Monday, 9 April 2012

माणसे- हसणारी आणि न हसणारी ....



आपण रस्त्यावरून चालत असतो. समोरून ओळखीचा चेहरा येतो. आपण तोंड भरून हसतो. तो चेहरा हसावं की न हसावं या विचारातच निघून जातो. आपल्याला ज्याच्या त्याच्यासमोर हसण्याचा रोगच आहे असे वाटण्याइतपत आपण अपमानित होतो.
माणसे ओळखीची असली तरीही ती हसतीलच याची हमी ब्रम्हदेवालाही देता येणार नाही. It depends on their mood. आपल्या मूडच खोबरं झालं असलं तरी आपण हसायचच हा आपला बाणा असतो.   
हसण्याच्या कैक तऱ्हा असतात. काही माणसे खळखळून हसतात. काही फिदीफिदी हसतात. काही गोडसे स्मितहास्य करतात. काही चमत्कारिक, गडगडाटी हसतात. काही माणसे कंटाळवाणे हसतात. काही माजोरडे हसतात. काही हसल्यासारखे करतात. काही रडल्यासारखे हसतात. काही बद्धकोष्ठ झाल्यासारखे अवघडून हसतात. काही हसतच नाहीत. काही माणसे नको त्या प्रसंगात हसतात तर काही सणा-समारंभालाही हसायचे कष्ट घेत नाहीत.  
हसण्याच्या आणि माणसाच्या परिस्थितीचा सुतराम संबंध नसतो. एखादा अगदी सामान्य परिस्थितीतील माणूससुद्धा इतका दिलखुलास हसतो की त्याला विचारावेसे वाटते, अरे बाबा तुला आयुष्यात कुठलेच दु:ख, कुठलीच व्यथा ठुसठुसत नाही का? तुला वाढती महागाई, कामवाली बाई, रिक्षावाले, वर्गण्यावाले, तृतीयपंथी, भिकारी, ऑफिसमधला बॉस कधीच पिडत नाहीत का रे? तू ऑफिसमधून दमूनभागून घरी आल्यावर तुझे पाय तुझी बायको प्रेमाने चेपते का रे? तुझी मुले आज्ञाधारक आहेत का रे? मुंबापुरीची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये भरगर्दीत चढताना तुझ्या शरीराचं भजं होत नाही का रे? 
याउलट काही माणसे मुळी हसतच नाहीत. यांना वाचायला पुलं द्या, अत्रे द्या, मिरासदार द्या, कणेकर द्या  हे नक्की काय वाचत आहेत असा प्रश्न इतरांना पडेल इतका यांचा चेहरा पडेल असतो. यांना कुणी विनोद सांगायला गेला तर आपण विनोद सांगितला की कुणाच्या मर्तिकाची बातमी दिली असा संभ्रम त्याला पडेल. भरदिवसा ऑफिस अवर्सला लोकलमध्ये सहज चढता येऊन यांना जरी विंडो सीट मिळाली तरी यांचा चेहरा आंबटच! बरं, आर्थिक चणचण यांना माहित नाही. घरी सुंदर बायको सदैव दिमतीला, मुले अभ्यासात हुशार, चोवीस तास पाणी, खेळते वारे, घर अत्याधुनिक सुखसोयींनी सज्ज, कामवाली बाई कमीत कमी खाडे करणारी, झाडूवाला, वॉचमन, लिफ्टवाला याच्याशी सौजन्यपूर्ण वागणारे, शेजारीपाजारी यांना मान देणारे तरीही यांचा चेहरा कायम रडक्या,कुजक्या, आंबलेल्या ठेवणीचा!     
काही माणसे आपल्या इभ्रतीला शोभेल इतपतच हसतात. जपून, सावधपणे हसतात. न जाणो जरा जास्त हसलो आणि आपल्या प्रतिष्ठेला बाधा आली तर काय होईल या भीतीने हे मोजूनमापून हसतात. भल्या सकाळी मात्र पार्कात जाऊन मऊसुत हिरवळीवर हा: हा: हा: असा भयाकारी कृत्रिम हास्याचा सराव त्यांच्या  अशाच पठडीतील सहकाऱ्यांबरोबर 'लाफ्टर क्लबात, करत असतात.   
काहीजण बद्धकोष्ठहास्य हसतात. कायम अवघडून हसतात. म्हणजे धड नीट हसतही नाहीत पण हसल्यासारखे करतात. या त्यांच्या अनुपमेय हास्याचा अर्थ फक्त त्यांनाच ठाऊक असतो. यांना विचारावेसे वाटते, काय हो तुमची बायको हिऱ्याच्या बांगड्या मागतेय की काय? महिन्याचा पगार महिन्यालाच होतो ना? घरी सगळे आलबेल आहे ना ? मुले दरवर्षी पुढच्या इयत्तेत जाताहेत ना? घरी एखाद्या म्हातारीने अथवा म्हाताऱ्याने छळवाद मांडलाय का?  
कल्पना करा की एखाद्या घराचे लग्नघर झाले आहे. पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. अनेक नाजूक, गोऱ्यापान हातांवर मेंदी सजलेली आहे, विनोद, उखाणे, गप्पांचे फड अगदी रंगात आलेले आहेत, थट्टा-मस्करीला नुसता ऊत आला आहे, खाण्यापिण्याची  रेलचेल आहे, पोरेबाळे वारा प्यायल्यासारखी इकडून तिकडे धावत आहेत, घराला मंगल तोरण बांधले आहे. अशा मंगलप्रसंगी तुमचा एरंडेल प्यायलेला चेहरा हे इतरांसाठी 'सुभग' दर्शन असेल काय? घरातील वधू आणि तुमची एकुलती एक लेक बोहल्यावर चढणार आहे की .................? पण यांना सांगणार कोण?  यांच्या बायकोने केसांवर छानसा मोगऱ्याचा गजरा माळला आहे, जरीकाठाची साडी नेसली आहे, नाकात नथ घातली आहे, ओठांना हलकीशी लिपस्टिक लावली आहे. डोळ्यांत मुलीच्या लग्नाचे आणि पाठवणीचे आनंदाश्रू आहेत. तुमच्या नुसत्या हास्यपूर्ण आणि प्रेमळ कटाक्षाने ती अंतर्बाह्य मोहरून जाणार आहे. पण अशा शुभ प्रसंगीही तुमचा चेहरा उलटा यू ( इंग्लिशमधला ) करून असतो. काय दुर्बुद्धी झाली आणि या माणसाशी माझा पाट लागला असा विचार तुमच्या बायकोच्या मनात येण्याइतके तुम्ही आंबट चेहऱ्याने वावरत असता. ती पंचमहाभूते तुम्हाला साकार करताना त्यात हास्यरस नामक फ्लेवर घालायला विसरली की काय अशी शंका येण्यास भरपूर वाव असतो. 
परमेश्वराने नवरस निर्माण केले. त्यात हास्यरस हा श्रेष्ठ गणला जातो. कारण हास्याने माणसे जोडली जातात. निर्मळ हास्य हे एखाद्या मौल्यवान अलंकारासारखे असते. हसणे तुम्हाला श्रीमंत करते. तुमच्या हास्यात दुसऱ्याला आनंद  देण्याची ताकद असते. हसणे हे आरोग्यवर्धक असते. शिवाय ते प्रत्येकाच्या हक्काचे असते. आयुष्याचा खडतर प्रवास सुसह्य करण्याची शक्ती हास्यात असते. तेव्हा हसा, भरपूर हसा आणि हसवा! हसण्याला पर्याय नाही. 

No comments:

Post a Comment