Wednesday 17 October 2012

इंग्लिश विंग्लिश - एक नितांत सुंदर चित्रपट

अशक्यकोटीतील गोष्टी करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे, लाखो-करोडो रुपयांचा चुराडा करून चांगल्या वाहनांचे क्रियाकर्म करणारे, मनोरंजनाच्या गोंडस नावाखाली अत्यंत टुकार आणि खालच्या दर्जाचे विनोद दाखवणारे चित्रपट पुन्हा पुन्हा जन्माला येतच असतात परंतु अशा चित्रपटांतील कथानकात 'जीव' नावाची वस्तूच नसते. या अशा चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर नव्याने बॉक्स ऑफिसवर झळकलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट असे कोणतेही नेत्रदीपक खेळ न करताही प्रेक्षकांची मने काबीज करण्यात यशस्वी झाला आहे. 
हा स्त्री-प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मध्यमवयीन स्त्रीची आहे. ज्या स्त्रीचे संपूर्ण विश्व हे तिच्या पतीराजांभोवती आणि मुलांभोवती फिरत असते. स्त्रीला कमी समजणे हा भारतातील राष्ट्रीय छंद आहे असे मानण्यास हरकत नसावी. काही स्त्रियाही आपल्या अज्ञानपूर्ण वागणुकीने हा समज फोफावण्यासाठी हातभार लावीत असतात. तर अशा कुटुंबातील या गृहिणीचा एकमेव छंद असतो म्हणा किंवा तिला आवड असते म्हणा ती लाडू बनविण्याची! घराच्या घरी लाडूंचे उत्पादन करून ते घरोघरी विकणे हा तिचा गृहोद्योग असतो. या गृहिणीची कमतरता कोणती असेल तर ती म्हणजे सफाईदार इंग्लिश न बोलता येणे.या तिच्यातील उणीवेमुळे अनेकदा ती घरच्यांच्या विनोदाचा, चेष्टेचा विषय ठरते. तिच्या अडाणीपणाला, इंग्रजीच्या अज्ञानाला नवरा हसतो आणि मुलेही हसतात. तिच्या मुलीला आईला शाळेत नेण्याची लाज वाटते. अशा या गृहिणीला एकटीला कारणपरत्वे न्यूयॉर्कला जावे लागते आणि सुरवातीला तेथील वातावरणाला घाबरलेली, बुजलेली ती काही दिवसांनी मोकळी होते. काही कडवट अनुभव पचवत ती स्वत:ला सिद्ध करते आणि घरच्यांच्या कुतूहलाचा आणि आदराचा विषय होते.  
विषय स्त्री-प्रधान, या चित्रपटाची दिग्दर्शिका सुद्धा एक स्त्रीच आहे. अतिशय संवेदनशील पद्धतीने या चित्रपटाची हाताळणी झालेली आहे. शशी गोडबोले नावाच्या एका मध्यमवर्गीय, अत्यंत साधे आयुष्य जगणाऱ्या या स्त्रीचा हा प्रवास अतिशय प्रशंसनीयरित्या गौरी शिंदे यांनी दाखविला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्रीदेवीनेही या भूमिकेला यथोचित न्याय दिला आहे. तिचा या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' मधील वावर आणि तिच्या साध्या पण सुंदर साड्या ही या चित्रपटाची सौदर्यस्थळे आहेत. चित्रपटातील सर्वांची कामे अत्यंत चोख आहेत. कोठेही 'लुपहोल्स' जाणवत नाहीत. आपल्या आईला इतर आयांसारखे इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तिला कमी लेखणे, तिचा राग करणे, तिचा आदर न करणे इ. गोष्टी हृदयाला भिडतात. नवीन नवीन इंग्लिश शब्द शिकताना, वाक्ये जुळवताना, ऐकताना हळूहळू शशीचा आत्मविश्वास दुणावू लागतो आणि तिच्या भाचीच्या लग्न-समारंभात एक छोटेखानी परंतु अतिशय हृद्य असे भाषण करते. पतीचे प्रेम मिळूनही ज्या आदराला ती आतापर्यंत मुकलेली असते तो आदर, ते कौतुक ती अखेर पतीच्या डोळ्यांत पाहते आणि इथे चित्रपट संपतो.  
अगदी छोट्या छोट्या 'फ्रेम्स' मधूनही मानवी स्वभाव वैशिष्ट्ये दाखवण्याचे गौरीचे कसब वाखाणण्यासारखे आहे. कोणतेही भव्य-दिव्य सेट्स न वापरता, अंगावर येणारे श्रीमंती थाट न दाखवता अगदी साधेपणाने या विषयाची मांडणी केली गेली आहे. अनेक वर्षांनी एक निखळ चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान माझ्या मनाला मिळाले. याबद्दल या चित्रपटाच्या अस्तित्वासाठी  कारण ठरलेल्या प्रत्येकाचेच मनापासून आभार!  प्रत्येकाने आवर्जून पाहावा आणि त्यापासून बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे यात शंका नाही.      

No comments:

Post a Comment