Monday, 14 May 2012

मी रेखाटलेली व्यक्ती-चित्रे

शाळेत असताना चित्रे काढायची खूप आवड होती पण हातात तेवढी चांगली चित्रकला नव्हती. माझ्या वर्गातील सुनील राजे नावाचा मुलगा उत्कृष्ट स्केचेस काढायचा. त्याने रेखाटलेले लोकमान्य टिळकांचे अप्रतिम चित्र अजूनही माझ्या स्मरणात आहे. आपल्याला अशी चित्रे काढता यायला हवीत असे मनोमन वाटायचे. पुढे ८ वी, ९ वीत गेल्यावर चित्रकला आणि संगीत यांपैकी एक विषय निवडणे भाग होते त्यामुळे मग मी संगीत हा विषय घेतला आणि अशा रीतीने चित्रकलेशी उरलासुरला संबंध संपुष्टात आला.  
पुढे कॉलेजला गेल्यानंतर कविता, गाणे आणि अभ्यास या विषयांपुरतेच माझे विश्व सीमित झाले. वयाची चाळीशी जवळ आली तशी चित्रे रेखाटायची ओढ लागली. हे डोहाळे माझे मलाच पुरवायचे होते पण त्यासाठी लागणारी साहित्यसंपदा माझ्याजवळ नव्हती. व्यक्तिचित्रे काढण्यात मला स्वारस्य होते. या विषयांतील नेमके गुरु माहित नव्हते. एक दिवस बुक डेपोत गेले. सुबोध नार्वेकरांची हाताला लागतील तेवढी पुस्तके आणली, रबर, पेन्सिल अशा काही आवश्यक गोष्टी आणल्या आणि श्रीगणेशा केला.  
तंत्रशुद्ध रीतीने स्केचेस कशी काढायची याबद्दल त्या पुस्तकांत चांगली माहिती होती. मला कोणत्याही प्रदर्शनात चित्रे लावायची नव्हती तरीही माझ्या परीने ती उत्तम काढता यायला हवीत यासाठी मी रोज नेटाने सराव करत होते. प्रापंचिक कामे आणि व्यवसाय सांभाळून उर्वरित वेळ मी या छंदासाठी गुंतवत होते. चित्राचे मोजमाप पट्टीने घेऊन त्याबरहुकूम मी चौकट आखून घेत असे. मग चित्राची बाह्याकृती म्हणजेच आउटलाईन मी रेखाटत असे. सगळ्यात कठीण भाग होता तो चेहऱ्यावरील भाव जसेच्या तसे रेखाटण्याचा. मूळ फोटोवरून नव्हे तर काढलेल्या स्केचवरून मी चित्र रेखाटत होते. 
पहिलेवहिले चित्र रेखाटले आवडत्या सुभाषबाबूंचे ! करारी, तेजपुंज चेहरा. चेहऱ्यावरील कडक शिस्तीचे भाव. राष्ट्रप्रेमाखातर स्वत:ला समर्पित करण्याची वृत्ती आणि जिद्द. तीन तासांनंतर चित्र तयार झाले आणि चित्रपूर्तीचा आनंद मनाला समाधान देऊन गेला. चित्र बऱ्यापैकी जमले होते. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीचे चित्र मी काढले होते ती व्यक्ती सहज ओळखू येत होती.  ती व्यक्ती सुप्रसिद्ध असल्याने सर्वांच्या माहितीची होती. आता अधिक आत्मविश्वासाने हातातून पेन्सिल फिरू लागली. अनेक नामवंत व्यक्ती स्केचेसमधून  साकारू लागल्या. माझ्या लेकींकडून कौतुक आणि प्रोत्साहन मिळू लागले. माझ्या आवाक्याप्रमाणे ही व्यक्तिचित्रे मूर्त होऊ लागली. 
एक पंचवीस-तीस चित्रांचा संग्रहच तयार झाला. कितीतरी गोष्टी नव्याने, शाळकरी मुलीच्या उत्सुकतेने शिकता आल्या. चिकाटीने बसल्यामुळे एका बैठकीत एक चित्र मी पूर्ण करू शकले. शाळेत चित्रे रेखाटायची राहून गेलेली इच्छा इतक्या वर्षांनतर का होईना पूर्ण करता आली.
                                   
रेखाटनात अजूनही कौशल्य यायला पाहिजे ही जाणीव होती. कुणीतरी मला चित्रकलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या एका व्यक्तीचे नाव सुचविले. शिवाय त्या व्यक्तीचे घर माझ्या घरापासून जवळचे असल्याने इतर व्याप सांभाळून हा छंद जोपासणे मला शक्य होणार होते. मी मोठ्या उत्साहात त्यांच्याकडे गेले. मला योग्य दिशेने नेणारा कुशल वाटाड्या हवा होता. मला चित्रकलेत करियर करायचे नव्हते पण जास्तीत जास्त उत्तम रीतीने चित्रे रेखाटायला येणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या व्यक्तीने मात्र माझा संपूर्ण भ्रमनिरास केला. मी रेखाटलेल्या चित्रांची फाईल बघून 'अशी चित्रे तर लहान मुलेही काढतात' असा एक अत्यंत कुत्सित आणि त्यांच्या या क्षेत्रातील वकुबाला न शोभणारा शेरा मारून मला हताश केले. चाळीसाव्या वर्षीही असा शेरा ऐकून मला वाईट वाटले आणि छोट्या मुलांची त्यांच्या शिक्षकांचे अभिप्राय ऐकून  काय अवस्था होत असेल याची मला प्रचीती आली. मला ही कला छंद म्हणूनच जोपासायची होती आणि आहे. या कलेला मला व्यवसायाचे रूप द्यायचे नव्हते. फक्त चित्रे अधिक उत्कृष्ट रीतीने काढता यायला हवीत एवढीच हे शिकण्यामागची माझी धारणा होती. परंतु त्या व्यक्तीने गुरूपेक्षा व्यावसायिक या दृष्टीने माझ्या चित्रांकडे बघितले आणि या क्षेत्रात एवढा लौकिक असतानाही त्या व्यक्तीला असुरक्षित वाटू लागले. असो. अजूनही मी योग्य अशा 'गुरूच्या' शोधात आहे. 

माझी मामेआत्या आणि जयपूर-अत्रौली घराण्याची ज्येष्ठ गायिका कै.कमल तांबे हीचे हे वर रेखाटलेले चित्र. हे चित्र मात्र तिच्या पुस्तकावरील फोटो बघून काढण्याचा मी प्रयत्न केला आहे.  

आणखीही काही व्यक्ती-चित्रे मी रेखाटली आहेत. अभ्यासाच्या आणि संगीताच्या वाढत्या ट्युशन्स यामुळे सध्यातरी या कलेपासून थोडी फारकत झाली आहे. पण काही सांगता येत नाही, उद्या माझ्या हातात शुभ्र कोरा करकरीत कागद, पेन्सिल असे साहित्य असेल आणि एखाद्या व्यक्तीला किंवा शक्तीला कागदावर जिवंत करण्यासाठी मी पुन्हा एकदा तितकीच अधीर झालेली असेन. 

1 comment: