मला येथील रस्त्यारस्त्यांवर वर्षानुवर्षे पडलेल्या खड्ड्यांचा मनापासून अभिमान वाटतो. त्या खड्ड्यांत साचलेल्या दुषित पाण्याचा अभिमान वाटतो. पावसाळ्यात याच खड्ड्यांत मुक्तपणे बागडणाऱ्या बेडकांचा व झुरळांचा अभिमान वाटतो. प्रत्येक रस्त्यावर, गल्लीबोळांत , कानाकोपऱ्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या कचऱ्याचा व त्यात स्वैरपणे विहरणाऱ्या उंदीर-घुशींचा अभिमान वाटतो. रस्त्यांवर उघड्या असलेल्या गटारांचा मला विलक्षण अभिमान वाटतो. त्यावरची झाकणे चोरून ती विकणाऱ्या गटारचोरांचा तर मला हेवा करावासा वाटतो. मला विकलांग,वृद्ध,गरोदर,पिडीत,हतबल लोकांच्या आर्जवाला धुडकावून त्यांच्या नाकासमोर भरघाव रिक्षा नेणाऱ्या समस्त रिक्षावाल्यांचा अभिमान वाटतो. सरकारी कचेऱ्यांत कामानिमित्त गेलेल्या जनतेला रडकुंडीला येईपर्यंत ताटकळत ठेवणाऱ्या मुजोर व उद्धट कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला वेळेवर बसेस कधीच न आणणाऱ्या बस कंडक्टरचाही अभिमान वाटतो. मला रस्त्यांवर जागोजागी पचापच थुंकणाऱ्या पादचाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला लोकलमध्ये भाजी निवडून कचरा तिथेच फेकणाऱ्या महिलांचा, एवढ्या तेवढ्या कारणांवरून परस्परांच्या आया-बहिणीचा उद्धार करणाऱ्या महिलावर्गाचा अभिमान वाटतो. मला लोकलमधून प्रवास करताना दोन्हीबाजूस अनुभवता येणाऱ्या विहंगम दृश्याचा अभिमान वाटतो. मला एकमेकांच्या वाढदिवसाची भिंतींवर डकवलेली भलीमोठ्ठी जाहिराताचित्रे व त्यात एकमेकांवर उधळलेली स्तुतिसुमने व त्यामुळे अशोभायमान झालेल्या भिंती व आजूबाजूचा परिसर याचा अभिमान वाटतो. मला नगरपालिकांच्या शाळांच्या गळक्या छ्प्परांतून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वर्षावाचा अभिमान वाटतो. मला मुलांना वर्गाच्या चार भिंतीत कोंडून त्यांच्याकडून परत परत तोच शालेय रटाळ परिपाठ करून घेणाऱ्या आणि त्यांचे बाल्य प्रयत्नपूर्वक नासावणाऱ्या शिक्षकांचा अभिमान वाटतो. मला मृत माणसाच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या वृत्तीचाही अभिमान वाटतो. नैसर्गिक आपत्तीत अथवा बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांच्या नातालागांपर्यंत मदत पोहोचण्याच्या आधीच ती खिशांत घालणाऱ्या महाभागांचा मला अभिमान वाटतो. मला खून,माऱ्यामाऱ्या दरोडे,बलात्कार ही सत्कृत्ये राजरोसपणे करणाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला नाकावरची माशी न हलू देता , निरर्थक भाषणांतून फुटकळ आश्वासने देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला सणासुदीच्या,उत्सवाच्या दिवशी सवंग गाणी वाजवून त्यावर बीभत्स हातवारे करून नाचणाऱ्या,आजूबाजूचा परिसर ध्वनीप्रदुषित करणाऱ्या तरुणांचाही अभिमान वाटतो.
या अशा वेगवेगळ्या अभिमानांना खरोखरीच अंत नाही !
No comments:
Post a Comment