Wednesday, 21 March 2012

रंग चित्रकलेचे - तरंग मनाचे

माझी मैत्रीण सौ.नीता फाळके दरवर्षी तिच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवत असते. यावर्षीचा विषय होता 'माय ड्रीम इंडिया'. मुलांनी याविषयीची अनेकविध सुंदर चित्रे काढली. जवळजवळ दोन महिन्यांपासून ही तयारी चालू होती. मुलांच्या मनातील आपल्या देशाविषयीचे विचार या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वांनाच कळले आणि तेही आखीव-रेखीव चित्रांच्या माध्यमातून!  एकंदर अडीचशे चित्रे मांडली गेली. काम तितकेसे सोप्पे नव्हते.  
नीताने या संदर्भात मला सांगितले की एकदा प्रदर्शनासाठीचा विषय निश्चित झाल्यावर मग मी माझ्या विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चा करते. हीच चर्चा ते घरी त्यांच्या पालकांशी करतात. मुलांच्या मनात कल्पना आकार घेऊ लागतात. परंतु विचार ते प्रत्यक्ष चित्र रेखाटणे हा प्रवास तसा आव्हानात्मक असतो. काही चित्रे प्रतीकात्मक असतात. चित्रांतून विद्यार्थ्याच्या मनातील भाव व्यक्त होत असतात. एखाद्या चित्रातून नेमके काय म्हणायचे आहे याचा आराखडा प्रथम विद्यार्थ्याच्या मनात पक्का होणे गरजेचे असते. चित्र कागदावर उतरवल्यानंतर उत्तम रंगसंगती साधावयाची असते. आणि अशा अनेक विचारांची अनेक चित्रे जेव्हा संकलित होतात तेव्हाच हे प्रदर्शन आकारास येऊ लागते.  
माझ्या कल्पनेतील भारताची भूमी ही 'सुजलाम सुफलाम' आहे. तिथे हिरव्याकंच शेतांतून सोन्यासारखे पिक निघाले आहे. शेतकरीराजा सर्वांना मुबलक अन्न पुरवून स्वत:ही सुखाच्या राशीत लोळतो आहे. सगळे नागरिक उत्तम नागरी सुविधांचा लाभ घेत आहेत. पाणी, वीज, अन्न, वस्त्र, निवारा कश्याकश्याची म्हणून टंचाई नाही. मुलगा आणि मुलगी यांना इथे समान वागणूक दिली जाते आहे. प्रत्येकजण साक्षर आहे. अद्ययावत इलेक्ट्रोनिक उपकरणांचा लाभ सर्वांना मिळतो आहे. सर्वधर्मीय लोक इथे सुखाने नांदत आहेत. गरिबी, भ्रष्टाचार,आतंकवाद, जातीयता, स्त्रियांवरील अत्याचार, बालमजुरी ही मानवतेला लागलेली कीड आता नष्ट झाली आहे. आरोग्यकेंद्रे, हॉस्पिटल्स, शौचालये, उद्याने, क्रीडाक्षेत्रे, मल्टीप्लेक्सेस, मोनोरेल, उत्तम रस्ते यांमुळे माणसाचे दैनंदिन आयुष्य सुकर होत चालले आहे. आपल्या देशाचे भूषण असलेल्या ऐतिहासिक वास्तू चांगल्या तऱ्हेने जतन केल्या जात आहेत. इथे सर्व धर्मांचे सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. निसर्गाची होणारी अपरिमित हानी नियंत्रणात आली आहे. नैसर्गिक गोष्टींचे संवर्धन केले जात आहे. सर्व पशु-पक्षांची योग्य ती निगा राखली जात आहे. 'चूल आणि मुल' ही संकल्पना आता मागे पडून स्त्री शक्ती स्व-कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होऊ पाहते आहे. अशा आशयांची बहुतेक चित्रे होती. या चित्रांतील आशयाला साजेशा कवितांच्या ओळी तसेच मथळेही लिहिले होते. आपापल्या वयाप्रमाणे आपली कल्पनाशक्ती लढवून मुलांनी ही चित्रे प्रदर्शनात सादर केली.  
एक हात दुसऱ्या हातात शिक्षणाचा वसा सुपूर्द करतो आहे आणि तो हात आणखी चार साक्षरांना जन्म देतो आहे असे चित्र होते. एका चित्रात मनगटावरील घड्याळामध्ये स्त्रियांच्या कालमानानुसार बदललेल्या भूमिका चित्रित केल्या होत्या. प्रापंचिक आणि व्यावसायिक जबाबदारी असा दुहेरी समतोल साधणारी स्त्री एकाच देहातील दोन व्यक्तीमत्वांच्या माध्यमातून रेखाटली होती. एका चित्रात सगळ्या समाजविघातक प्रवृत्तींना पायांखाली चिरडले गेले होते तर दुसऱ्या चित्रात ही मानवतेला लागलेली विषारी मुळे उपटून टाकण्यात आली होती. वर्ग आणि वर्णभेदाचे उच्चाटन झाले होते.  एका चित्रात गरिबी, समाजकंटक प्रवृत्ती यांना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली होती. असा सर्व सुखसोयींनी, साधनांनी युक्त असा भारत जगाच्या पाठीवर अश्वगतीने व अश्वशक्तीने घोडदौड करत होता. या भारत देशात 'सुवर्ण युग' अवतरले होते.      
शालेय शिक्षणापेक्षा काहीतरी वेगळे यात अनुभवायला मिळाले. सरधोपट, ठोकळेबाज पद्धतीने दिलेल्या विषयावर जमते तसे चित्र काढण्यापेक्षा इथे मुलांच्या विचारांना, बुद्धीला खाद्य मिळाले आणि त्यांनी आपापली कल्पनाशक्ती वापरून अतिशय समर्पक अशी चित्रे  काढली. एखादे चित्र कागदावर सजीव करण्याआधी ते मनात मूर्त व्हावे लागते ही जाणीवही मुलांना झाली. हे एक छान, सुबक चित्रांचे प्रदर्शन तर होतेच पण त्याहीपेक्षा जास्त मुलांच्या विचारांचे, त्यांच्या जाणिवांचे प्रदर्शन होते. निळ्या , निरभ्र आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या अनेकरंगी विचारांचे थवे  पांढऱ्याशुभ्र कागदांवर अलगदपणे येऊन विसावले होते.  
खूप छान वाटले हे आगळेवेगळे प्रदर्शन पाहून! 

No comments:

Post a Comment