रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळेमध्ये, हॉटेलमध्ये कुठेही राजरोस बलात्कार होत आहेत. अगदी चिमुकल्या बाळांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कुणीही या विकृत नराधमांच्या वासनेची शिकार होत आहेत. रस्त्यावरील छेडछाडीला तर अंतच नाही. कुठे 'acid हल्ला तर कुठे 'चाकू हल्ला'! कुणी प्रेमाला नकार दिला म्हणून तर कुणी छेडछाडीला विरोध केला म्हणून स्त्रीत्वावर सरळसरळ , बिनदिक्कत घाला घातला जात आहे. रोड रोमिओ, श्रीमंत बापजाद्यांची पोरे, प्रेमभंगाने माथेफिरू झालेले असे कोणीही सर्रास, कसलाही विधिनिषेध न बाळगता स्त्रियांच्या पदराला हात घालायला धजावत आहेत. नागरिकांच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलेल्या शासकीय यंत्रणेसाठी ही खचितच शरमेची बाब आहे.
आज स्वत:च्या पायांवर भक्कमपणे उभे राहून कुटुंबाचा भार वाहणाऱ्या अनेक महिला आहेत. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सक्षमपणे आर्थिक जबाबदारी पेलणाऱ्या अनेकजणी आहेत. शिक्षणासाठी आपला प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतात जाऊन शिकणाऱ्या अनेक आहेत. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या आहेत. रात्रपाळी करणाऱ्या आहेत. निवृत्त जीवन जगत एकाकी राहणाऱ्या आहेत. आपल्या निष्पाप, चिमुकल्या डोळ्यांनी हे विश्व समजून घेण्याचा प्रयास करणाऱ्या आहेत. या महिला वेगवेगळ्या वयातील, आर्थिक व सामाजिक स्तरातील आहेत. या समस्त महिलांच्या संरक्षणाची हमी कोणी द्यायची? वेळी-अवेळी कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची नाही का? दिवसढवळ्या रस्त्यावर पुरुषी अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना योग्य ते संरक्षण मिळणे गैरवाजवी आहे का?
आज एकविसाव्या शतकातही स्त्री मग ती कोणत्याही वयातील असो, एक उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्याकडे पहिले जाते. ज्या छोट्या बाळाकडे बघून ममत्वाशिवाय इतर कोणत्याही भावना निर्माण होऊ शकत नाहीत , त्या बालिका सुद्धा या लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. जी वृद्ध महिला माता , आजी या संबोधनासाठी योग्य असते तिच्यावरही या विकृतीचे शिंतोडे उडाल्यावाचून राहत नाहीत. अशा राज्यात सारे काही आलबेल आहे असे म्हणायचे? अगदी विकलांग मुलीलासुद्धा या वासनेचे लक्ष्य केले जाते. हे सारे मानवी अधोगतीचे द्योतक नाही काय?
फक्त खेड्यापाड्यात नव्हे तर शहरी भागातही या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. सामुहिक बलात्कार जिथेतिथे बोकाळला आहे. जर सकाळी हातात पेपर धरायला घ्यावा तर डझनावारी याच बातम्या लक्ष वेधून घेत ढेपाळलेली शासकीय सुरक्षितता अधोरेखित करत असतात. अत्याचाराला बळी पडलेली महिला मग लोकांच्या सहानुभूतीचा, दयेचा, उपेक्षेचा विषय होते. जणू काही ताठ मानेने जगण्याचा तिचा अधिकार संपुष्टातच येतो. तिचा व्यक्तिश: यत्किंचितही सहभाग नसलेल्या दुष्कृत्याची ती अनपेक्षित बळी ठरते आणि समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गढूळ होतो. घरी-दारी असे अपमानास्पद जिणे असह्य झाल्याने मृत्यूला कवटाळण्याशिवाय त्या पिडीत स्त्रीकडे अन्य पर्यायच उरत नाही. जी मुलगी अथवा स्त्री आजवर एखाद्या कुटुंबाचा गौरव किंवा आधार ठरलेली असते ती स्त्री किंवा मुलगी या घटनेनंतर शारीरिक तसेच मानसिक आघाताने पुरती खचून जाते. मनोमन उध्वस्त होते. तिच्यासाठी सगळीच आपली वाटणारी माणसे परकी होऊ लागतात. जगण्यापेक्षा मरण सुकर वाटू लागते.
अनेक पुरुषांची मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे. मी पुरुष आहे म्हणजे मी शारीरिक दृष्ट्या श्रेष्ठ आहे. मी काहीही करू शकतो. हा अहंगंड समूळ नष्ट झाला पाहिजे. पुरुष-स्त्री समानतेचे नारे देणारयांनी खरोखरीच अशी समानता लोकांच्या आचरणात आहे का हे तपासून पहिले पाहिजे. कोणत्याही मुलीवर,स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला सज्जड शिक्षा समाजाकडून वेळच्या वेळी दिली गेली पाहिजे. स्त्रीचा आदर करण्याचे बाळकडू पुरुषाला घरातूनच मिळाले पाहिजे. या देशात प्रत्येक मुलीला, स्त्रीला मानाने, सुरक्षिततेने जगण्याचा हक्क आहे आणि तो हक्क नाकारणाऱ्या कोणत्याही माणसास जबरदस्त शिक्षा व्हायला हवी.
नाहीतर 'सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा' असे गर्वाने स्वातंत्र्यदिनी म्हणणाऱ्या करोडो भारतवासीयांवर शरमेने मान खाली घालण्याची पाळी येईल.
No comments:
Post a Comment