Thursday, 1 September 2011

"रिएलिटी शोज" च्या मोहजालात हरवलेले गाणे


आज कुठल्याही वाहिनीवर बघावं तर गाण्याचं नुसतं पेव फुटलेलं आहे. जो येतो तो गातो. गा गा गातो. परीक्षक तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात. गाणाऱ्यांना अस्मान ठेंगणं होतं. त्यांचे आईबाप हुरळतात. जळी-स्थळी त्यांच्या गाण्यांचा बोलबाला होतो. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप गाण्यापर्यंत कुठलही गाणं ते लीलया गाऊ शकतात. मग काही संगीतकार त्यांच्याकडून आपल्या रचना गाऊन घेतात. त्यांच्या गाण्यांच्या सीडीज , आल्बम निघतात. ते सेलेब्रिटी या क्याटेगरीत आता मोडतात. त्यांचे लाईव्ह पर्फोरमन्सेस बघण्यासाठी लोक गर्दी करतात. त्यांचे रेट्स फिक्स होतात. संपूर्ण 'मेक -ओव्हर' झालेलं त्याचं 'ग्लामराइज्ड' रुपडं एखाद्या हिरो-हिरोईनला सुद्धा न्यूनगंड आणू शकतं. अशा प्रकारे सार्वजनिक उत्सवातील याचं स्थानही अढळ होतं . 
काही दिवसांपूर्वी कुठल्याशा वाहिनीवर एक चेहरा गाणं गाताना दिसला . मी डोक्याला ताण देऊन आठवू लागले. अखेरीस माझ्या लक्षात आलं की ती गायिका म्हणजे वैशाली भैसने-माडे आहे. उर्मिला धनगरला ही मी पटकन ओळखू शकले नाही. अभिजित सावंतने त्याचं कर्तृत्व गाजवायला आधी राजकीय पक्षाचा व नंतर कॉमेडी शोचा आधार घेतला. यांच्यासारख्या इतर सर्वच गायक-गायिकांनी स्वत:ला तपासणं खूप गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. चांगल्या गायकाने आजन्म गाण्याची साधना करायची की केवळ सेलेब्रिटीचं बिरूद स्वत;ला चिकटवून घेऊन आपल्यातील सच्च्या गायकाची घुसमट होऊ द्यायची. 
प्रत्येक 'सिंगर'ला सगळ्याच प्रकारची गाणी गाता यायलाच पाहिजेत हा जवळजवळ सर्व वाहिन्यांचा हट्ट तर माझ्या आकलना पलीकडचा आहे. त्यातून त्याची किंवा तिची म्हणे 'व्हरसेटालिटी' प्रूव्ह होते. यानुसार पाहायचे झाल्यास फक्त शास्त्रीय संगीताला वाहिलेले, फक्त नाट्यसंगीताला वाहिलेले, फक्त सुगमसंगीताला वाहिलेले कुणीही गायक व गायिका व्हरसेटाइल असू शकणार नाहीत.    
सुलोचनाताई चव्हाण आयुष्यभर लावणीच गात आल्या. प्रभाकर कारेकर,रामदास कामत हि मंडळी फक्त नाट्यसंगीताच गारुड समाजमनावर पसरवीत राहिली. किशोरीताईंनी शास्त्रीय संगीतातच स्वर्ग शोधला. मेहदी हसन, गुलाम अली आयुष्यभर फक्त गझलेचेच गुलाम होऊन वावरले. आपल्याभोवती एका ठराविक गान-प्रकाराची चौकट आखणे  हे गायकाच्या दृष्टीने काही कमीपणाचे लक्षण आहे का? 
कल्पना करा की "बालगंधर्व" फेम आनंद भाटे पुढील गाणी गातायत. १) हिची चाल तुरुतुरु २) पाणी थेंब थेंब गळ ३) अश्विनी ये ना ४) गालावर खळी ५) बघतोय रिक्षावाला . कसं वाटेल? कल्पना करा शास्त्रीय गायिका वीणाताई सहस्त्रबुद्धे पुढील गाणी म्हणताहेत. १) कोंबडी पळाली २) चमचम करता ३) ऐका दाजीबा ४) पिया तू अब तो आजा ५) रात अकेली है . कसं वाटेल? 
वरील उहापोह मी एवढ्यासाठी केला की प्रत्येकाच्या गळ्यात एक विशिष्ट गायकी असते. सगळेच जण महमद रफी आणि आशा भोसले नाही होऊ शकत. काही सन्माननीय अपवाद वगळता असे म्हणता येईल की आपल्या गळ्याला अनुसरून गायलेलं गाणं हे जास्त प्रभावी ठरू शकतं. लोकांवर जादूची कांडी फिरवण्यासाठी वाट्टेल ते गाणं गाण्याचा आटापिटा कशाला करायचा? 
रीएलिटी शोज मध्ये बऱ्याचदा परीक्षक म्हणतात की छान गायलास, दोन-तीन ठिकाणी सुराला घसरलास पण एकूण गाणं चांगलं झालं? म्हणजे नक्की काय? बेसूर झालेलं गाणं चांगलं कसं म्हणता येईल? सुराला घसरलेला गायक/गायिका  उद्याचा महाविजेता किंवा महाविजेती कशी होऊ शकेल?  त्यासाठी तिने किंवा त्याने सातत्याने गान-साधना करायला नको का?  मेक-ओव्हर केला, सादरीकरणावर अधिक भर दिला तरीही गाण्यातील उणीवा लपू शकतात का? या सर्व नवनवीन गायक-गायिकांना आपापले आल्बम काढायची एवढी घाई का लागून राहिलेली असते? परीक्षक झालेले संगीतकारही या व्यासपीठावर आलेल्या गायकांना संधी देण्यासाठी एकदम आतुर झालेले असतात. गायन क्षेत्रात स्वत:ला सिध्द करण्यासाठी जी समर्पणाची भावना आवश्यक असते की यांपैकी किती जणांच्या ठायी असते? स्पर्धांचे बाळकडू मिळालेले इतरांच्या पुढे जाण्यासाठी विविध गाणी म्हणण्याची केविलवाणी कसरत करत राहतात परंतु आत्मिक आनंद कधीही मिळवू शकत नाहीत. स्वत:च्या गाण्याकडे कधी  डोळसपणे पाहू शकत नाहीत. साधनेतील यथार्थता कधी स्वत:ला पटवून देऊ शकत नाहीत. परिणामी गाणे यथातथा आणि बाकीचाच बडिवार जास्त अशी अवस्था होते.
एक छोटेसे उदाहरण देते. एकदा पं.भास्करबुवा बखले याचं मैफिलीतील गाणं संपलं आणि एका रसिकाने त्यांना नाट्यसंगीत गाण्याची विनंती केली. भास्करबुवांनी ती नम्रपणे नाकारत म्हटलं की मा. कृष्णराव आज इथे उपस्थित आहेत. नाट्यसंगीताची तालीम त्यांना मिळाली आहे. माझ्या गळ्याला ती तालीम नाही. तेव्हा श्रोतेहो मी सर्वांच्या वतीने त्यांना नाट्यसंगीत गाण्याची विनंती करतो. नाट्यसंगीत गायचे नाकारल्याने भास्करबुवांची संगीत क्षेत्रातील महती काही कमी झाली नाही किंवा त्यांची शास्त्रीय संगीतातील तपश्चर्याही डागाळली नाही. उलट त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. 
"all that glitters is not gold" या उक्तीचा प्रत्यय आज जवळजवळ प्रत्येक रीएलिटी शो बघताना येतो असे खेदाने म्हणावेसे वाटते. 

1 comment:

  1. I totally agree with your views here. Reality shows can just bring the one-minute fame that everyone craves for. But only if you are truly hard-working and talented, can you reach further heights.

    ReplyDelete