आजकाल आपापल्या पाल्याला वेगवेगळ्या क्लासेसला घालायची जणू स्पर्धाच लागलेली असते. आपापला मुलगा किंवा मुलगी अष्टपैलू कसा होईल किंवा कशी होईल याबाबत पालक कमालीचे दक्ष असतात. आपल्या पाल्याला एखादी गोष्ट न येणे त्यांना बहुधा कमीपणाचे वाटत असावे. अभ्यास, गाणे, चित्रकला, पोहणे, वाद्यवादन, नृत्य, संस्कार शिबिरे, अभिनय, मैदानी तसेच बैठे खेळ व असं इतरही बरंच काही आपल्या पाल्याला यायलाच पाहिजे हा बहुतांश पालकांचा अट्टाहास असतो. त्याच्या किंवा तिच्या उज्ज्वल भवितव्याच इंगित जणू या सर्व छंदांमध्ये दडलं आहे अशा भ्रामक समजुतीत ते वावरत असतात. यांशिवाय शाळेतून आल्यानंतर त्या ट्युशन नावाच्या भयंकर आपत्तीला सामोरे जावे लागते ते वेगळेच!
आपल्या पाल्याची बौद्धिक पात्रता , शारीरिक कुवत, त्याची मानसिकता लक्षात न घेताच केलेला हा केविलवाणा खटाटोप असतो. दिवसच्या दिवस एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखी मुले या दुष्टचक्रात फिरत राहतात. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची बिकट अवस्था होते. परत या सगळ्या छंदांमध्ये आपल्या पाल्याने अव्वल यावे अशा महत्त्वाकांक्षेने पालक पछाडलेले असतातच! त्यात नववी-दहावी नामक मुलांचे बाल्य गिळंकृत करणारा भस्मासुर असतोच! मग यातले काही क्लास तात्पुरते थांबवले जातात. टी.व्ही .वरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर चाललेला व मुलांना रुचणारा हैदोस थांबवला जातो. मित्रमैत्रिणी नामक व्रात्य प्राणी त्यांच्या त्यांच्या घरांतील पिंजऱ्यात बंदिस्त होतात. आवडत्या खाद्यप्रकारांवरही प्रकृती नीट राहावी या कारणास्तव गदा येते. घराघरात एक प्रचंड सुतकी वातावरण तयार होते. घरातील एक खोली ही दहाव्वीसाठी बळी दिल्या जाणाऱ्या पाल्यासाठी राखून ठेवली जाते. नियमित वेळेस खाण्याच्या बश्या, जेवणाची ताटे आत सरकवली जातात. मोबाईल नामक डोकेदुखी कट-कारस्थान करून दूर ठेवली जाते. घरात मार्गदर्शनपर पुस्तकांचा, पेपरांचा जागोजागी खच पडलेला असतो. काही पालकही पाल्याबरोबर परीक्षार्थी वाटायला लागतात.
एकदाची परीक्षा संपते आणि नव्या जोमाने पाल्याला पुन्हा एकदा इतर छंदांच्या गराड्यात ढकलले जाते. निकाल लागतो आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छ्या पाल्ल्यावर कश्या लादता येतील याचा विचार करण्यात पालक मशगुल होतात.
या सर्व सव्यापसाव्व्यातून किती हिरे निघतात आणि किती गारगोट्या हे त्या परमेश्वरालाच ठाऊक!
No comments:
Post a Comment