
शंभर फुट दरीत बस कोसळून तुमच्या अंगावर एकही ओरखडा उमटला नसेल तर तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात.
तुमचे विमानाचे तिकीट आयत्या वेळेस चरफडत रद्द करायला लागून आणि नंतर त्याच विमानाचा टेक ऑफ करताना झालेला अपघात पाहून त्यामागची परमेश्वरी योजना जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तुमचे घर जर उघड्या नाल्यापाशी, गटारापाशी, कचऱ्याच्या मोठ्या ढिगापाशी, घोंघावणाऱ्या माशांच्या, डासांच्या, घुशींच्या सानिध्यात नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
दारूच्या, सिगारेटच्या, अंमली पदार्थांच्या व्यसनापायी तुमच्या अब्रूचे आणि पैशांचे खोबरे करणारे कारटे जर तुमच्या घरात निपजले नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
सतत अर्वाच्य, अश्लाघ्य बोलून तुमचा आणि तुमच्या घरच्यांचा पाणउतारा करणारा नवरा तुम्हाला लाभला नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
घरच्यांनी केलेल्या शैक्षणिक संस्कारांना पायदळी तुडवून ड्रायव्हर,चपराशी, प्लंबर, नोकर यांच्याबरोबर पळून गेलेली कारटी जर तुमच्या घरातली नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
गणितातल्या आकड्यांपेक्षा मटक्यातल्या आकड्यांवर विलक्षण श्रद्धा असणारे मूल जर तुमच्या हाडामांसाचा भाग नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
सासर नामक नरकात अनन्वित यातना निमुटपणे सहन करत खितपत पडलेली मुलगी जर तुमची नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
देवाचे श्लोक लिहिलेल्या कागदात तंबाखू भरून, तो पेटवून त्यांचा लुथ्फ घेणारी अवलाद जर तुमची नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
तरुण मुलाला त्याच्या मानसिक असंतुलनामुळे घरातील खाटेला बांधून ठेवणारे आई-वडील जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
भाईगिरी, लाचखोरी यांमुळे दुर्लौकिक कमावलेला कोणी गुंड-पुंड हा तुमच्या पोटाचा गोळा नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
जनतेला अन्न-धान्य पुरवून स्वत:ला मात्र अन्नाअभावी, कर्जफेडीसाठी लागणाऱ्या पैशाअभावी स्वत:ला फासाला टांगून घ्यायची पाळी येणारे शेतकरी जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
दुसऱ्यांना घरे बांधून देण्यासाठी आयुष्य झिजवताना स्वत: मात्र कायम बेघर असणाऱ्यांपैकी जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
खोडी काढली म्हणून शिक्षकाकडून मरेस्तोवर मार खाणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक जर तुम्ही नसाल तर तुम्ही भाग्यवान आहात.
देहाने मरण्याआधीच शतदा मरणे मरणाऱ्यांच्या नामावलीत तुमचे नाव लिहिण्यास जर विधाता विसरला असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात.
No comments:
Post a Comment