"मी लग्न करून खरंच सुखी होईन का ?" माझ्या उच्चशिक्षित मैत्रिणीने मला विचारले. मी अंतर्मुख झाले. निर्णय तिचा तिलाच घ्यायचा होता. माझ्या उत्तराने तिच्या विवाहाबद्दलच्या दृष्टीकोनात तसूभरही फरक पडणार नव्हता . खरं म्हणजे या प्रश्नार्थक वाक्यातच उत्तर दडले होते.
लग्नाच्या बंधनात न अडकता एकत्र राहणे अशा स्थितीत आज अनेक तरुण - तरुणी वावरत असतात. लग्न करणे हाच सुखी होण्याचा एकमेव मार्ग जरी नसला तरीही आपण निर्माण करणाऱ्या निष्पाप जीवांना समाजमान्यता मिळावी, आपल्याकडे बघण्याची इतरेजनांची दृष्टी आदरयुक्त असावी तसेच आपली कौटुंबिक जबाबदारीची जाणीव विस्तृत व्हावी यांसाठी विवाहाचा आग्रह धरणे खचितच हितावह आहे असे माझे प्रांजळ मत आहे.
आज लग्नाच्या बाजारात उभी राहिलेली ती किंवा तो कुठल्यातरी पारंपारिक वा बौद्धिक चष्म्यातून एकमेकांना पारखून घेतात आणि कर्मधर्मसंयोगाने चतुर्भुज होतात. स्वत:चा शैक्षणिक दर्जा, आर्थिक कुवत, समाजातील पत या मुळांना अहंकाराचे खतपाणी घातले जाते आणि परस्परसामंजस्याची कवाडे कायमची बंद केली असल्याने उभयतांच्या व्यक्तिमत्वाची घुसमट होऊ लागते.
अविवाहित राहणं , विवाहिताचे आयुष्य जगणं किंवा लग्न न करता एकत्र राहणं या तीनही गोष्टी आपापल्या ठिकाणी रुजलेल्या बऱ्या-वाईट उर्मींशी, आजपर्यंत आलेल्या अनुभवांशी , अंगिकारलेल्या धोरणांशी,तत्वांशी निगडीत असतात. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याची कालपरत्वे ज्याची त्याला प्रचीती येतेच.
विवाह केला म्हणजे सगळ्या समस्या सुटतात असं मुळीच नाही. विवाह होतात आणि त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. कुटुंब वाढते. सुरवातीचे काही दिवस स्वप्नांचेच असतात. काही काळानंतर स्वप्नांचे धुके विरते आणि वास्तवाचे ऊन पोळू लागते.नोकरी-घर ,सासर-माहेर हि कसरत किचकट वाटायला लागते. प्रत्येकाला दुसऱ्याने आपल्याला समजून घ्यावे असे वाटू लागते. या वाटण्याचे रुपांतर वादात होते. दुसऱ्याकडून अपेक्षिलेल्या गोष्टींची यादी वाढतच जाते. वरवर चांगला दिसणारा संसार आतून भुसभुशीत, पोकळ व्हायला लागतो. या आगीत तेल ओतायला अनेकजण आपापल्या शक्तीनिशी सज्ज असतातच. मी कशी बरोबर आणि दुसरे कसे चूक या वादाला अंत नसतोच. हळूहळू घराला कोर्टाचे स्वरूप येते. साक्षीपुरावे होतात. अशा तऱ्हेने विवाहवेदीवर चढलेल्या या दाम्पत्याची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण न होता घटस्फोटाच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागते.
No comments:
Post a Comment