Sunday, 11 March 2012

ब्रेन प्रोग्रामिंग

नुकतंच मी डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं 'ब्रेन प्रोग्रामिंग' अशा शीर्षकाचे पुस्तक वाचले. अतिशय साध्या, सोप्या शैलीत त्यांनी काही मुद्दे मांडून सकारात्मक ( positive) आणि नकारात्मक (negative) अशा परस्परविरोधी ब्रेन प्रोग्रामिंगविषयी  सविस्तर चर्चा केली आहे. अनेकांना हे पुस्तक उदबोधक ठरेल यात शंका नाही. ही बहुमूल्य माहिती पुस्तकाव्दारे दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! 
आपण जन्मल्यापासून ते वार्धक्यापर्यंत घरातील माणसांचा, इतर नातलगांचा, शेजाऱ्यांचा, ओळखीच्यांचा, मित्र- मैत्रिणींचा सामाजिक आणि राजकीय घटकांचा, बाह्य घडामोडींचा आपल्यावर चांगला वा वाईट परिणाम होत असतो.  आपल्या संपर्कात आलेली माणसे आपल्याला आपल्याविषयी काही विशिष्ट प्रतिमा ( image ) देत असतात. काही वेळेस ह्या प्रतिमा सकारात्मक असतात तर काही वेळेस नकारात्मक! उदा. आई अनेक वेळा तिच्या दोन मुलांमध्ये त्यांच्या बाह्य रूपावरून किंवा तिला जाणवलेल्या गोष्टींवरून फरक करते. हा काळा तो गोरा किंवा हा उंच तो बुटका किंवा हा जाड तो बारीक किंवा हा हुशार तो मठ्ठ याप्रमाणे. आईकडून या भावना व्यक्त होतात आणि मुले ह्या तिने दिलेल्या प्रतिमा स्वीकारतात.  सकारात्मक प्रतिमा मुलांचे मनोबल उंचावतात तर नकारात्मक प्रतिमा स्वीकारल्यामुळे मुलांचे मनोबल खचते. आपण काळे आहोत अथवा बुटके आहोत अथवा जाडे आहोत किंवा मठ्ठ आहोत ही आईची आपल्याबद्दलची मते अंतर्मनात खोलवर रुतून बसतात आणि आपल्याला स्वत:विषयी घृणा उत्पन्न होते. घरचे किंवा समाज आपल्याला स्वीकारतो ही त्यांची मेहेरबानीच आहे असे आपल्याला प्रकर्षाने वाटू लागते. आपण अभ्यासात (इतरांच्या म्हणण्यानुसार) मठ्ठ आहोत म्हणजे आपण कुचकामी आहोत हा विचार आपल्या आत्मविश्वासावरच थेट आघात करतो. परिणामी न्यूनगंडाची भावना आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकते आणि आपले व्यक्तित्व झाकोळले जाते. 
खरं म्हणजे आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो हे निर्विवाद सत्य आहे. आपल्याला घडवणारे आपणच आणि  बिघडवणारेही आपणच असतो. वडील रोज दारू ढोसतात म्हणून तेवढेच योग्य समजून एक मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दारुडा होतो आणि दुसरा या पित्यासारखं कसं व्हायचं नाही यासाठी अमाप प्रयत्न करून एक यशस्वी उद्योजक होतो. एकाच वातावरणात दोघेही वाढलेले पण दोघांच्या अंतर्मनात स्त्रवणारे विचार मात्र सर्वस्वी भिन्न!  आपल्या पुढील पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे आपली त्याकडे बघायची दृष्टी ठरवत असते. आयुष्यातील आव्हानांना संकटं म्हणून घाबरायचे की यशाप्रत नेणारा खडतर मार्ग म्हणून त्यांना सामोरे जायचे ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो. आव्हाने पेलण्याची ताकद ही मनात असावी लागते आणि मन अशा आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास उद्युक्त व्हावे लागते. यासाठी योग्य ते ब्रेन प्रोग्रामिंग व्हावे लागते. 
शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींकडे आपण आदराने बघतो, त्यांचे गुणगान करतो प्रसंगी त्यांचा हेवाही करतो. आपल्याला हे जमणार नाही अशी एक न्यूनत्वाची भावना त्यांच्याकडे बघताना आपण करून घेतलेली असते. परंतु हे यशाचे शिखर सर करताना त्यांनाही कैकदा प्रतिकूलतेशी झुंजावे लागलेले असते. समाजाचा रोष सहन करावा लागलेला असतो. कौटुंबिक निंदा सहन करावी लागलेली असते. वाटेत येणारे, थकवणारे, वाकवणारे धोंडे, काटेकुटे स्व-प्रयत्नांनी दूर सारावे लागलेले असतात.  यश हे कुणालाच सहजसाध्य नसते. प्रथम ते मिळवण्यासाठी आणि नंतर ते टिकवण्यासाठी खूप प्रयास करावे लागतात.  माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग लाख घ्याल पण त्याआधी मनातील माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत कराल की नाही? शिखर सर करण्यासाठी उपयोगी अवजारे जवळ आहेत पण मनातील सकारात्मक अवजार जर योग्य वेळी परजल गेलं नाही तर काय उपयोग? बाह्य लढाई जिंकण्याआधी ती लढाई मनातून जिंकणे अति-आवश्यक आहे. 
अनेक वेळा चुकीच्या ब्रेन प्रोग्रामिंगमुळे  आपण चांगली संधी गमावून बसतो. एक उच्चशिक्षित , चांगल्या स्वभावाचा तरुण मुलगी बघायला येतो. मुलीला मात्र काळी, बुटकी, नाकात गेलेली अशी अनेक लेबलं इतरांनी लावलेली असतात. कसं व्हायचं हिचं? हिच्याशी लग्न कोण करणार? असे प्रश्न ती घरच्यांच्या डोळ्यांत बघत आलेली असते. हीच नकारात्मक प्रतिमा ती सातत्याने स्वत:ला देत आलेली असते. वास्तविक पाहता ती अभ्यासात हुशार असते. चांगली शिकलेलीही असते परंतु तिच्या बाह्यरूपावरून इतरांनी तिला दिलेली प्रतिमा तिने स्वीकारल्यामुळे तिचा आत्मविश्वास हरवलेला असतो. तिच्या मनातील न्यूनगंडाची भावना प्रबळ होते आणि हा आलेला मुलगाही आपल्याकडे त्याच नजरेने बघेल या भीतीने ती बाहेर येत नाही आणि  आयुष्यातील एक संधी ती मनातून हरते. 
आपण स्वत:ला आनंदाच्या लहरींवर तरंगत ठेवायचं की दु:खाच्या खाईत लोटायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. प्रत्येकाची स्वत:ची बलस्थानं असतात, कमतरता असतात. प्रयत्न असा झाला पाहिजे की तुमच्या उणीवा अग्रभागी राहणार नाहीत. आपल्या मनाचं सारथ्य आपल्याला कुशलतेने करता यायला हवं. नकारात्मक विचारांचे अवजड धोंडे प्रयत्नपूर्वक बाजूला सारून आपला रथ आपल्याला इप्सिताच्या दिशेने कूच करता यायला हवा. तेव्हाच अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म अचूक ब्रेन प्रोग्रामिंगची कास धरून आपण निश्चितच सार्थकी लावू शकतो. 

No comments:

Post a Comment