Wednesday, 14 March 2012

मी स्पिरिच्युअल (?) आहे

खूप देवभोळ्या लोकांना ते स्पिरिच्युअल आहेत असे वाटत असते. पोथ्या-पारायणे केली, नवस-सायास केले, देवदर्शने केली की त्यांना स्पिरिच्युअल झाल्यासारखे वाटत असावे. सारख्या देवळात जाणाऱ्या बाईविषयी इतर बायकांचे मत ' ए, ती खूपच स्पिरिच्युअल आहे ना' असेच असते.      
वास्तविक पाहता 'स्पिरीट' म्हणजे 'सोल' अर्थात माणसाचा अंतरात्मा. या स्पिरिटच्या जवळ जाणे याला माणसाचा स्पिरिच्युअल प्रोग्रेस असे म्हणता येईल. आपल्या आत असलेला चैतन्याचा उगम अनुभवणे या भावस्थितीला स्पिरिच्युअल म्हणता येईल. बरेच वेळा स्पिरिच्युअल आणि धार्मिक यात गल्लत केली जाते. धर्मानुसार आचरण करणे वेगळे आणि आपला पिंड, मूळ जाणून त्यानुसार आचरण करणे वेगळे. देवळातील देवाचे दर्शन घेणे म्हणजे स्पिरिच्युअल होणे नाही. देवदर्शनाला जाणे हा नित्यक्रम असू शकतो, हा एक दिखाऊपणा असू शकतो, ही एक अगतिकता असू शकते, तो एक विरंगुळा असू शकतो किंवा ही एक समवयस्कांबरोबर चर्चेची जागा असू शकते. 
अध्यात्म्यावरील प्रवचनांना हजेरी लावण्याच्या उद्देशाने जाणारे अधिक असतात. तात्विक, बोधप्रद असे भाष्य ऐकून तेवढ्यापुरते ते त्यात रंगून जातात पण बाहेर येताच प्रपंचातील गोष्टींचा उहापोह सुरु होतो. 'आपुला आपणाशी संवाद' ज्यांना खऱ्या अर्थाने साधता येतो ते आत्मोन्नती साधू शकतात. प्रापंचिक असूनही स्वत:च्या पिंडाशी, आत्मरूपाशी जे तादात्म्य पावू शकतात त्यांना त्या ईश्वरी शक्तीची प्रचीती येते. नाम घ्या असे प्रवचनकारांनी सांगितले आहे म्हणून केवळ जे नाम घेऊ इच्छितात परंतु त्यांची ती हाक अंतरहृदयापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या शक्तीची प्रचीती येण्यास ते असमर्थ ठरतात. 

माझ्याकडे एक बाई त्यांच्या मुलाच्या पत्रिकेसंदर्भात काही प्रश्न घेऊन आल्या होत्या. माझा मुलगा देवाला हात म्हणून जोडत नाही, देवाचं काही म्हणत नाही, देवळात चुकूनही जात नाही अशा अनेक तक्रारी त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्याच्या नास्तिक वागण्याचा एकंदर त्यांना फारच ताप झालेला माझ्या लक्षात आला. आमच्याकडे देवाचं, कुळाचाराच केवढं आहे आणि हा पडला असा. आता यावर उपाय काय हे त्यांना समजेनासं झालं होतं म्हणून हा पत्रिका दाखवण्याचा उपचार होता. मुलगा दहाव्वीत होता. त्याचा अभ्यास उत्तम होता. त्याला खेळात आणि चित्रकलेतही विशेष गती होती. कोणत्याही क्लासला न जाता तो मेहनत करून चांगले गुण मिळवत होता. दहाव्वीला असल्यामुळे जर याने एकदाही देवाचे स्तोत्र म्हटले नाही, नमस्कार केला नाही किंवा देवळात गेला नाही तर याचे काही खरे नाही अशी बहुतेक त्या बाईंनी समजूत करून घेतली होती. थोडक्यात त्यांचा मुलगा देव मानत नव्हता. हा कुणाशी वाईट वागतो का हो? हा दुष्ट,गर्विष्ठ आहे का?  हा वडीलधारयांशी विनयाने वागत नाही का? याचे मित्रांशी जमते का? हा अप्रामाणिक आहे का? ह्याला इतरांना मदत करायला आवडते का? असे काही प्रश्न त्यांना मी विचारले. हा मुलगा सुस्वभावी, विनयशील, प्रामाणिक, निगर्वी आणि कष्टाळू आहे असे त्यांच्याकडून मला कळले. ज्या गोष्टी तो करतो त्या मन लावून किंबहुना त्यात सर्वस्व ओतून करतो ही माहितीही त्यांनी दिली. तेव्हा तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्याला त्याचा देव सापडला आहे असे मी सांगितले. त्यांचे फारसे समाधान झालेले त्यांच्या चेहऱ्यावरून मला दिसले नाही त्यावरून ह्या बहुधा आता दुसऱ्या एखाद्या ज्योतिषाचा दरवाजा ठोठावतील असे मी मनातल्या मनात भाकीत केले.  
आपल्यापैकी बहुतांश लोक हे सगुण भक्ती करणारे असतात. ह्या घरांतील देव्हाऱ्यात किंवा देवळांतील गाभाऱ्यात स्थापलेल्या मूर्तीची पूजा आपण करतो. रोज देवाला जाणारे असतात, स्तोत्रे म्हणणारे असतात, जपमाळा ओढणारे असतात, प्रदक्षिणा घालणारे असतात, शंखनाद करणारे असतात, टिळे लावणारे असतात, पैशाने, सोन्या-चांदीने देवाला मढवणारे असतात, स्वत:च्या पोझिशनचा फायदा घेऊन रांगेत घुसून देवदर्शन करू पाहणारेही असतात. यांतील खरोखर किती लोकांचा भक्तीभाव आतून जागृत झालेला असतो? सांगणे अत्यंत कठीण आहे.  
देव बघण्यासाठी अथवा देवत्वाची प्रचीती येण्यासाठी देवळातच जायला पाहिजे असे कुठे लिहून ठेवले आहे का? तुमच्या अभ्यासात, कामात, कर्तव्यात, परोपकारातही तुम्ही देवाला पाहू शकता. तुमच्यातील सद्गुण हे देवस्वरुपच असतात. 'नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी' ह्या गदिमांच्या ओळी इथे तंतोतंत पटतात. स्वत:त वसलेल्या त्या आत्म-स्वरुपाची प्रचीती येणे अगोदर गरजेचे असते. त्या स्वरूपाने दिलेली साद ऐकणे गरजेचे असते. त्यांचा आवाज समजणे गरजेचे असते. नाहीतर घरच्यांनी सांगितले म्हणून, भीतीपोटी म्हणून, टेन्शन येते म्हणून, मित्रांनी खेचले म्हणून देवळात जाणारे अनेक असतात. राम म्हणायचे म्हणून राम असे म्हटले गेले तरी त्यात राम असतोच असे नाही तर त्याचा उद्भव हृदयातून व्हायला हवा. आंधळ्या-पांगळ्याला, तहानल्या-भुकेलेल्याला, मुक्या जनावराला, आजाराने-वृद्धत्वाने जर्जर झालेल्याला मदतीचा हात जेव्हा दिला जातो त्यात राम असतोच. 
महायोगी कै. बाबा आमटे देवळाच्या पायऱ्या भले चढले नाहीत पण त्यांच्यातील देवाचं दर्शन अनेकांना संजीवन देऊन गेलं. स्व-चैतन्याला ओळखून त्यांनी कुष्ठसेवेचं रामायण घडवलं आणि असंख्य पीडितांच्या मनात आनंदवन फुलवलं. याच चैतन्याच्या लाटेवर आरूढ झालेले रामकृष्ण परमहंस जगाने अनुभवले. मदर तेरेसांच्या अंत:करणातील त्या चैतन्यरुपी शक्तीने दीन-दु:खितांच्या मनावर हळुवार फुंकर घातली. स्वामी विवेकानंदांच्या त्या चैतन्याने अवघ्या विश्वालाच गवसणी घातली. स्वत:चा आतला आवाज ओळखून त्याबरहुकुम आचरण करणारी ही माणसे म्हणजे 'दिव्यत्वाची प्रचीती' ठरली.  पराकाष्ठेचे हाल सोसून ज्ञानेश्वरांनी जनोद्धारासाठी अंत:प्रेरणेने ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्यातील परम-रूपाचा साक्षात्कार लिखित स्वरुपात आपण आजही अनुभवतो आहोत.    
जितका माणूस स्व-स्वरूपापासून दूर जाईल तितकीच त्याची 'स्पिरिचुअल' भावना लयाला जाईल.  आपल्या मनावर साचलेलं मायेचं शेवाळ प्रयत्नपूर्वक बाजूला सारून ज्या क्षणी माणूस आत्म-रुपाला पाहील व त्याप्रमाणे आचरण करेल त्या क्षणी तो 'स्पिरिचुअल' होईल.  

No comments:

Post a Comment