Friday 16 January 2015

भावगीतांचे भावविश्व उलगडणारे संतूर ……


 गोविंदराव पटवर्धनांच्या संवादिनीतून नाट्यगीतांचे चांदणे सांडते. प्रभाकर जोगांच्या व्हायोलीनमधून हिरवा चाफा फुलतो. तद्वत उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपतात. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ वादक आहे.  
कोणतीही अजरामर नाट्यगीते वा लोकप्रिय भावगीते वाद्यावर प्रस्तुत करायची म्हणजे कलाकारापुढे मोठेच आव्हान असते. एकतर त्या विशिष्ट गाण्यांशी रसिकश्रोत्यांचा ऋणानुबंध अगोदरच जुळलेला असतो. गाण्यातील शब्द न शब्द परिचयाचा असतो. चाल मनात पक्की रुतलेली असते. काही जागा व त्यातील बारीक बारीक हरकती याचा  इंच न इंच आलेख कानसेनांच्या डोक्यात तयार असतो. अशा वेळेस ते गाणे जसेच्या तसे वाद्यावर वाजविणे ही कलाकाराच्या संगीतविषयक जाणिवेची परीक्षाच असते. कलाकाराच्या मनात दडलेले गाणे वाद्यामार्फत रसिकाच्या अंतर्मनात प्रवाहित करावयाचे असते. असे रसिकहृदयाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य या गुणी कलाकाराच्या संतूरवादनात खचितच आहे. 
पं. उल्हास बापट यांनी संगीताचे रीतसर शिक्षण श्रीमती झरीन शर्मा,  पं.के जी गिंडे आणि  पं. वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींकडून घेतले. 'Chromatic' ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत आहे. संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती  पण पं.उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या  'Chromatic' पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत आहे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'Chromatic'  पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करतात.      
पं. उल्हास बापट यांचा आणि माझा परिचय तसा खूप जुना आहे. त्यावेळेस माझा भाऊ त्यांच्याकडे संतूर शिकत होता. मी त्यावेळेस एका पेपरसाठी संगीत परीक्षणे लिहित होते. त्यांची मुलाखत या निमित्ताने घेण्याचा योग आला. अतिशय तत्वनिष्ठ, प्रामाणिकपणे काम करणारा, प्रयोगशील, साधा पण परखडपणे आपली मते व्यक्त करणारा असा हा कलाकार आहे. माझ्या 'गातात शब्द माझे' या स्व-रचित कार्यक्रमातील काही गाण्यांची दोन कडव्यांमधील स्वररचना सुद्धा त्यांनी करून दिली या गोष्टीचा मी इथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छिते.        
तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अवीट गोडीच्या गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येईल. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला आहे.         
पं.उल्हास बापट म्हणतात त्याप्रमाणे 'मन' असलेला कलाकार आणि 'कान' असलेला श्रोता यांचा सुयोग झाला तर तो दुग्धशर्करा योगच की !   



No comments:

Post a Comment