वाजतगाजत गणपती येतात. काही लाख रुपये खर्चून सजविलेल्या मखरात बसतात. वर्गण्यांची खैरात होते. सोने-चांदी अर्पून नवस फेडले जातात. गणेश भक्तांच्या रांगा लागतात. सेलेब्रिटीज येतात, नेतेमंडळी येतात . त्यांच्यामुळे काही सार्वजनिक गणपती जास्त प्रसिद्धी पावतात. बक्षिसांच्या आमिषाने गणेश मंडळांच्या अटीतटीच्या स्पर्धा सुरु होतात. देखावे,रोषणाई बघण्यासाठी माणसांचा महापूर लोटतो. या निमित्ताने नवनव्या ध्वनिफिती बाजारात येतात. त्यांची जाहिरात सुरु होते. मोदकांचे नवनवे प्रकार हलवायांकडे उपलब्ध होतात. त्याच्याही जाहिराती सुरु होतात. घरोघरी आणलेले गणपतीही स्पर्धेमेध्ये उतरतात. महाआरत्या होतात. महाप्रसाद वाटले जातात. शाळाशाळांमध्ये गणपती या विषयावर निबंध स्पर्धा घेतल्या जातात. या काळात सर्व प्रसारमाध्यमे गणपतीमय होतात. या निमित्ताने विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एकूण दहा दिवस जल्लोषाचे असतात. अनंतचतुर्दशीला गणपतींचे विसर्जन होते. सामुहिक नाच-गाणी-गुलालाची उधळण करत गणपतीबाप्पाला निरोप दिला जातो आणि मंडळीचे डोळे पुढील सार्वजनिक उत्सवाकडे लागून राहतात.हे वर्षानुवर्षीचे चित्र आपण बदलू शकतो की नाही याचा विचार करण्याची वेळ खरोखरीच आली आहे.
गणपतीबाप्पा हे सकलांचे आराध्यदैवत! चौसष्ट विद्यांचा,कलांचा हा अधिष्ठाता! अनेक धर्मांच्या, जातींच्या, वर्णांच्या, वर्गांच्या लोकांना एकत्र आणणारा हा प्रथमेश! परस्परांतील शत्रुत्वाचा,वैमनस्याचा, मत्सरांचा , हेव्यादाव्यांचा विसर पडायला लावणारा हा वक्रतुंड! शांततेच्या, सहिष्णुतेच्या, भक्तिरसाच्या माध्यमातून दृग्गोचर होणारे त्याचे विश्वात्मक रूप! समस्त आबाल-वृद्धांना आकर्षून घेणारे त्याचे विलोभनीय स्वरूप! अशा या विश्वव्यापी गणरायाला इतक्या आधिभौतिक स्तरावर आणण्याचे प्रयोजनच काय? अडाणी माणसे,शिकली सवरलेली माणसे, राजकीय-सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या व्यक्ती, प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमांतून चमकणाऱ्या व्यक्ती ,व्यापारी,उद्योगपती अशा सर्व थरांमधील माणसे ह्या भावनेच्या , श्रद्धेच्या मांडलेल्या बाजारीकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामील झालेली असतात.
गणरायांना कुठे सोस असतो सोने-हिरे-चांदी यांनी मढविलेल्या रत्नजडीत आसनाचा? गणरायांना कुठे हव्यास असतो लाखो-करोडोंनी वर्गण्या जमा करण्याचा? गणरायांना कुठे आकर्षण असते भक्तीभावनेशी कर्तव्य नसणाऱ्या नाच-गाण्यांचे? गणरायांना कुठे प्रलोभन असते लाखो रुपये खर्चून उभारलेल्या उंची देखाव्यांचे? गणरायांना कुठे आवडतात परस्परांतील हेवेदावे, स्पर्धेच्या निमित्ताने एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या? गणरायांना कुठे रुचतो ध्वनिक्षेपकावरून घातलेला धांगडधिंगा? गणरायांना कुठे भावतात लाजिरवाणी नृत्ये आणि कृत्ये? गणरायांना कुठे आवडतो लोकांच्या भावनेशी,श्रद्धेशी,भक्तीशी खेळला जाणारा हा खेळ?
आपल्या संस्कृतीत गणपती हे बुद्धीचे प्रतिक मानले आहे. हे आद्यदैवत आहे. त्याच्यापुढे या भूतलावरील सगळे मानव सारखेच! कोणी मोठा नाही व कोणी लहानही नाही. कोणी उच्च नाही व कोणी नीच नाही. कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही .
आपल्या देशापुढे इतक्या वेगवेगळ्या आर्थिक समस्या उभ्या असताना , कित्येक लोक उपाशी असताना, कित्येक लोक बेकार,बेघर असताना , कित्येक लोक देशाच्या रक्षणासाठी लढता लढता जीवन-मृत्युच्या सीमारेषेवर उभे असताना , भ्रष्टाचाराच्या वणव्यात कित्येकजण होरपळून निघत असताना , दीन-दु:खितांचे शोषण होत असताना या परमोच्च दैवताची करूणा भक्तीने भाकायाची की पैशांनी? महागाईचा भस्मासुर सामान्यांच्या जीवाचे पाणी पाणी करत असताना लाखो रुपयांची उधळपट्टी करून आपण या देवाला कसं प्रसन्न करून घेणार? स्वत: अ-नैतिक मार्गांनी कमावलेला पैसा या नीती-धर्माच्या पुरस्कर्त्याला रुचणार? लोकांवर जोर-जबरदस्ती करून त्यांच्याकडून मोठ्मोठ्ठ्या देणग्या उकळून त्या पैशांनी गणरायांना सुशोभित केले तर हि गोष्ट गणरायांसाठी सन्मान्य असेल का? हा पैशांचा ओघ एखाद्या विधायक जनकार्यासाठी आपण वळवू शकलो तर गणरायांच्या आपण अधिक जवळ जाऊ शकू हा विचार या उत्सवाच्या संदर्भात जे सक्रीय असतात त्यांच्या मनात कसं येत नाही? जी बुद्धी आपणा सर्वांना ज्या गणरायाने बहाल केली तिचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग? एक गोष्ट प्रत्येकाने जरूर लक्षात ठेवावी की कोणताही देव हा फक्त भावाचा भुकेला असतो इतर कशाचाही नाही.
No comments:
Post a Comment