'शास्त्र हे वरदान की शाप?' अशा विषयाचा एक निबंध आम्हाला शाळेत बहुतेक वेळा लिहिण्यासाठी यायचा. आमच्या बालमनांना शास्त्राला शाप का म्हणायचं हे कळत नव्हतं म्हणा किंवा त्याची प्रचीती आली नव्हती. आज मात्र पावलोपावली अशा अत्याधुनिकतेचा साज चढवलेल्या या शास्त्राला 'शाप' असे म्हणण्याची पाळी अनेक लोकांनी आणली आहे.
देशहितरक्षणार्थ वापरली जाणारी आयुधे समाजकंटक सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी, एखाद्याला संपवण्यासाठी सर्रास वापरतात आणि हे शास्त्र सामान्यजनांसाठी तापदायक ठरते. तलवारी आणि पिस्तुलांची दहशत ही उघड असते पण आजकाल 'मोबाईल' नामक अस्त्राची छुपी दहशत निर्माण झाली आहे. अनेकदा आपण रिक्षात बसतो. रिक्षाचालकाचा मोबाईल वाजतो आणि माणसांच्या आणि वाहनांच्या जबरदस्त गर्दीतून रिक्षा हाकत हाकत त्याचं ते मोबाईलवरील अनावश्यक संभाषण आपल्याला जीव मुठीत धरून ऐकावं लागतं. जागोजागी रस्त्यांची कामे चालू असतात. ओव्हरहेड ब्रिजची बांधकामे चालू असतात. बऱ्याच ठिकाणी 'ट्राफिक पोलीस' नावाची चालतीबोलती संस्था दृष्टोत्पत्तीस पडत नाही. त्यामुळे वाहनांची एकमेकांच्या पुढे जाण्याची शर्यत लागलेली असते. या जीवघेण्या सर्कशीतून आपल्याला इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी त्या रिक्षाचालकाची असते. एखाद्या टर्निंगवर समोरून वाहन सुसाट वेगाने येत असतं. आपल्या मनात नाही नाही ते वाईट विचार येत राहतात. केवळ आपलं नशीब बलवत्तर असल्यामुळे 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा आपल्याला प्रत्यय येतो. रिक्षा चालवताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे हे त्याला रिक्षेतून उतरताना सांगण्याचं धारिष्ट्य आपण करतो तेव्हा लगेचच तुम्हाला सहीसलामत पोहोचवलं ना मग खालीपिली कीटकीट करू नका असा त्या रिक्षावाल्याचा उद्दाम शेरा ऐकावा लागतो. एकदा पुणे-मुंबई व्होल्व्होचा बसचालक सुद्धा बस सुटल्यापासून मोबाईलवर बोलत होता . अनेक वेळा मनात आले की त्याला सांगावे अरे बाबा तुला गप्पा मारायची इतकी लहर आली असेल तर बस थांबव आणि पोटभर बोलून घे पण आम्हा बस-प्रवाशांचा जीव असा टांगणीला लावू नकोस. पण मजा म्हणजे बसमधील इतर प्रवासी त्याच्या या मोबाईलसूक्ताला काहीच हरकत घेत नव्हते जणू काही आम्ही आमचा जीव तुझ्या हवाली केला आहे तेव्हा तारायाचे असेल तर तार किंवा मार!
आपण रस्त्यावर महानगरपालिकेने न बुजवलेले खड्डे चुकवत चालत असतो. रस्त्यावर लहान मुले, म्हातारेकोतारे, अपंग, आजारी असे अनेकजण चालत असतात. आपल्या समोरून वायुवेगाने एखादी बाईक येत असते. बाईकस्वार मोबाईलवर बोलण्यात गुंग असतो. आजूबाजूच्या पादचारयांकडे त्याचे यत्किंचितही लक्ष नसते. तो मोबाईलवर हास्याचे फवारे उडवण्यात बिझी असतो. त्या बाईकखाली येता येता एक मुल कसेबसे वाचते. लोक गोळा होतात आणि बाईकवाल्याची यथेच्छ धुलाई होते. त्याचा मोबाईल अध्याय तिथे तेवढ्यापुरता तरी संपतो. पण भविष्यात असे अपघात घडणारच नाहीत याची हमी कोण देऊ शकतं? आपली काहीही चूक नसतानादेखील आपल्याला हे वाहनचालक अपघाताची शिक्षा देण्यास पूर्णपणे समर्थ असतात. शासन कितीही कायदे करुदे पण रस्त्यारस्त्यात, गल्लीबोळांत मोबाईलवर बोलत सुसाट वाहने हाकणाऱ्या ह्या बेजाबदार चालकांना पोलीस यंत्रणा कुठे पुरी पडू शकणार ? ही आधुनिकतेच्या आहारी जाऊन स्वेच्छेने बहिरी झालेली एक जमात आहे जी भविष्यातील अनेक अपघातांची जनक होऊ शकते.
आजच पेपरात वाचलं की गुगल बाजारात असे काही भन्नाट गॉगल आणणार आहे की ते डोळ्यांवर चढवताक्षणी त्यावर अनेक गोष्टी दिसू लागतील. अचूक पत्ता शोधता येईल. गाणी ऐकता येतील. एक ना दोन! म्हणजे एक संकट कमी होतं म्हणून की काय त्याच्या जोडीला हे नवीन संकट येऊन ठाकले आहे. कानात इयरफोन्स, डोळ्यांवर गॉगल म्हणजे कान असून बहिरे नी डोळे असून आंधळे अशी अवस्था युवा पिढीची होणार नव्हे सर्वांचीच होणार. ही म्हणजे अपघाताच्या जगातील क्रांतीच असेल. रस्त्यावरून चालायची भीती, वाहनांत बसायची भीती अशी स्थिती सामान्य डोळसांची होणार. जर बहुसंख्य लोक स्व-इच्छेने बहिरे आणि आंधळे होणार असतील तर जे असे बहिरे नाहीत त्यांना आणि डोळसांनाच जागरूक राहावे लागणार आहे. 'रात्र वैऱ्याची आहे' हा वाक्प्रचार बदलून आता 'दिवस बहिऱ्या व आंधळ्यांचे आहेत' असा नवा वाक्प्रचार रूढ करावा लागणार आहे. मुलांनी परीक्षेला जाताना बहिऱ्या आणि आंधळ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांत अथवा अशा लोकांच्या वाहनांत बसून प्रवास करू नये अशी एक कळकळीची सूचना इतर सूचनांच्याबरोबर द्यावी लागणार आहे. गॉगल लावलेल्या एखाद्या माणसाला समोरचं काही नीट दिसतंय का याची शहानिशा करावी लागेल. काही वेळा तर असंही वाटू शकेल की एकवेळ दारूची नशा परवडली पण ही अशी झिंग नको ज्यामुळे आपल्या जाणीवा तर हरपतीलच पण इतरांच्या जाणीवा शाबूत ठेवण्याचे भान आपल्याला राहणार नाही.
शेवटी शास्त्र हे वरदान की शाप हे ज्याचं त्याने अनुभवांती ठरवावे आणि किमान तो शाप ठरणार नाही ह्याची वैयक्तिक खबरदारी घ्यावी.
No comments:
Post a Comment