Sunday, 15 July 2012

शिक्षक आणि विद्यार्थी -एक कठीण प्रमेय


शिक्षणक्षेत्र हे एक पवित्र स्थान मानले जाते. विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्राचे काशी-गयेइतकंच महत्व आहे. शाळा-कॉलेज ही विद्यार्थ्यांतून उद्याचे उत्तम, सुजाण आणि सुशिक्षित नागरिक घडवायची ठिकाणे आहेत. कारण याच मुलांतून भविष्यातील संवेदनशील नेते, उद्योगपती, संशोधक, समाजसेवक, अभ्यासक, कलाकार या राष्ट्राला मिळून हे राष्ट्र अधिक संपन्न होण्याला हातभार लागणार आहे. 
परंतु आज शिक्षणक्षेत्र हे एक पवित्र स्थान राहिले नसून तो एक स्पर्धात्मक व्यवसाय झाला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. शिक्षकही विद्यादान करता करता मानवतेला लांच्छनास्पद अशी कृत्ये करू लागले आहेत. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा किंबहुना प्रत्येक कृतीचा विद्यार्थ्याच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो याचा काही शिक्षकांना सोयोस्कररित्या विसर पडत चालला आहे असे वाटते. 
तासाचा टोला पडला की त्या त्या विषयाचे शिक्षक वर्गावर येतात. मुलांना शिकवतात आणि तास संपताच निघून जातात. पण या तासातच अनेक रामायणे घडतात. एखाद्या विषयातील शंका विचारायला आलेल्या मुलाला 'गपचूप जागेवर जाऊन बस' अशी  सूचना केली जाते.  एकदा सोडवून दाखवलेले गणित पुन्हा सोडवून दाखवले जाणार नाही असे शिक्षक सांगतात. का बुवा? वर्गातील सगळीच मुले एकाच बुद्ध्यांकाची नसतात. काही मुलांना एकदा सांगितलेले गणित चटकन समजते तर काहींना तेच गणित जरा सोप्या पद्धतीने आणखी एक-दोन वेळा सांगितले तर समजू शकते. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला न समजलेला एखादा किचकट प्रश्न शिक्षकांना विचारण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र शिक्षकांचा पुन्हा तेच गणित अथवा एखादा प्रश्न न समजावण्याचा आडमुठा बाणा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ घालू शकतो एवढेच नव्हे तर त्या शिक्षकाविषयी  एक प्रकारची अढी त्या विद्यार्थ्याच्या मनात कायम बसते. 
शाळेत शिकायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सामाजिक आणि आर्थिक स्तर हा भिन्न असतो. सगळ्या विद्यार्थ्यांचे पालक उच्च-शिक्षित नसतात. काही पालक फारसे शिकलेले नसतात. रोजंदारीवर काम करत असतात. अशा मुलांना घरी कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध नसते. पण म्हणून अशा एखाद्या मुलाला जर शिक्षकाने एकदा शिकवलेले समजले नाही तर  'तुला अभ्यास जमणारच नाही. तू आपली वडा-पावाची गाडी चालव' असा इतर सर्व वर्गासमोर हिणकस शेरा मारणं कितपत योग्य आहे?  प्रत्येक विद्यार्थ्याच्या आजूबाजूचे सामाजिक वातावरण हे वेगळे असते. काही मुलांच्या तोंडात अर्वाच्च्य शब्दही असतात. जशा शैक्षणिक कक्षा रुंदावतात तसे इतर सामाजिक भानही येते. पण हा अवसर शिक्षक मुलांना देत नाहीत. त्यांच्या पालकांचा उद्धार वर्गासमोर केला जातो. 'घाणेरड्या बीजाचे' हे उच्चारण्यास अतिशय लज्जास्पद व घृणास्पद असे शब्द वर्गात शिक्षकांकडून वापरले जातात. अशा शिक्षकांच्या आक्षेपार्ह वागणुकीतून उद्याची पिढी कशीकाय चांगली घडू शकेल? अशा शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना आदर कसा उत्पन्न होईल? याचा सगळ्यांनीच विचार करण्याची आज गरज आहे. कारण ज्या शिक्षकांच्या हाती आपण अतीव विश्वासाने आपली मुले सुपूर्द करतो तो शिक्षक किंवा ती शिक्षिका आपल्या मुलावर उत्तम संस्कार करेल कशावरून?    
काही शिक्षक हिंसक प्रवृत्तीचे असतात. मुलांना मारल्याशिवाय यांना चैन पडत नाही. गणित आलं नाही मुलाला मार, एखादा प्रश्न आलं नाही मुलाला मार असे सदोदित मारझोडीचे तंत्र हे शिक्षक वापरत असतात. विद्यार्थ्यांना घाबरवणे, सतत परीक्षेत नापास करण्याच्या धमक्या देणे, वर्गासमोर त्याला वा तिला घालूनपाडून बोलणे, पालकांना बोलावून घेईन आणि तुझी तक्रार करीन या व अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचे खच्चीकरण करणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे काय? स्वत:ला ग्रासणाऱ्या ताण-तणावाचा निचरा करण्याचे साधन म्हणजे ही आयती हातात आलेली मुले आहेत असा शिक्षक समज करून घेतात की काय?    
वर्गात अनेक शिक्षकांचे राजकारण चालते. काही मुले शिक्षकांची आवडती म्हणून त्यांना सतत फेव्हर करत राहायचं आणि नावडत्या मुलांना सतत बोलण्या-मारण्यासाठी टार्गेट करत राहायचं हा शिक्षकी बाणा आचरला जातो. दोन मुलांनी लिहिलेला निबंध जरी सारखा असला तरी आवडत्या विद्यार्थ्याला दोन-चार गुण अधिक द्यायचे. 'हा हुशार' 'तो ढ' हो लेबले वर्गातील मुलांना सातत्याने लावीत जायची आणि मुलांमध्येच एकमेकांविषयी द्वेष, असूयेची बीजे पेरीत जायची हे शिक्षणाचे उद्दिष्ट असते का?  
अनेकवेळा वाहिन्यांवर आपण बघतो की अमुक एका शिक्षकाने मुलाला मरेपर्यंत मारले. त्याच्यावर किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एखादा शिक्षक किंवा शिक्षिका याहीपेक्षा अत्यंत अघोरीपणे मुलांना शिक्षा करून त्यांचे आयुष्याच शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. असे अत्यंत हिडीस वर्तन करून शिक्षणासारख्या सर्वार्थाने पवित्र असलेल्या कार्याला काळिमा फासण्याचा जाणीवपूर्वक यत्न करणाऱ्यांना समाजानेच बहिष्कृत करण्याची गरज आहे. अत्यंत कडक शिक्षेची अंमलबजावणी अशा शिक्षकांच्या बाबतीत झाली पाहिजे. असे निंदनीय कृत्य करणाऱ्यांचे जाहीररीत्या वाभाडे निघायला हवेत. एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे आयुष्य उध्वस्त करण्याची किंमत काय असते हे जोवर समज त्याच्या निदर्शनास आणून देणार नाही तोवर अशा अपप्रवृत्तींना आळा बसणे शक्य होणार नाही. 
शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची सर्वकष प्रगती साधायची असते अधोगती नाही हा विचार सर्वप्रथम शिक्षकांच्या अंगवळणी पडणे अत्यावश्यक आहे. उद्याची पिढी विचारांनी सुदृढ, निकोप, संमृद्ध आणि कृतीने सक्षम बनवायची असेल तर त्यासाठी चांगले शिक्षक लाभणे अपरिहार्य आहे. 

No comments:

Post a Comment