पॉवर हंगर अर्थात शक्ती-क्षुधेचा प्रयोग करणारी माणसे ही फक्त राजकीय आणि सामाजिक बाजारपेठेतच नाहीत तर कुटुंबकारणातही सक्रीय असतात. 'अटेन्शन सिकींग' हा हेतूही या सक्रीयतेत अभिप्रेत असू शकतो.आपल्याला लोकांनी महत्व द्यावं, येनकेनप्रकारेण आपला चारचौघांतील वावर सतत दृश्यमान व्हावा यास्तवकाही माणसे आपल्या 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर जाऊन कार्यरत असतात. वास्तविक पाहता माणूस हासामाजिक प्राणी असल्याने समाजातील आपले अस्तित्व दुसऱ्याला जाणवून देण्याची त्याची इच्छा ही स्वाभाविक असते पण काही माणसे केवळ अटेन्शन सिकींगसाठी शक्ती-प्रदर्शनाचा अवलंब करतात. अशा माणसांचा हा 'पॉवर प्ले' त्यांच्या मनातील वैचित्र्याचा निदर्शक असतो.
राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्ती ज्याप्रमाणे रस्तोरस्ती होर्डींग्ज लावून स्वत:ची छबी ( कर्तृत्व apart ) जनमानसात ठसवू पाहतात त्याचप्रमाणे कुटुंबकारणात सक्रीय असलेले ज्यात त्यात जबरदस्तीने डोकावू पाहतात. त्यांची ही सक्रियता सिनेमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या एखाद्या क्षणिक जाहिरातीएवढीच महत्वाची असते. 'काम केले पाच पैशांचे आणि आव आणला पाच हजाराचा' असा यांचा बाणा असतो. परंतु कुटुंबातील लोकांची मानसिकता, त्यांच्या आवश्यकता, कमतरता या गोष्टींचा त्यांचा अभ्यास पक्का असल्याने त्यांचं प्रतिबिंब यांना आरशात उतरवणं सोप्पं जातं.
कधीतरी प्रसंगपरत्वे येणारा पाहुणाच यावासा वाटतो. त्याने यावे, काय असेल ते खावे-प्यावे, चार क्षण आनंदात घालवावेत एवढीच माफक अपेक्षा असते पण अनाहूतपणे येऊन घरच्या गोष्टींत नाक खुपसणारा पाहुणा मात्र परत न आला तर बरा असे वाटण्यास पात्र असतो. पॉवर म्हणजे शक्ती ही पूर्वी गोधन, अश्व-गज, सैन्य या रुपात मोजली जात असे आज ती पैसा, इस्टेट, गाड्या या रूपांत मोजली जाते. या भौतिक साधनांच्या बळावर 'पॉवरफुल' झालेली ही माणसे 'अटेन्शन सिकींग' साठी नवनवे खेळ खेळत राहतात.
राजकारणात वैयक्तिक स्वार्थासाठी जसे पक्षांतर केले जाते त्याप्रमाणे या 'पॉवर हंग्री' व्यक्ती आपली सोय बघून 'ग्रुप्स' बदलतात. यांच्या 'नावडत्या' यादीत असणाऱ्या माणसांची नावे आता 'आवडत्या' यादीत नमूद केली जातात. ज्या माणसांकडे पूर्वी काही येणेजाणे नव्हते वा त्यांच्याशी तसे काही देणेघेणे नव्हते त्या माणसांसाठी ही माणसे आता सदैव उपलब्ध होऊ पाहतात. आपल्याकडील आर्थिक क्षमतेच्या बळावर ही माणसे आपली प्यादी कुटुंबपटावर पुढे पुढे सरकवत राहतात. एकेक नव्या कुटुंबाकडे कूच करत यांची राजकारणी घोडदौड चालू असते. नवीन राज्ये पादाक्रांत करायची असतात. नवे भिडू जिंकून मिळवायचे असतात. जुन्याच सरहद्दी नव्याने उल्लंघून जायच्या असतात. आकांक्षांचे नवे गड सर करायचे असतात.
पण हा सगळा खटाटोप फक्त स्वत:चे शक्तीप्रदर्शन करण्यासाठीच असतो. नाती हवी असतात पण ती स्वत:च्या 'श्री-शक्तीचा' जयजयकार करण्यासाठी! तुमचा आधारस्तंभ फक्त मीच आहे हा सुप्त अहंकार जपण्यासाठी! तुमच्या सेवेला मी तत्पर आहे असे वरकरणी भासवण्यासाठी! आपली वैचारिक अ-क्षमता झाकण्यासाठी!
आपल्या या स्वभाव-वैचित्र्याला परोपकार असे गोंडस नाव देत स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या या माणसांपासून सुज्ञांनी चार हात लांब राहणे हेच सर्वार्थाने श्रेयस्कर आहे.
No comments:
Post a Comment