"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी " ही थोरामोठ्यांची शिकवण आत्मसात करण्याचे दिवस केव्हाच गेलेत. हल्ली पैसा बोलतो , माणसे ऐकतात, त्याच्यापुढे झुकतात. हल्ली माणसाची माणसाशी बांधिलकी नसून ती पैशाशी असते. लाख-करोड-अब्ज हे शब्द एखादं शेंबड पोरही सहजगत्या उच्चारत असतं. पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा या लहानपणी शिकलेल्या कवितेतील ओळी आता पुसट झाल्या आहेत. आता पैसा इतका मोठा झाला आहे की पावसालाही खोटं ठरवण्याची त्याची ऐपत आहे. पूर्वी रात्री निजताना,सकाळी उठल्यावर परमेश्वराचे नाव तोंडी असायचे आता मात्र झोपताना,उठताना पैसा हेच नाव सर्वतोमुखी असते. पैसा-प्रसिद्धी-प्रतिष्ठा या भावंडांनी समाजमनावर अतिक्रमण केलं आहे.
मी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना असं वाचलं होतं की पूर्वीच्या काळी वस्तूच्या बदल्यात वस्तू असा व्यवहार होत असे. याला "बार्टर सिस्टीम" असे म्हणत. म्हणजे तांदूळ दे, डाळ घे किंवा तूप दे,तेल घे याप्रमाणे. कालौघात ही पद्धत नष्ट झाली आणि पैसा नामक पाहुण्याची सद्दी सुरु झाली. बघता बघता तो सर्वांच्याच गळ्यातला ताईत होऊन बसला. पैशामुळे आर्थिक देवाणघेवाण सुलभ झाली ,राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर आयात-निर्यात होऊ लागली आणि अप्रगत देशांना प्रगतीचे साधन निर्माण झाले. प्रगतीपथावर असलेल्या देशांची श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ सुरु झाली. पैसा कमावण्याच्या हव्यासापायी समाजमन ढवळून निघालं. जास्तीत जास्त पैसा ही परमोच्च सुखाची गुरुकिल्ली, हा सर्वच दु:खांवरचा रामबाण उपाय असे माणसे समजू लागली. आता पैशाचं अवडंबर एवढं माजलं की पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग माणसाला उपलब्ध झाले. माणसे चोऱ्या करू लागली,खून पाडू लागली,दरोडे घालू लागली. काळा म्हणजे असनदशीर मार्गाने मिळालेला पैसा परकीय पतपेढ्यांत साठवू लागली. सामाजिक,राजकीय भ्रष्टाचारांना उत आला. पैशाअभावी माणसे आत्महत्या करू लागली. माणसाची नीती,चारित्र्य ,शील यांचा लिलाव झाला. एकमेकांची सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी पैशाला शरण जाण्यावाचून पर्याय उरला नाही. एकमेकांचा जीव घेण्यासाठी मानवी बॉम्ब तयार झाले. उत्तुंग बांधलेली वास्तुशिल्पे पैशाच्या बळावर बेचिराख करण्यात आली. जितका जास्त पैसा तितका जास्त संहार असे जणू समीकरणच झाले. महत्तम मुल्यांची,तत्वांची कास धरून आयुष्य व्यतीत करणारे डबघाईला आले,त्यांना अनुयायीच राहिले नाहीत. थोडक्यात पैसा हे साधन न राहता अंतिम साध्य ठरले.
मिळालेला अथवा कमावलेला पैसा, स्थावर-जंगम इस्टेट ,सोनेनाणे,गाड्या-घोडे याने माणसाला सगळी भौतिक सुखे विकत घेता आली. झोपायला मखमली पलंग मिळाला पण झोप विकत घेता आली नाही, पंच पक्वान्ने खरेदी करायला मिळाली पण भूक विकत घेता आली नाही, राहायला आलिशान वस्तू मिळाली परंतु आपल्या माणसांचे प्रेम विकत घेता आले नाही. देवासाठी फुले विकत घेता आली पण भक्तीभाव विकत मिळाला नाही. संतांच्या शिकवणीतील त्यागभावना पैशांच्या भाऊगर्दीत हरवून गेली. ढोंगी महंतांच्या उपासनांचे मार्ग रत्नजडीत झाले. माणूस माणुसकीला पारखा झाला. मोक्षाची संधी गमावून बसला.
"सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है वहा पैदलही जाना है" या ओळींचा मतितार्थ पैशापायी आंधळ्या झालेल्या माणसाला केव्हा कळणार?
No comments:
Post a Comment