आम्ही मराठी भाषिक आहोत असे अभिमानाने सांगणारे आज संख्येने फार मोजके आहेत. मराठी भाषेला जो मुलायम साज संत ज्ञानेश्वरांनी दिला, त्याच मराठी भाषेला स्वत:च्याच मातीत उपेक्षिताचे जिणे जगावे लागते आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आज अनेक मराठी घरांतून मराठी अभावानेच बोललं जातं. याचं एक कारण असं असावं की आपण मराठी बोललो तर चारचौघांत आपल्याला कमी लेखतील अशी भीती युवा पिढीला असावी. मराठीऐवजी इंग्रजी बोलल्यास 'इम्प्रेशन' पडतं हा ही एक फोफावलेला गैरसमज आहे. आपल्या आईवर प्रेम करायला कुणी शिकवायला लागत नाही आणि आईवरील प्रेम हे कमीपणाचे लक्षणही मानले जात नाही मग मातृभाषेवर प्रेम करणे हा काय जागतिक गुन्हा समजला जातो का?
अनेक चांगल्या समजल्या जाणाऱ्या शाळांमधून मराठी भाषेविषयी फारशी आस्था आढळून येत नाही. मराठी लिहिताना होणाऱ्या व्याकरणिक चुका दाखवण्याबद्दल बरेच शिक्षक उदासीन असतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी हा विषय सक्तीचा असल्याने मराठी भाषिक असलेली आणि नसलेली मुले योग्य मार्गदर्शना अभावी भाषेचे लचके तोडताना दिसतात. र्हस्व, दीर्घ, आकार,उकार,काना,मात्रा,वेलांट्या या भाषांतर्गत व्याकरणाच्या भानगडी इंग्रजी भाषेत नसल्याने मायमराठीपेक्षा मुलांना इंग्रजी जवळची वाटू लागते. मराठीतून निबंध लिहिणे म्हणजे शिक्षा असा मुलांचा समज होतो. मुळात या भाषेची महती, या भाषेचे सौंदर्य मुलांना पटवून देण्यात घरी पालक आणि शाळेत शिक्षक कमी पडतात. एखाद्या कथेचा अगर कवितेचा आस्वाद घेणे तर लांबच पण साधे अंक,वाऱ,सण सुद्धा मराठीतून माहित नसावेत आणि तेही मराठी घरांतील मुलांना ह्याला काय म्हणावे?
हिरवे हिरवे गार गालिचे- हरित तृणांच्या मखमालीचे किंवा श्रावणमासी हर्ष मानसी किंवा एक तुतारी द्या मज आणून या काव्यांमधील सौंदर्याचे दर्शन आणि आनंदाची अनुभूती मुलांना कशी येणार? कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, बालकवी, केशवसुत, केशवकुमार हे कधीतरी एखाद्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातून डोकावतात एवढेच! एरवी या समस्त कवीजनांचा आणि युवा पिढीचा दुरदूरचाही संबंध नाही. व्हॉट इज श्रावण? असे विचारणारी मराठी मुले आहेत. आता श्रावण म्हणजे काय माहित नाही, श्रावणातील निसर्ग कसा दिसतो ते माहित नाही तर श्रावणावरील कविता काय कप्पाळ कळणार?
सोमवार, मंगळवार म्हणजे इंग्रजीत कुठला डे किंवा अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास म्हणजे इंग्रजीत कुठला नंबर हे न समजणारी खूप मराठी मुले आहेत. 'यू नो, माय सन स्पीक्स ओन्ली इंग्लिश' असं एक मराठी आई तिच्या मराठी मैत्रिणीला तोंडावर सांगून आपला भाव वधारवत असते. हळूहळू घरातलं हे अ-मराठी कल्चर मुलांच्या चांगलंच अंगवळणी पडतं आणि मग मराठी वाचन, मराठी गाणी, मराठी गोष्टी, मराठी संवाद या गोष्टींची आणि या मुलांची कायमची ताटातूट होते. 'चांदोबा', 'किशोर' वाचणारी मुलं 'डाऊन मार्केट' वाटायला लागतात. आजकाल बऱ्याच मराठी घरांत सातत्याने परदेशवाऱ्या करणारी माणसे असतात. ती हे इंग्रजीचं वारं घरात खेळतं ठेवायला मदत करतात.
आपल्या भावना आपल्या मातृभाषेतून व्यक्त करण्यातील महत्व अनेकांना समजलेलंच नसतं. पाश्चात्य देशांतील अनेक अभ्यासू, भारतात येथील संस्कृतीचा, परंपरांचा, भाषेचा, संत-साहित्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी येत असतात पण आपल्याच लोकांना मात्र या भाषेचा, साहित्याचा गंधही नसतो. टाळ-मृदुंगांच्या गजरात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याविषयी पाश्चात्यांना कुतूहल असते. संत-साहित्यावर पी एच डी करणाऱ्या एका परदेशी विदुषीने टी.व्ही.वर एकदा 'पसायदान' म्हटल्याचे मला आठवते. मी एम.ए. ची परीक्षा देत असताना ' ३० मार्कांचे ज्ञानेश्वर, २० मार्कांचे तुकाराम आणि ४० मार्कांचे नाटककार देवल मी तयार ठेवले आहेत' असे काही परीक्षार्थींचे मौलिक विचार माझ्या कानावर पडले होते. केवढा हा विरोधाभास!
फर्ड इंग्रजी बोलणारा माणूस तेवढा हुशार मग अस्खलित मराठी बोलणारा माणूस काय मद्दड असतो? भाषा कुठलीही असो, ती उत्तम बोलता यायला हवी, प्रत्येक भाषेची इज्जत करायला हवी याबद्दल दुमत नाही पण आपल्या आईला बाजूला सारून दूरच्या आत्याला तिच्या जागी बसवण्याचा अट्टाहास का? जिथे आवश्यक आहे तिथे ती भाषा जरूर बोलली गेली पाहिजे. पण घरी ताटावर बसल्यावर तरी 'भात' वाढ म्हणाल की 'राईसच' म्हणणार? 'माझ्या आईच्या हातच्या थालीपीठाची सर कश्या कश्यालाही नाही' या वाक्याचा जसाच्या तसा इंग्रजी अनुवाद करून दाखवावा असे आव्हान पुलंनी त्यांच्या पुस्तकातून दिले होते. तात्पर्य काय तर प्रत्येक भाषेची गोडी ही वेगळीच असते. 'थंडीने गुलाब सुकत आहे' हे भाषांतरित वाक्य ती मजा ,तो लुत्थ्फ आणू शकत नाही. प्रत्येक भाषेची नजाकत, नखरा, ऐट ही वेगळीच असते. कुठलीही भाषा आवडणे, न आवडणे ही वैयक्तिक बाब जरी असली तरी मराठी मातीत जन्माला येऊन मराठी भाषेचे बोट सोडून देणे हे करंटेपणाचेच लक्षण आहे.
या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर पुन्हा एकदा जन्माला यावेत असे मला मनोमन वाटते.

No comments:
Post a Comment