Sunday 11 September 2011

तेथे कर माझे जुळती



जसा फुलांना सुगंध असतो तसा गाण्यांनाही असतो. लताचं मोगरा फुलला हे गाणं, आशाचं प्रभाते सूर नभी रंगती हे गाणं आणि सुमनच पक्षिणी प्रभाती चारीयासी जाये हे गाणं प्रात:कालचा सुगंध  घेऊन येतं. माझ्यासारख्या अनेकांची मंगल प्रभात या स्वरांबरोबर सुरु होते. लता-आशा-सुमन या आवाजांच्या त्रिवेणी संगमात अनेक पिढ्या नखशिखांत न्हाऊन निघाल्या. दिवस त्यांच्याबरोबर सुरु होतो, मध्यान्हीलाही त्यांचेच सूर शीतलता देतात  आणि रात्रीलाही त्यांच्याच सुरांची सोबत हवीहवीशी वाटते. देश-भाषा-प्रांत-सीमा-वर्ण-जात या सर्वांच्या पलीकडे जात हे निखळ स्वरांचं चांदणं अहोरात्र बरसत असतं. चंदन कसं सहाणेवर जितकं उगाळाव तितकं दाट होतं त्याचप्रमाणे लता-आशा-सुमन या तिघींचे स्वर जितके आत झिरपतात तितकी त्यांच्या स्वरांशी आपली बांधिलकी अधिक गहिरी होत जाते. त्यांच्या गाण्यांची मोजदाद तरी कशी करायची? त्यांच्या गाण्यांतून लुटलेला आनंद कोणत्या परिमाणात मोजायचा? 
  लताचं जयजयवंती रागातील मनमोहना बडे झूठे, भैरव मधील जागो मोहन प्यारे, बिहाग मधील तेरे सूर और मेरे गीत , यमन मधील जिया ले गयो जी मोर सावरिया,पटदीप मधील मेघा छाये आधी रात ,मधुवंती मधील रस्मे उल्फत, सोहनी मधील कुहू कुहू बोले कोयलिया किंवा भैरवी मधील सावरे सावरे ही आणि अशी अवीट गोडीची असंख्य गाणी म्हणजे कानसेनांसाठी कुबेराचा खजिना आहे.
 आशाचं अबके बरस भेजो भय्याको बाबुल, काली घटा छाये मोरा जिया तरसाये, छोटासा बालमा,कतरा कतरा जीने दो , झूठे नैना बोले, ये क्या जगह है दोस्तो, यू सजा चांद, रुदाद -ए- मुहब्बत , सलोना सा सजन है अशा  कितीतरी गाण्यांवर आपण आपलं हृदय ओवाळून टाकलं आहे.  
सुमनच जुही की कली मेरी लाडली, दिल एक मंदिर है, अजहून आये बालमा, न तुम हमे जानो, गरजत बरसत सावन आयो रे, एक आग सी वो दिलमे , मेरे आसुओ पे नजर न कर अशा एकाहून एक सरस गाण्यांनी आपले कान तृप्त केले आहेत.
लता-आशा-सुमन या नितळ-निखळ स्वरांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आहेत. मराठी अभंग असोत ,भावगीते असोत, गझल्स असोत,अंगाई-गीते  असोत ,लावण्या असोत, देशभक्तीपर गीते असोत वा बालगीते असोत एकेका गाण्याचं रत्न करून ते रसिकांच्या हृदयाच्या कोंदणात बसवण्याच कसब या त्रयीकडे आहे. 
आज या तिघी शारीरिक दृष्ट्या वार्धक्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत हे सत्य जरी स्वीकारलं तरी अनेकांचं असहाय,जर्जर वार्धक्य या तिघींच्या स्वरांच्या सोबतीने सुसह्य झालं आहे. काळवेळ , दुखणी-खुपणी, एकटेपणा विसरायला लावणारं हे स्वरांचं रामबाण मलम आहे. माझ्या मनाला व्यापून राहिलेले त्यांचे सूर मला अंतर्मुख करतात . अंगणातल्या तुळशी-वृन्दावनापुढे ज्याप्रमाणे आपण भक्तिभावाने हात जोडतो त्याप्रमाणे त्यांच्या स्वर-सामर्थ्यापुढे मी आदराने नतमस्तक होते. अशा वेळी कविवर्य बा.भ.बोरकरांच्या ओळी आठवतात. 

                                                           दिव्यत्वाची जेथ प्रचीती 
                                                             तेथे कर माझे जुळती 



No comments:

Post a Comment