Thursday, 8 March 2012

'वूमन्स डे' च्या निमित्ताने.........

दरवर्षीप्रमाणे ८ मार्च हा दिवस येतो आणि काही मोजक्या विदुषी सन्मानित होताना आपल्याला दिसतात. तेवढ्यापुरता स्त्री-स्वातंत्र्याचा उदोउदो होतो आणि तो दिवस पालटताच पुन्हा जळी-स्थळी पुरुषप्रधान संस्कृती आपले हातपाय पसरू लागते. 

मुळात खरोखरी किती स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य मिळते किंवा ते मिळवता येते ही एक संशोधनाचीच बाब आहे. आजही शहरी स्त्री काय किंवा ग्रामीण स्त्री काय आपल्या अस्मितेसाठी, आपल्या सन्मानार्थ दृढपणे उभी राहिलेली आपल्याला क्वचितच दिसते. अनेक स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतात, स्त्री-भ्रूणहत्या सर्रास केल्या जातात, मुलगा आणि मुलगी असा घृणास्पद भेदभाव त्यांना वाढवताना केला जातो, घटस्फोटित, बलात्कारित, परित्यक्ता, विधवा, आजन्म कुमारिका स्त्रीकडे अत्यंत आक्षेपार्ह नजरेने समाज बघतो. बोडकी, लाल आलवणातील स्त्री ही स्त्रीची बाह्य-प्रतिमा जरी आज लुप्त झालेली असली तरीही समाजाची अशा स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी ही सदोष असते. 'स्त्री म्हणजे आपल्या पायाखालची वहाण' या पुरुषांच्या मानसिकतेला आव्हान देऊन अनेक स्त्रिया निर्भीडपणे  उभ्या राहिल्या आणि स्वत:चे वैचारिक अस्तित्व त्यांनी सिद्ध केले परंतु अशा स्त्रियांची टक्केवारी आजमितीला फारच कमी आहे ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. 
आपलं तान्हुलं पोर पाठुंगळीला घेऊन झाशीची राणी इंग्रजांवर स्वार झाली.संत मुक्ताईने तिच्या ओजस्वी वाणीने समाजोद्धार केला. अहिल्याबाई होळकरांनी समाजहिताचा विडा उचलून निपक्षपातीपणे राज्यकारभार केला.'There is only one man in the Parliament' असा अनोखा सन्मान भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा झाला. मदर तेरेसा यांची करूणामूर्ती अनेक पीडितांच्या जगण्याला अर्थ देऊन गेली. सातासमुद्रापार जाऊन आणि अत्यंत प्रतिकूल शिक्षण संपादन करून डॉ.आनंदीबाई जोशी यांनी तथाकथित समाजव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला. डॉक्टर आयडा स्कडर यांनी भारतात येऊन केलेले सामाजिक वैद्यकीय कार्य मानवतेला भूषणास्पद ठरले. नर्मदा आंदोलन श्रीमती मेधा पाटकर यांच्या कणखर आवाजात चोहीकडे दुमदुमले. कै.साधनाताई आमटे आणि डॉ. सौ.मंदाताई आमटे यांनी अनेक शोषितांच्या, पीडितांच्या, रोग्यांच्या मनात आशेची, चैतन्याची, आनंदाची पालवी निर्माण केली. श्रीमती लतादिदींनी आपल्या अतुलनीय आवाजाने कलाक्षेत्रात क्रांती आणली. श्रीमती पुष्पा शेणोलीकर यांनी स्त्रीपुरोहित म्हणून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात लौकिक मिळवला.  कल्पना चावला यांनी थेट अंतराळात भरारी घेऊन स्वत:चे कर्तृत्व अमर केले. भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी पाऊणशे वयोमान असताना सुखोय भरारी मारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. 
अशा कित्येक स्त्रियांची उदाहरणे आपल्यापुढे असूनही अनेक स्त्रिया वैचारिक प्रकाशापासून अजून सहस्त्र योजने दूर आहेत असे वाटते. अंधाराची सवय जडलेल्या स्त्रिया अधिक आहेत. पिता,नवरा आणि मुलगा ठेवेल तसे राहावे या मानसिकतेला शिकल्या-सावरलेल्या महिलाही छेद देऊ पाहत नाहीत ही मोठी शोचनीय बाब आहे. कौटुंबिक धुरा वाहायची स्त्रीने आणि कौटुंबिक निर्णय मात्र घ्यायचे पुरुषांनी हा फरक न समजण्या इतकी स्त्री अडाणी नाही. परंतु तिचे या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला झुगारून देण्याचे धैर्य कुठेतरी निश्चितच कमी पडते आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक सक्षमता सिद्ध करणारी स्त्री वैचारिक सक्षमता सिद्ध करण्यात थोडी मागे राहते असे मला प्रकर्षाने वाटते. 
स्त्री उच्चशिक्षित असो वा अल्पशिक्षित, उच्चस्तरीय असो वा निम्नस्तरीय , आर्थिकदृष्ट्या सबळ असो वा अल्पबळ आपल्या वैयक्तिक विकासासाठी तिने सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. गाव असो वा शहर असो आपल्या सन्मानासाठी तिने झटणे गरजेचे आहे. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो तिने विचार स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.  कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्त्रीला तिचा वैचारिक अधिकार अबाधित ठेवणे गरजेचे आहे. 
स्त्री स्वातंत्र्याचा उष:काल पहावयाची मनीषा बाळगणाऱ्या स्त्रीला परंपरेने दिलेला अंधार भेदण्यासाठी वैचारिक तलवार परजता आली पाहिजे.   




No comments:

Post a Comment