Thursday 17 December 2015

लोकलचा जीवघेणा प्रवास ….


माझ्या सुदैवाने मला अशा ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून फारसा प्रवास करावा लागला नाही. नोकरीच्या निमित्ताने अगदी अल्पकाळ मी लोकलमधून ऑफिस अवर्समध्ये प्रवास केला. अर्थात त्यावेळेस या प्रचंड गर्दीची आणि त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची झलक नक्कीच पाहायला मिळाली. लोकलमधून प्रवास करणे म्हणजेच जीव मुठीत धरणे. ह्या दैवभोगाला ज्यांना रोज सामोरे जावे लागते त्यांच्या हालाची कल्पनाही करवत नाही.      
माझी एक आत्या कांदिवली ते वसई दरम्यान नोकरीसाठी प्रवास करायची. तिचा किमान दोन ते तीन वेळा चढता-उतरताना हात मोडला होता. म्हणजे नोकरी तर अपरिहार्यपणे करायची आणि रेल्वे प्रशासनाकडून असा बोनसही मिळवायचा.  दादरला उतरताना आपले दोन्ही पाय गमावून बसलेली व त्यानंतर जीवही गमावून बसलेली तसेच भर गर्दीत आपला केवळ वीस वर्षाचा जीव गमावलेला असे दोघे माझ्या सोसायटीमधील होते. अशी असंख्य उदाहरणे आपल्या अवतीभवती वावरत असतात. कुणाला परत एकदा जगण्याची संधी मिळते तर कुणापासून ती पहिल्या फटक्यातच हिरावून घेतली जाते. कुणी अपघातानंतर जन्मभर अपंगावस्थेत जगण्याची शिक्षा भोगतात.       
प्रचंड वाढती लोकसंख्या आणि अपुरी वाहतुकीची साधने यामुळे हे दुष्परिणाम चाकरमान्यांना रोज सहन करावे लागतात. शहरे 'स्मार्ट' करण्याआधी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे व त्यासाठी काही कडक उपाययोजना करणे, जास्तीत जास्त वाहतुकीची साधने उपलब्ध करून देणे, ओव्हरहेड वायर्स, पेंटोग्राफ याविषयी जागरूक असणे, गाड्या 'डिरेल' न होण्याची खबरदारी घेणे, ज्या लोकांच्या जीवावर सरकार निवडून आलं आहे त्या जनतेचा दैनंदिन प्रवास सुखकर व्हावा यासाठी कार्यरत राहणे याचे भान सत्ताधारयांनी सतत ठेवले पाहिजे.  

रेल्वे अपघात झाला की पीडितांना तात्पुरती मदत देऊन, वाहिन्यांना काही 'इमोशनल बाइट्स' देऊन प्रशासन हात झटकते. रोज वाढत जाणारी platform वरील गर्दी, गाड्यांची अनियमितता, खिसेकापू, भिकारी, फेरीवाले यांची गर्दीतील अव्याहत लुडबुड, प्रसाधनगृहांची कमालीची अस्वच्छता, रेल्वे वेळापत्रकाचा उडालेला बोजवारा, त्यात कधी येणारी नैसर्गिक तर कधी यांत्रिक संकटे यामुळे लोकलने प्रवास करणे  म्हणजे मागील जन्मी केलेल्या पातकांचे प्रायश्चित्त घेणे असे वाटू लागले आहे. गरोदर बायका, लहान मुले आणि वृध्द यांनी या रेल्वेच्या माध्यमातून प्रवास टाळावा इतपत हा प्रवास असुरक्षित झाला आहे.     
लोकल स्टेशनात आली की मागचा-पुढचा विचार न करता लोक धावत सुटतात.  'सीट' मिळवण्याची प्रत्येकालाच इतकी घाई असते की त्यापायी आपण कुणाचे शारीरिक नुकसान तर करत नाही याचे साधे भानही कुणाला उरत नाही. भर गर्दीच्या वेळेस लोकलमधून इच्छित स्थळी चढणे आणि उतरणे हा एक जीवावर येणारा अनुभव असतो. रेल्वेच्या डब्यात भल्या सकाळी प्रवास करणे हा एक दुर्गंधीयुक्त असाही अनुभव असतो. गाडीच्या दुतर्फा हेच दृश्य असते आणि ते फुटबोर्ड वर उभे राहणाऱ्यांना इच्छा असो वा नसो पण बघावेच लागते. गाडीत सीट वरून भांडणे, गलिच्छ शिवीगाळ हेही नित्याचेच असते. काही वेळेस मारामारीपर्यंत हे वाद जातात. रोज या नरकातून जाण्यापेक्षा मरण बरे अशी अनेकांची भावना असते.             
हे सारे वर्षानुवर्षे तसेच आहे. तसूभरही बदललेले नाही. चाकरमान्यांचे लोंढे मात्र दिसामाशी वाढताहेत. संकुचित आकाराच्या ब्रिजवरून  येणारी-जाणारी भीषण गर्दी बघून चेंगराचेंगरीच्या अपघाताचे सतत भय वाटत राहते. सकाळी रेल्वेमधून गेलेली आपल्या घरातील व्यक्ती सुखरूप परत येईल ना अशी शंका अनेक गृहिणींच्या, वडीलधारयांच्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरे आधुनिक आणि स्मार्ट बनवायची आणि जनतेच्या दैनंदिन गैरसोयी, मुलभूत गरजा दुर्लक्षित करायच्या या प्रशासनाच्या अजब न्यायाविरुध्द आवाज उठवण्याची आज खरी गरज आहे.   
मुंबईची 'लाईफ लाईन' असे जिचे वर्णन केले जाते ती लाईफ देणारी आहे की हिरावून घेणारी आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आज आली आहे.   

No comments:

Post a Comment