आपल्या देशातील नागरिक विशेषत: युवा पिढी पाश्चात्यांच्या अनेक सवयींचे, वागण्याचे, त्यांच्या खास लकबींचे अनुकरण करण्यात धन्यता मानते. त्या देशांतील हिरो-हिरोईन्स , बिझनेसमन, मॉडेल्स यांना आदर्श मानले जाते. त्या देशांना भेट देऊन परतणारे भारतीय तेथील गोडवे गाताना थकत नाहीत. त्या देशांत कोणकोणत्या गोष्टींची उपलब्धता आहे आणि आपल्या इथे कुठल्या गोष्टींची सदैव चणचण आहे याचा उहापोह हे लोक सविस्तर करू शकतात. पण एवढे असूनही पाश्चात्य देशांतील स्वच्छतेचे, शिस्तीचे, कामसू पणाचे अनुकरण करताना कोणीच दिसत नाही. असे का हा प्रश्न अशा वेळी विचारावासा वाटतो.
यावेळेस म्हणून मग आयुष्यात कधी हातात झाडू घेतला नसेल अशा भारतीय तारे आणि तारकांना लोकांनी रस्ता झाडताना बघितले. आमचे अनुकरण करता ना मग असेही करा हाच संदेश यातून भारतातील नागरिकांना मिळाला.
आपल्याकडे रोगराई फैलावल्यावर स्वच्छता करा अशी तंबी दिली जाते. एरवी पावलापावलावर, नाक्यानाक्यावर, जवळजवळ प्रत्येक गल्लीबोळात साचलेल्या कचऱ्याचे ढीग आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात पण त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो. जाहीर सभा घेतल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना लोकांना सांगावे लागते की इथून जाताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पेपर, खाऊची पाकिटे वा इतर केरकचरा उचला, इथे टाकू नका. अजूनही या देशातील नागरिकाला ही स्वत:ची जबाबदारी वाटत नाही काय? अनेक सरकारी हॉस्पिटल्सच्या आवारात वा आजूबाजूला उभंही राहवत नाही इतकी अस्वच्छता बोकाळलेली असते. त्यामुळे अनेक प्रकारची दुर्गंधीही पसरते. अनेक इमारतींच्या अंतर्भागात, रस्त्यावर, वाहनांमध्ये, जिथे शक्य असेल तिथे कुठेही पानाच्या तांबड्या भडक पिचकाऱ्यांची रांगोळी दृष्टीस पडते. या व्यतिरिक्त माणसे कसलाही विधिनिषेध न बाळगता कुठेही थुंकत असतात वा विधी करत असतात.
मुंबईची 'लाइफलाइन' असे ज्या लोकलचे वर्णन केले जाते, त्या लोकलच्या आतील व बाहेरील दृश्य सकाळच्या वेळी अवर्णनीय असते. बायका, पुरुष,मुले मुली लोकलला घाण करण्याची हक्काची जागा समजत असावेत. निवडलेल्या भाज्या, फळांच्या साली, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, रिकाम्या झालेल्या बाटल्या या व अशा अनेक गोष्टी रोजच्या रोज लोकलला बिनदिक्कत बहाल करत असतात. याशिवाय काही त्याज्य, दुर्गंधीयुक्त गोष्टीही नजरेला, नाकाला छळत राहतात. लोकलच्या आतील भिंती या तर बीभत्स चित्रे आणि मजकूर लिहिण्याकरता जणू सरकारने जनतेला आंदण दिल्या आहेत असेच वाटत राहते. ज्या वाहनातून आपण प्रवास करतो आहोत ते वाहन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच कशी?
पावसाळा असो वा नसो ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली दिसून येतात. हे पाणी नक्की येते कुठून तेही समजत नाही. या पाण्यात मग कचरा पडतो, कुजतो आणि आजूबाजूला दुर्गंधी पसरायला सुरवात होते. अनेक लोक या रस्त्यावर नेहमीच येत जात असतात पण या गोष्टीची दखल किती लोक गांभीर्याने घेतात? शेवाळलेली डबकी, रिकाम्या जागा पाहून त्यावर टाकलेला कचरा, रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या भिकाऱ्यांनी माजवलेली अस्वच्छता, सांडलेल्या पानाच्या पिचकाऱ्या, शेवाळलेले दुर्लक्षित तलाव, पडझड झालेल्या इमारतींचा कचरा वा घाण करण्यासाठी होत असलेला वापर, रस्त्यावर पसरलेला नासका-कुजका भाजीपाला, रस्त्याच्या कडेला लावलेल्या अन्नपदार्थांच्या गाड्यांतून शेवटी टाकला जाणारा कचरा, ज्या गोष्टींची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावायला हवी अशा सार्वजनिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या गोष्टी, विखुरलेले अन्न-धान्य, मांसाहार करून टाकलेला उरलासुरला कचरा या व अशा असंख्य गोष्टी, गणपती विसर्जनानंतर समुद्रात, नद्यांत, तलावात होणारी घाण, शिवाय नाले, कारखान्यातून समुद्रात सोडलेली विषारी केमिकल्स याही गोष्टी पर्यावरण संवर्धक आहेत का? आपली वैयक्तिक जबाबदारी यात काहीच नाही का?
ज्याप्रमाणे नुसता वरून मेकअप करून उपयोग नाही तर अंतर्गत स्वच्छता होणे आत्यंतिक गरजेचे आहे त्याचप्रमाणे शहरे नुसती अद्ययावत करून काय उपयोग, शहराच्या प्रत्येक भागातील स्वच्छता जाणीवपूर्वक व्हायला हवी. ही शिस्त प्रत्येकाने स्वत:ला लावून घेतली तर कोणत्याही पंतप्रधानांना लोकांना कचरा उचला हे सांगण्याची वेळच येणार नाही. भारत अत्याधुनिक तर हवाच पण तो सर्वप्रथम स्वच्छ हवा. अशा स्वच्छ देशांत राहणाऱ्या जनतेचे स्वच्छ प्रतिबिंब मग जगाच्या पटलावरही दिसल्याशिवाय राहणार नाही.
No comments:
Post a Comment