Monday 26 September 2011

कवितेचा कारखाना

हे शीर्षक जरा विचित्र वाटेल तुम्हाला पण त्याला माझा नाईलाज आहे. मला एका मिटींगसाठी बोलावणं आलं. काही कवी आणि कवयित्री त्यात सहभागी होणार होते. एका शाळेत आम्ही एकत्र जमलो. आम्हाला एक कल्पना सुचवली गेली. वर्गावर्गात जाऊन मुलांना कविता करायला शिकवायच्या. यातून नवकवी निर्माण होतील, काव्याविषयी आत्मीयता वाढीस लागेल, मराठी भाषा वाचेल आणि कवित्व वाहत राहील हा उदात्त हेतू मनात बाळगून कुणीतरी हा भयानक घाट घातला होता. सर्वात कळस म्हणजे या उपक्रमाचे नाव होते- कवितेचा कारखाना. 
कारखाना हा वाहनांचा असतो, खेळण्यांचा असतो, विद्युत उपकरणांचा असतो, शस्त्रास्त्रांचा असतो असे आजपर्यंत मी ऐकले होते. पण कारखाना हा कवितेचाही असू शकतो ही माहिती मला अगदीच नवीन होती. नाण्यांच्या टाकसाळीप्रमाणे कवितेचीही टाकसाळ का असू नये असा प्रश्न एखाद्या कवीच्या मनात नक्कीच आला असणार. टाकसाळीतून भराभरा शब्द उपसायचे आणि ते कारखान्यातील एखाद्या यंत्रात टाकून त्यातून भसाभसा कविता ओतायच्या अशी एखादी नवकल्पना कुणाच्या तरी मनात विजेसारखी चमकली असणार. या कल्पनेने मी अंतर्बाह्य थरारले. लोक किलोंच्या भावाने कविता विकत घेण्यास रांगेत केव्हाचे तिष्ठत उभे आहेत असे काल्पनिक दृश्यही माझ्या डोळ्यांसमोर तरळले.    
एक होता काका-त्याला भेटला बोका किंवा एक होता हरी-त्याला दिसली परी, एक होता भाऊ-त्याला मिळाला खाऊ, एक होता धोंडू-त्याने टोलविला चेंडू अशा कवितांचे मुखडे माझ्या डोळ्यांसमोर रुंजी घालायला लागले. वर्गावर्गातील इतिहास,भूगोल,गणित,शास्त्र हे विषय बाद होऊन त्याजागी फक्त मराठी कविता हा एकमेव विषय दिसू लागला. शिक्षक आणि विद्यार्थी काव्यजोडणीच्या नादात गर्क होऊन गेले. अनुभवी कवींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थी शाळा नामक कारखान्यात  बसून  कवितांची मॉडेल्स तयार करू लागले. आकर्षक कवितांना बाजारपेठेतून मागणी येऊ  लागली. कवितांचे उत्पादन, आयात,निर्यात, जाहिराती , चढाओढ , निर्देशांक असे काही व्यापारी शब्द आणि संदर्भ मनाला घेराव घालू लागले. 
केशवसुतांनी स्वप्राणाने फुंकलेली तुतारी कारखान्यात तयार होऊ लागली, हिरव्या मखमालीवर खेळणारी  बालकवींची फुलराणीही बाजारात तयार होऊ लागली. खानोलकर,मर्ढेकर, कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला शह देणारी प्रतिभा कारखान्यात तयार होऊ लागली. इंदिरा संत,पद्मा गोळे,संजीवनी मराठे, बहिणाबाई,शांत शेळके अशा कवयित्रींना तुल्यबळ अशा यांत्रिक कवयित्री कारखान्यात तयार होऊ लागल्या . 
 फक्त मीटरमध्ये लिहिल्याने किंवा  केवळ यमक जुळवल्याने एखादी गोष्ट काव्य अथवा कविता या सदरात मोडत असेल तर अशा प्रकारची कविता लिहिणारे व ती पाडणारे शेकडो कवी रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली आहेत. अशा  कवितेचा आणि प्रतिभेचा दुरान्वयानेही संबंध नाही. कवितेचा विशिष्ट छंद ,त्यातील गेयता , त्यातला गर्भित अर्थ हे सर्व समजण्याचा खटाटोप मग का करायचा?  "जन पळभर म्हणतील हाय हाय - मी जाता राहील कार्य काय?"  या कविवर्य भा.रा.तांबे यांच्या ओळी केवळ हाय आणि काय हे यमक जुळविण्यासाठी लिहिल्या गेल्या होत्या?  "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे - क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे "  यातल्या फक्त डे चे यमक जुळविण्याच्या प्रयत्नापायी बालकवींनी एवढी कविता खर्ची घालावी?  "अता राहिलो मी जरासा जरासा- उरावा जसा मंद अंती उसासा" या कवी सुरेश भटांच्या अंतरीचे गुज उलगडून सांगणाऱ्या  काव्यपंक्ती केवळ सा चे यमक जुळविण्याच्या हव्यासापोटी रचल्या गेल्या की काय? असा प्रश्न मला पडला. 
एखादा विचार मांडण्यासाठी वेगवेगळे साहित्यप्रकार वापरले जातात. कुणी  कथेचे  ,कुणी कादंबरीचे  तर  कुणी कवितेचे माध्यम वापरतात. त्या विशिष्ट  विचाराच्या बीजाची व्याप्ती किती आहे यावर त्या वाग्मय प्रकारचे स्वरूप अवलंबून असते. कविता हे माध्यम संक्षिप्त असले तरी सोपे खासच नाही. कवीला नेमके काय म्हणावयाचे आहे तेही मोजक्या शब्दांत , गेयता,आशयघनता राखून हे काही येऱ्यागबाळ्याच काम नाही. कवी आपल्या काव्यातून वैचारिक क्रांती घडवू पाहत असतो. सामाजिक  प्रबोधन करू पाहत असतो. अशा प्रकारची क्रांतिकारक शाब्दिक तुतारी फुंकण्यासाठी त्यात त्याला स्व-प्रतिभेचे प्राण ओतावे लागतात. त्याला अंतरीच्या तारा स्व -प्रतिभेने झंकारु द्याव्या लागतात. विरहव्यथित मनाला स्व-प्रतिभेचे पाझर फुटावे  लागतात. कवितेचे मीटर जपण्यापेक्षा त्याला त्यातील भावनेची खोली जपावी लागते. प्रेरणा,संवेदना या रोपट्यांना प्रतिभेचे खतपाणी निष्ठेने घालून काव्यफुलोरा फुलवावा लागतो. तरच अशी एखादी कविता रसिक हृदयाचा ठाव घेऊ शकते.  दुसऱ्याच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालू शकते. 

करून शब्दांची आरास 
सजविते मखर कवितेचे 
आत मूर्ती भावपूर्ण 
असे लेणे दिव्यत्वाचे 
हे दिव्यत्व, ही प्रतिभा स्वर्गीय असते, अनुपमेय असते आणि म्हणूनच ती कुठल्याही बाजारबुणग्याच्या कारखान्यात किलोंच्या हिशेबात तयार होत नाही तर प्रतिभेचा परिसस्पर्श झालेल्या संवेदनशील मनात, हृदय मंदिरात तयार होत नाही तर स्फुरण पावते.

No comments:

Post a Comment