Tuesday 27 September 2011

पन्नाशी

पंचवीस सप्टेंबरला रात्री दीड वाजता मी माझ्या वयाची पन्नाशी पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला. त्यामुळे सव्वीस सप्टेंबर रोजी मी अधिकृतपणे पन्नास वर्षांची झाल्यामुळे लोकांच्या अभिनंदनास पात्र झाले होते. सकाळपासून मोबाईल वाजू लागला. जो तो मी पन्नास वर्षांची झाल्याचे त्याच्या अभिनंदनपर कौतुकातून मला सुचवू पाहत होता. काही ज्येष्ठ व्यक्तींना हळूहळू माझे वय त्यांच्या जवळ किंवा त्यांच्या दिशेने सरकत असल्याचे पाहून सुप्त आनंद होत होता. ही आता आमच्या पंक्तीत आली असा लबाड आनंदही काहींच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. 
सकाळपासून मी फोन उचलण्यात माधुरी दीक्षितच्या सेक्रेटरीपेक्षाही जास्त व्यस्त होते. पन्नासाव्व्या वाढदिवसाबद्दल   अभिनंदन!  ज्याला त्याला धन्यवाद देताना मला वाटत होते की मला पन्नाशीपर्यंत नेण्यात माझे कर्तृत्व ते काय? लोक पंच्याहत्तरी गाठतात, नव्वदी गाठतात कारण कुठलाही आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती त्यांना तोपर्यंत गाठत नाही म्हणून. माझ्या आयुष्यात प्रथमच मी पन्नाशीचा अनुभव घेत असल्याने थोडीशी हुरळूनही गेले होते.  कशी असते ही पन्नाशी ? ती आपल्याला तुझे उमेदीचे दिवस आता सरले असे म्हणून वाकुल्या दाखवते की आता तुझं सरतं वय म्हणून तुला काळजी घ्यायला हवी अशी गंभीर सूचना देते?  आत्तापर्यंत खूप काम केलंस आता थोडी विश्रांती घे असं सांगते की यापुढेही कामात व्यस्त रहा अन्यथा वांझोट्या चिंतांनी मेंदू आणि मन पोखरून निघेल असं सांगते? ऊन-थंडी-वाऱ्यापासून स्वत:चा बचाव कर असं सांगते की "स्टील यू आर यंग" असं सांगते? सर्दी-खोकला-ताप अंगावर काढू नकोस असं सांगते की वारंवार डॉक्टरकडे जाण्याइतकी  तू वयस्कर झाली नाहीस असं सांगते? अरबट-चरबट ,आंबट-चिंबट खाऊ नकोस ,बाधेल असं सांगते की खाल्ल्यावर निदान शतपावली घाल असं सांगते? आता चिडचिड ,रागावणं ,धुसफूस कमी कर असं सांगते की राग काबूत ठेवण्यासाठी योगा, ध्यान, नामस्मरण कर असं सांगते?    
तिशी-चाळीशी-पन्नाशी- साठी -सत्तरी पार केलेली कित्येक माणसे माझ्या अवतीभवती वावरत आहेत. त्यांच्यात असा काय बदल झाला आहे? असा प्रश्न मला पडला. वयाच्या अगदी विशी-तिशीत हट्टी, आडमुठी,अहंकारी, तिरसट,कुचकट ,विक्षिप्त, कारस्थानी वागणारी माणसे साठी-सत्तरीतही तशीच वागताना आढळतात. फक्त ज्यांच्याशी असे वागायचे ती माणसे,ती पिढी बदलत राहते. आई-वडील,भावंडे यांची जागा सासू-सासरे,दीर-नणंदा घेतात, पुढे पोटची मुले ,त्यानंतर नातवंडे अशा पिढ्या ,घरे बदलतात पण स्वभाव आचंद्रसूर्य राहो तसाच असतो. काही माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नासावा म्हणून सतत कार्यरत असतात. काही माणसे असुयेच्या भावनेने थबथबलेली असतात तर काही माणसे इतरांना कस्पटासमान लेखण्यात इतिकर्तव्यता मानतात. काही माणसे उगाचच इतरांच्या चिंता करण्यावाचून आयुष्यात दुसरं काहीच करत नाहीत. हे असं सगळं असताना केवळ शारीरिक वय वाढलं म्हणून नेमका कसला आनंद साजरा करायचा? 
सकाळी उठून बगीच्यातील फुलांशी बोलायचं सोडून  दुधवाला ,कचरेवाला,कामवाली  यांच्या प्रतीक्षेत आपण किती वेळ घालवतो? रात्री झोपताना मन आणि चित्तवृत्ती शांत करणारं मृदू संगीत ऐकण्याऐवजी टी.व्ही. मालिकांमधील इतरांच्या भानगडी, त्यांचे डावपेच, त्यांची रडणी ऐकण्यात आपण धन्यता का मानतो? आपल्याच मुलांशी सुसंवाद साधण्याऐवजी नेमके त्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांच्याशी वाद का उकरून काढतो? देऊळ या पवित्र जागी जाऊन आपल्याला निर्व्यंग जन्म दिल्याबद्दल, आत्तापर्यंतच्या आयुष्यात व्याधीमुक्त,व्यसनमुक्त,आर्थिक चणचणमुक्त ठेवल्याबद्दल त्या जगनियंत्याचे  आभार मानायचे सोडून आपण आपापल्या सुनांच्या कागाळ्या करण्यात का सुखावतो? आपण डोळस असूनही आपल्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी नजरेआड का करतो? आपण बहिरे नसूनही आपल्या स्वभावाबद्दलची इतरांची मते केवळ अहंकारापायी आपण ऐकून न घेता त्यात योग्य तो बदल का  करत नाही? आपण हाती-पायी धड नव्हे भक्कम असताना तिने किंवा त्याने आपल्यासाठी अमके करावे,ढमके करावे म्हणून का हट्ट धरून बसतो? 

वय वाढल्यानंतर माणसाची परीपक्व्वता वाढत नसेल, त्याची क्षमाशीलता , शांत वृत्ती वाढीस लागत नसेल,  आपल्या माणसांची जगण्यातली धडपड समजून घ्यायचा  तो किंवा ती प्रयत्न करत नसेल , आपल्या विचित्र वागण्यापायी दुसऱ्यांची होत असलेली घुसमट,होरपळ त्याला जाणूनबुजून दिसत नसेल तर त्या बुजुर्गपणाचे, त्या ज्येष्ठपणाचे का अवडंबर माजवायचे? 
शेवटी आपल्या आयुष्यातला  एक दिवस कमी झाल्याची जाणीव करून देणारा वाढदिवस दुसऱ्याच्या आयुष्यातील सुखाचे क्षण वाढवण्यात खर्ची पडला तरच तो खऱ्या अर्थाने अभिनंदनीय होईल असे मला मनापासून वाटते.

No comments:

Post a Comment