Monday, 19 March 2012

पुतळे


आजकाल जिवंत माणसांपेक्षा पुतळ्यांचे महत्व जास्त वाढले आहे. चालतीबोलती हाडामांसाची माणसे नकोत पण निर्जीव पुतळे हवेत. कारण हे पुतळे बिचारे निषेधार्थ आवाज उठवू शकत नाहीत. त्यांची विटंबना करा, त्यांना चपलांचे हार घाला, त्यांच्यावरून राजकारण करा, त्यांची स्थापना करून कावळ्या-कुत्र्यांची सोय करा, त्यांचे काही म्हणणे नसते.   
हे पुतळे बांधण्याचा आग्रह धरणारे किती जण या गतकाळातील लोकनायकांच्या तत्वांचे प्रामाणिकपणे आचरण करणारे असतात? एकही नाही. तरीही यांना कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेले पुतळे हवेत. देशातील कोट्यावधी गरीब जनता अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सोयींपासून  वंचित राहो, यांना पुतळे हवेत. दिवसेंदिवस महागाई अगदी गगनाला भिडो, यांना पुतळे हवेत. लक्षावधी बेरोजगार नोकरीच्या शोधार्थ वणवण फिरोत पण यांना पुतळ्याचा प्रश्न जीवनमरणाचा वाटतो. दिसामाशी प्रचंड वाढणारी गर्दी, बाहेरील देशांतून येणारे लोंढे, अपुरी भासणारी वाहतुकीची साधने, पाण्याचा तुटवडा, जागोजागी दिसणारे कचऱ्यांचे ढीग, उखडलेले रस्ते, उघडी गटारे, हॉस्पिटल्सची दुरावस्था, प्रदूषणाची सतत भेडसावणारी समस्या, गरजेच्या वस्तू महागल्याने सामान्यांची परिस्थितीशी सदोदित चाललेली लढाई या व अशा प्रश्नांपेक्षा पुतळे अथवा स्मारके कुठे उभारायची हा प्रश्न जास्त ज्वलंत आहे असे यांना वाटते.
कधी वाटते की या निष्प्राण पुतळ्यांत  कुणीतरी प्राण फुंकावेत आणि त्यांचे मनोगत ऐकावे. जिवंत माणसांना भेडसावणारे प्रश्न किती महत्वाचे आणि पुतळ्यांच्यावरून होणारे राजकारण किती महत्वाचे यावरील त्यांचं भाष्य तरी ऐकता येईल. काय म्हणतील ते या राजकारण्यांना? अरे, आमच्या तत्वप्रणालींशी ज्यांचे काडीचेही सोयर-सुतक नाही अशी  माणसे जेव्हा काही राजकीय हितसंबंध, स्वार्थ जोपासण्यासाठी आमची स्थापना करायला निघतात तेव्हाच आमची खरी विटंबना होते. ज्या वीरांनी, देशभक्तांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वतंत्र भारतातील किती जनता आज खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या,  आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे याचा हिशेब द्या. हा भारत आजमितीला जातपात, धर्मांधता, लाचारी, बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, चोरीमारी, खून-आत्महत्या, आतंकवाद यांपासून खऱ्या अर्थाने मुक्त झाला आहे का याचा हिशेब द्या. ज्या थोर लोकांनी या देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावले अशा लोकांनी घालून दिलेला समाजहिताचा आदर्श तुम्ही दृष्टीसमोर ठेवून त्याबरहुकुम वागताय का याचा हिशेब द्या. देशाचे शांघाय करण्याच्या प्रयत्नात किती जनविकासाच्या प्रकल्पांना तुम्ही कायमची घरघर लावणार आहात त्याचा हिशेब द्या. गरीब-श्रीमंत यांमधील दरी मिटवण्यासाठी तुम्ही किती सक्रीय आहत याचा हिशेब द्या. नवनवीन बांधकामे काढून तेथील हिरवळ,तिवरे,वृक्ष यांना हानी पोहोचवणाऱ्या महाभागांना तुम्ही का राजाश्रय देता याचा खुलासा करा. नद्या, खाड्या बुजवणाऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करणाऱ्यांना तुम्ही कोणती शिक्षा देता याचा खुलासा करा. देशाद्रोह्यांविरुद्ध कडक शिक्षेची अंमलबजावणी तर सोडाच पण त्यांच्या सुरक्षेवर कोट्यावधी रुपये अकारण खर्च करणाऱ्यांनो तुमच्या या निंदनीय कृत्याचा खुलासा करा. जंगले तोडणाऱ्या, आपल्या स्वार्थासाठी मुक्या जनावरांची हत्या करणाऱ्या या मानवाच्या रूपातील पशुंनो आपल्या या निर्दय वागणुकीचा खुलासा करा.  इतक्या वर्षांत साधी असहाय स्त्रियांकडे बघण्याची समाजाची दृष्टी तुम्ही बदलवू शकला नाहीत हा आमच्या मूल्यांचा  पराभव आहे. धर्माचे,जातीपातीचे अवडंबर माजवून त्या बळावर राजकारण खेळले जाते आहे हा आमच्या विचारसरणीचा पराभव आहे.  क्षुद्र स्वार्थापायी आज अनेकजण गरिबीच्या, बेकारीच्या अंधारात ढकलले जात आहेत हाही आमचा पराभव आहे. अजूनही सर्वार्थाने या देशातील निरक्षरता आणि दारिद्य्र यांचे समूळ उच्चाटन होत नाही हा आमचा पराभव आहे. 
ज्या पायदळी तुडवल्या गेलेल्या आमच्या तत्वांच्या छाताडावर आज राजकारणी मनसुबे रचले जात आहेत त्या देशात सन्मानाने उभे राहण्यासाठी आम्हाला जागाच उरलेली नाही. गरीबाच्या पोटाला पुरेसे अन्न द्या, बेकारांना नोकरी द्या, बेघरांना माफक दरात घरे द्या, महागाईचा आवळलेला फास सैल करा, ज्याच्या श्रमावर अवघा देश, राष्ट्र पोसले जाते त्या शेतकऱ्याची झोळी सुखाने भरा, जनावरांच्या हत्या करू नका, नैसर्गिक संपत्तीचे जतन करा, वाढत्या लोकसंख्येला आळा घाला, बाहेरून येणारे लोंढे थांबवा, जातीयतेला खतपाणी घालू नका  मग भले आमचे पुतळे उभारले नाहीत तरी चालेल. नाहीतरी केवळ १५ ओगस्ट, २६ जानेवारी अशा काही तारखांनाच देशांतील लोकांना राष्ट्रप्रेमाचे भरते येत असते. त्या निमित्ताने आम्हाला धुवून-पुसून स्वच्छ केले जाते. कारण झेंडावंदनाचा  उपचार पार पाडायचा असतो. इतर वेळेस मात्र काही पक्षी-प्राणी आमच्यावर त्यांचा हक्क निर्विघ्नपणे बजावत असतात. आमच्या काही अवयवांचीही पडझड झालेली असते. धुळीचे लोट आमच्यावर त्यांचे वर्चस्व गाजवीत असतात. आमच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची कोणाचीच इच्छा नसते कारण आम्ही मुळी निर्विकार, निर्विचार, स्तब्ध, अचल असतो. ही मानहानी सोसण्यासाठीच का आम्ही आमचे रक्त सांडले? असा आम्हाला वारंवार प्रश्न पडतो.   
आमचे पुतळे अजिबात उभारू नका पण आमचे विचार अंगीकारून कृपया समाजाचे हित साधा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे नाहीतर जिवंत माणसांचे पुतळे होण्यास वेळ लागणार नाही.  


No comments:

Post a Comment