Wednesday, 24 August 2011

विद्या विनयेन शोभते


"विद्या विनयेन शोभते" हा शाळेच्या वर्गांच्या भिंतीवर असणारा सुविचार आता इतिहासजमा झाला आहे.  विद्या हि अलंकारासारखी वापरल्यास तिची सजावट खुलून दिसते अन्यथा तिच्या सजावटीतून अहंकाराचा दर्प येऊ लागतो. आजकाल तर जितकी जास्त विद्या तितके जास्त उच्च अधिकाराचे पद, तितका जास्त पैसा, तितका जास्त अहं हे जणू समीकरणच झाले आहे. मी तेवढा श्रेष्ठ बाकी सारे कनिष्ठ या भूमिकेतून जो तो दुसऱ्याला पाहत असतो. 
'तू खूप खूप शिकून मोठ्ठा हो किंवा मोठ्ठी हो' हे आशीर्वादपर वाक्य आपण शाळेत असल्यापासूनच ऐकत आलेले असतो. पण तू जरी खूप शिकलास तरी तुझे पाय जमिनीवरच ठेव , तू संपादन केलेल्या विद्येचा गर्व करू नकोस. असं किती वडीलधारे सांगतात? किती शिक्षक सांगतात? त्यामुळेच असं शिकत शिकत माणूस मोठा होतो आणि एकदा का तो मोठा झाला की मग त्याच्या मनात साठलेल्या अहंकाराचा फुगाही वरवर जात राहतो. 
शालेय अभ्यासक्रमात संस्कार नावाचा जो काही प्रकार शिकवला जातो त्या अंतर्गत श्लोक,साने गुरुजींच्या,देशभक्तांच्या काही गोष्टी,झाशीच्या राणीच्या,शिवरायांच्या काही वीररसप्रधान कथा किंवा बिरबलाच्या चातुर्यकथा यांचा फार फार तर समावेश असतो. काही गाणी,नाटुकली यांमधून सामाजिक प्रबोधनाचे थोडेबहुत बाळकडू पाजले जाते. परंतु इतिहासापासून प्रेरणा आणि बोध घेऊन त्यातील चांगल्या गोष्टी जर वर्तमानात अंमलात आणल्या तर आपला भविष्यकाळ सुकर होईल याचे ज्ञान चिमुकल्यांना कुणी देते का? इसापनीती आदी गोष्टींमधले तात्पर्य मुलांच्या मनावर किती प्रभावीपणे ठसविले जाते? 
शाळेतील सहामाही,वार्षिक परीक्षांमध्ये अव्वल येणारी मुलं इतर मुलांना कस्पटासमान समजू लागतात. उत्तम मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक साधारण मार्क मिळवणाऱ्या मुलांसोबत आपल्या पाल्ल्याला फिरकू देत नाहीत. शिक्षकही अशा काही निवडक विद्यार्थ्यांना जास्त 'फेव्हर' करतात. परिणामी शिक्षक,विद्यार्थी आणि पालक या तीनही स्तरांवर गटबाजी सुरु होते. अहंकाराची सुप्त बीजे मनात रुजू लागतात. वास्तविक पाहता इतर  विद्यार्थी खेळ,एखादी कला यात जास्त सरस असतात पण फक्त शालेय अभ्यासक्रमाची झापड लावलेले काही शिक्षक,विद्यार्थी आणि पालक हे त्यांचं कसब अतिशय गौण ठरवतात. 
मुले शाळा,कॉलेज हे शैक्षणिक टप्पे यशस्वीरीत्या पार करत आपल्या कर्तृत्वावर उत्तम नोकरी मिळवतात,काही विदेशी जाऊन स्थायिक होतात . यांच्या अहंकाराचा फुगा दिवसेंदिवस फुगत राहतो. वास्तविक पाहता यांना मिळालेल्या गलेलठ्ठ पगाराचा फायदा यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कुणालाही  होणार नसतो. मग सुमार शिक्षण घेऊन नोकरीसाठी उरस्फोड करणारी माणसे यांच्या टीकेचे लक्ष्य ठरतात. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्यांना हे मौलिक उपदेशांचे डोस पाजू पाहतात. एखाद्याचं आयुष्य आपल्याला असलेल्या ज्ञानातून सुकर करावं हा त्यामागील हेतू नसून त्यांना आपल्यातील शैक्षणिक कमतरतेची जाणीव करून द्यावी असा त्यामागील विचार असतो. 
उंच,विशाल वाढलेले वृक्ष हे एखाद्या तपस्व्यासारखे असतात. त्यांची मुळे जमिनीत घट्ट असतात. त्यांना लगडलेली मधुर,रसाळ फळे हि त्यांच्या परिपक्वतेची प्रचीती देणारी असतात. आपल्या लांबच लांब पसलेल्या फांद्यांमधून ते येणाऱ्या-जाणाऱ्यांवर शितलतेची सावली धरत असतात. पांथस्थ त्यांच्या छायेत येऊन सुखावतात, मधुर फळांचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. हे वृक्ष क्लांत मनाला श्रांत करतात. 
वृक्षांवर  निबंध लिहून बक्षिसे मिळवणारी "हुशार" मुलं शिकून खूप मोठ्ठी झाल्यावर या वृक्षराजांचा आदर्श डोळ्यांसमोर का ठेवत नाहीत? 

1 comment: