असुरक्षितता हे कलियुगातील एक भयाण वास्तवच म्हणायला हवं. सकाळी कामावर गेलेला माणूस संध्याकाळी घरी सुखरूप परतेल की नाही या विचारातील गांभीर्य दिवसेंदिवस अधिकाधिक गहिरं होत चाललंय. वेळेवर वाहन मिळण्याची हमी नाही, वेळेवर कार्यालयात पोहोचण्याची हमी नाही, आहे ती नोकरी टिकण्याची हमी नाही अशा अवस्थेत सर्वांच्याच आयुष्याच्या गाड्या अशाश्वत रुळांवरून धावत असतात. कोणता रूळ , कोणत्या क्षणी पायांखालून निसटेल आणि गाडी 'डिरेल' होईल याचा नेम नसतो.
आजकालच्या स्पर्धायुगात आपण कितीही शिकलो तरी अपेक्षेनुसार नोकरी मिळणे ही गोष्ट दुष्प्राप्य असते . ज्याप्रमाणे दुसऱ्याची बायको ही नेहमीच सुंदर वाटते त्याचप्रमाणे दुसऱ्याला मिळालेली नोकरीही जास्त सुखकर वाटते. आपली थोडी कमी पगाराची, जास्त सुख्सिविधा नसलेली नोकरी काही कमी महत्त्वाची नसते परंतु दुसऱ्याला मिळालेल्या नोकरीचे अवास्तव गुणगान करून आपण आपल्याला नकळत कुचकामी, दुय्यम गुणवत्तेचे ठरवून मोकळे होतो. आपण घेतलेलं क्वालिफिकेशन आणि आपल्याला मिळालेली नोकरी यात फार कमी वेळा उत्तम प्रकारची लिंक दिसून येते. आपण 'highly qualified' असल्याने हाताने काम करायची वाईट सवय आपण लावून घेतलेली नसते. आपला "shop-floor experience" झीऱो असतो .अशा वेळी आपल्या हाताखालचे लोक आपल्याला व्यवस्थित गंडवतात आणि आपल्या 'बॉस' पणावर खट्टू होण्याची पाळी आपल्यावर येते.
आजकाल लग्नाच्या बाजारात उभ्या असलेल्या मुलींचा भावही भलताच वधारलेला असतो. त्यांना प्रयेक बाबतीत 'सुपीरियर ' असाच वर हवा असतो. उच्चशिक्षित, प्रतिष्टित, गलेलठ्ठ पगार घेणारा, गाडी-बंगला-नोकरचाकर बाळगणारा शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणारा , राजकुमारासारखा दिसणारा, बायकोचे ऐकणारा वगैरे वगैरे. या मुलींच्या संभाव्य 'वरा' बद्दलच्या अपेक्षा वाचताना वा ऐकताना आपण दमेकरी आहोत असे वाटू लागते. तात्पर्य काय तर या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यास आपण समर्थ असलो तरच या विवाहाच्या रिंगणात उतरायला आपण योग्य असतो. आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना सोडून परदेशात जाणे आपल्याला शक्य नसते त्यामुळे आपली विवाहाची सुरक्षितताही धोक्यात येते.
घर,बायको,मुले,नोकरी सर्व काही शाबूत असूनही काही माणसे स्वत:ला अकारण असुरक्षित समजत असतात. प्रचंड नागरीवस्तीतील कुणा 'अबक' नामक इसमाचा मृत्यू होतो आणि यांची असुरक्षिततेची जखम ठसठसू लागते. आपल्याला बरं वाटत नाही असे उगीचच वाटू लागते. आपल्याला कोणाचा तरी आधार हवा आहे असे यांना वाटायला लागते. इतके दिवस बायको-मुलांवर गाजवलेला पुरुषी अहंकार एकदम लुप्त होतो आणि आता आपले काही बरे-वाईट झाले तर या विचाराने आपण हतबल होतो. आपल्याला एकाएकी चक्कर आल्यासारखी वाटते, मळमळल्या सारखे वाटते,हातापायाला मुंग्या आल्यासारखे वाटते, छातीत धडधडते आणि आपण यंत्रवत 'doctor' ची वारी करतो. या पेशंटची 'केस' खास नसल्याने doctor विशेष लक्ष पुरवीत नाहीत त्यामुळे आपल्याला त्या सद्गृहस्थांच्या ज्ञानाविषयी शंका येऊ लागते. गोळ्या घ्या,आराम करा हा काहीश्या संदिग्धपणे दिलेला सल्ला आपल्याला पटत नाही व आपण तपासण्यांचा आग्रह धरतो . यथावकाश तपासण्या होतात, रिपोर्ट नॉर्मल येतात. एवढं सगळं आपल्याला होत असूनही रिपोर्ट्स नॉर्मल आलेच कसे या विचारांनी आपण सैरभैर होतो. पाण्यासारखा पैसा जातो पण असुरक्षिततेची भावना जात नाही.
आपण लोकलमधून प्रवास करत असतो. एवढ्या गच्च भरलेल्या गाडीत आपण शिरलो तरी कसे या आश्चर्याचा विचार करत एका हातात सामान व दुसऱ्या हाताने बार धरून कसेबसे उभे असतो. बाजूच्या डब्यातून आरडाओरडा ऐकू येतो. कुणीतरी बॉम्बसदृश वस्तू ठेवली आहे ही ऐकीव बातमी आपल्या हृदयाचे ठोके चुकवायला पुरेशी असते. जो तो दाराबाहेर उडी मारण्यासाठी जीवाचा आटापिटा करू लागतो. काही माणसे भरघाव लोकलमधून पडून मरण्यापेक्षा बॉम्बस्फोटाने मेलेलं बरं असा सुज्ञ विचार करून मागे सरकतात. यथावकाश गाडी स्टेशन येताच थांबते आणि लोकांचे लोंढे पुढचा -मागचा विचार न करता स्वत:ला झोकून देतात. या धावपळीत सामान विखुरले जाते,चष्मे फुटतात,चेंगरा चेंगरी होते . हे थरार -नाट्य काही वेळ चालते आणि बॉम्ब ठेवल्याची अफवा होती हे कळल्यानंतर आधी चिडाचीड,शिवीगाळ,धुसफूस व नंतर उपरोधिक विनोदाला वाचा फुटते. पण मनाला स्पर्शून गेलेल्या असुरक्षिततेच्या भावनेने आपण हादरून गेलेले असतो.
सुट्टीच्या दिवशी सकाळी जरा आनंदाने विसावून आपण टी.व्ही.समोर बसतो. गरमागरम वाफाळता चहा आणि पोहे या भाग्याचा आस्वाद घेत! तोच कुठल्याशा वाहिनीवर बातमी आदळते. कोठेतरी जबरदस्त भूकंप झालेला असतो आणि संपूर्ण कललेल्या बिल्डिंगा, ढासळलेल्या इमारतींचे अवशेष,इतस्तत: विखुरलेले मानवी अवयव ,रक्ता-मांसाचा खच, भग्न झालेली स्वप्ने , वाचलेल्यांचे भयानक आक्रंदन पाहून या भूतलावरील आपण सर्वात असुरक्षित प्राणी आहोत याची आपल्याला प्रचीती येते.
No comments:
Post a Comment