Tuesday 22 December 2015

मनातील गुन्हेगारी न बदलू शकणारा कायदा ……


निर्भया प्रकरणातील वयाने 'बाल' पण कृतीने 'प्रौढ' असलेला आरोपी सुटला आणि संपूर्ण देशात गदारोळ उठला. निर्भयाच्या पालकांना त्यांना झालेल्या वेदनांची पुन्हा एकदा उजळणी करावी लागली. बाल आरोपीचे नक्की कोणते वय शिक्षेसाठी ग्राह्य धरावे यावर अनेक वाहिन्यांवर खल सुरु झाला. अनेक विचारवंतांची मते पुन्हा एकदा चर्चेत आली. अखेर त्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या आणि १८ ऐवजी १६ असे वय शिक्षेसाठी निश्चित करण्यात आले. तसा कायदा संमत झाला. ही बाब कितीही स्तुत्य असली तरी या नव्या कायद्यामुळे सामाजिक परिवर्तन होऊन बाल गुन्हेगारीला आळा बसेल किंवा हा नवा कायद्याचा बडगा मुलांच्या मनात भीती निर्माण करू शकेल व त्यामुळे अशा गुन्ह्यांचे प्रमाण घटेल असे समजणे हा बालिशपणा ठरेल.         
मूल हे दोन ठिकाणी घडत किंवा बिघडत असते. एक म्हणजे घर आणि दुसरे म्हणजे शाळा. एखाद्या चांगल्या अथवा वाईट कृतीची पहिली पायरी म्हणजे विचार. विचारात आचाराची बीजे असतात. शाळेत भिंतींवर सुविचारांच्या अनेक पाट्या असतात पण यातील विचार विद्यार्थ्यांच्या मनात खरोखर बिंबले गेले आहेत की नाही हे पडताळून पाहण्याची नैतिक जबाबदारी किती शाळा घेतात? घरात किती पालक मुलांच्या मनात चाललेल्या उलटसुलट विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात? मुलांचा आचार हे त्यांच्या मनातील विचारांचे प्रकटीकरण असते हे पालक आणि शिक्षक यांना समजू शकत नाही का? उत्तम मार्क मिळवलेला आणि शाळेत अव्वल आलेला मुलगा अथवा मुलगी मनाने निकोप आणि निरोगी आहेत याची ग्वाही शिक्षक वा पालक देऊ शकतात का? 'value education' अशा नावाचा एक विषय शाळेत केवळ देखाव्यापुरता लावला जातो. यातून खरंच काही 'value addition' होते आहे का हे तपासून पाहण्याची जबाबदारी कुणाची?    
आजकाल ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल नामक खेळणे असते. लहान लहान मुले त्यावर बघू नये ती दृश्ये घोळक्याने बघत रस्त्यावर उभी असतात. मग त्यावर अचकट -विचकट चर्चा करतात. अत्यंत बीभत्स बोलतात. अशावेळी त्यांच्यातील 'बाल्य' लुप्त होते. त्यांचे हातवारे अन हावभाव प्रौढ माणसांसारखे होतात. वाईट विचार करण्यासाठी वय नसतं पण आचार करण्यासाठी मात्र वय निश्चित केलं जातं. आता १६ वयोमानाची व त्याखालील मुले असा अश्लाघ्य विचार आणि आचार करायला मोकळी आहेत कारण त्यांना गुन्हा केल्यानंतर शिक्षा म्हणून निरीक्षण गृहात पाठवलं जाईल पण यापलीकडे काही होणार नाही. या कायद्यामुळे १६ ते १८ वयोगटातील मुले घाबरून जातील असे समजण्याचे कारण नाही कारण कायद्यात पळवाटा बऱ्याच आहेत शिवाय वयाचे खोटे दाखलेही देता येतातच की! असा एखादा कायदा ही नुसती वरवरची मलमपट्टी आहे पण समाज पोखरत चाललेल्या या विचार व आचारांच्या वाळवीला समूळ उपटून टाकण्यास हा कायदा असमर्थ आहे.  
सामाजिक परिवर्तन हवे असेल, चांगला आचार मुलांच्या हातून घडायला हवा असेल तर त्यासाठी चांगला विचार करण्यास या मुलांना उद्युक्त करायला हवे. या मुलांना मुक्या प्राण्यांच्या, छोट्या बालकांच्या सहवासात राहायला देऊन त्यांच्या मनात सहृदयता जागी करायला हवी. त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहू द्यावे कारण निसर्ग हा परमोच्च गुरु आहे. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या विचारवंतांचे चरित्र या मुलांना उलगडून सांगण्याची आज नितांत गरज आहे. चांगल्या विचारांची बीजे मुलांच्या मनात रुजवण्यासाठी पालक आणि शिक्षक या दोन्ही आधारस्तंभांनी कार्यरत होण्याची आज सर्वात जास्त गरज आहे. काय बघावे, काय बघू नये, काय बोलावे, काय बोलू नये, काय ऐकावे, काय ऐकू नये याचप्रमाणे विचार कसा करावा वा कसा करू नये याविषयी मुलांना लहान वयातच जागरूक करायला हवे. नाहीतर अशा मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली होऊन सुद्धा वैचारिक प्रगती खुंटेल. मुलाने मिळवलेल्या चांगल्या मार्कांची जरूर प्रशंसा करा पण त्याचे विचार योग्य मार्गानेच पुढे जात आहेत ना याचीही खात्री करून घ्यायला विसरू नका.                
आमची पिढी आजी-आजोबांनी सांगितलेल्या कर्तृत्ववान माणसांच्या गोष्टी ऐकत मोठी झाली. आज आजी-आजोबा ही संस्थाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आई-वडिलांची जबाबदारी अधिक वाढली आहे. थोर पुरुषांच्या स्फूर्तीदायक कथा मुलांच्या संस्कारक्षम मनावर उत्तम परिणाम करून त्यांना भावी आयुष्यात सत्प्रवृत्त होण्यास खचित मदत करू शकतात. मुलांना नुसतं साक्षर करून उपयोग नाही तर त्यांना सुसंस्कृत करणं आवश्यक आहे. त्यांच्या भरकटणाऱ्या नावेला सुयोग्य दिशा हे पालक आणि शिक्षक सहज दाखवू शकतात फक्त त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.        
शिक्षेसाठी वय १६ की १८ ही चर्चाच गौण आहे. मुळात असे गुन्हे घडूच नयेत यासाठी सामाजिक घटकांनी सजग राहायला हवे. 'मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती' अशा घोषणा देत आम्ही वर्षानुवर्षे बालदिन साजरा केला. आता 'मुले हीच राष्ट्राची खरी आपत्ती' असे म्हणायची पाळी या समाजावर कधीही येऊ नये एवढीच पार्थना तमाम पालक आणि शिक्षकांच्या चरणी!     

No comments:

Post a Comment