Thursday 24 November 2016

मोदींस पत्र ......


आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांस ,

अहो काय करून बसलात तुम्ही? अचानक, तडकाफडकी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करून तुम्ही किती जणांच्या झोपा उडवल्यात याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आता कोणत्या डॉक्टरांकडे जायचं त्यांनी? मुळात आपले पंतप्रधान अशी काही 'हालचाल' करू शकतात हेच आम्हा भारतीयांच्या अजून पचनी पडलेलं नाही.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाटलं असेल का असं काही 'खतरनाक' करावंसं ? वाटून तरी त्यांनी काय केलं असतं म्हणा. ते बिचारे सत्तेच्या मैदानात उतरले तेच मुळी अठरापगड पक्षांचं कडबोळं काखोटीला मारून. त्यात त्यांचा 'बोलविता धनी' (सॉरी धनीण) वेगळाच! त्यामुळे सत्तेवर आल्यापासून त्यांनी जी तोंडात मिठाची गुळणी धरली ती शेवटपर्यंत! मुळात राजकारण्यांची पावलं 'विधायक' गोष्टींकडे वळू शकतात असा विचारही आम्हा सामान्य जनतेच्या डोक्यात कधी येत नाही आणि आलाच तर तो आम्ही डासासारखा फटकन मारून टाकतो.  
भुजबळांची रवानगी तुमच्या भाजपने राजकीय विश्रामगृहात केली.  अहो काय म्हणायचं याला? आता नोटबंदी जाहीर करून तुम्ही तर 'विक्रमादित्य'झालात. देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यात सक्रिय असल्याचे पाहून आम्हा सामान्य नागरिकांना खूप गहिवरून येतंय. 'अजी सोनियाचा ( कृपया नावाचा विपर्यास करू नका ) दिनू'असं म्हणत नाचावंसं वाटतंय. 
पण तुमच्या लक्षात आलंय का तुम्ही कोणाशी पंगा घेतलाय ? केजरी आणि राहुल ही बाळे ठणाणा करतायत , किंचाळताहेत, रडतायत. त्यांना आधी शांत करा हो. निदान तुमच्याकडे असलेल्या 'व्हाईट मनी'तून त्यांना दोन खुळखुळे तरी आणून द्या.
तासनतास रांगेत तिष्ठत आम्ही राहतोय आणि एसी केबिनमध्ये आणि आलिशान गाड्यांत बसून विरोधक टाहो फोडत आहेत. अहो सत्तेवर येण्याआधी मी यंव करेन नि त्यंव करेन अशा राजकीय वल्गना सगळेच करतात. पण म्हणून सत्तारूढ झाल्यावर त्या दिलेल्या वचनांशी बांधील राहिलंच पाहिजे असं थोडंच आहे? आणि आम्हीही अशा राजकीय वल्गनांना सिरियसली घेतंच नाही.
पूर्वी जशा रेशनच्या दुकानांवर रॉकेल, साखर आणि तांदूळ घ्यायला लांबलचक रांगा लागायच्या तशा आज ATM बाहेर आणि बँकांत लागतायत. लोकांची गैरसोय होतेय, त्यांना उन्हातान्हात उभं राहावं लागतंय, त्यांचं रुटीन अपसेट झालंय असं चित्र जरी दिसत असलं तरी या भ्रष्टाचाऱ्यांचं कंबरडं एकदाचं मोडेल या सुखद जाणिवेची झुळूक हा त्रास सुसह्य व्हायला मदत करते आहे. या सुखाला विरोधकांची नजर मात्र लागायला नको. 
जनतेच्या त्रासाचं भांडवल करून तुम्हाला जेरीस आणण्याचे मनसुबे विरोधकांकडून रचले जात आहेत. ते तरी काय करतील बिचारे? २०१९ च्या निवडणुकी नंतरचं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आताच तरळायला लागलंय. आम्हाला त्रास होतोय पण यातून जर भ्रष्टाचाऱ्यांना सणसणीत चपराक बसणार असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ही जनभूमिका विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळतेय. 
मोदीजी तुमच्या सततच्या विदेशवाऱ्यांमुळे विरोधकांना काहीतरी बोलायला वाव मिळाला होता . पण ही नोटाबंदी करून त्यांच्या तोंडचा घास पळवलात तुम्ही . आणि एवढे १८-१८ तास कसलं काम करता हो?  अहो राजकारण्यांनी खुर्च्या फक्त उबवायच्या असतात.  त्यावर बसून त्यांनी जनहिताचे निर्णय थोडेच घ्यायचे असतात? अहो इतक्या वर्षांत जे आक्रीत घडलं नाही ते तुम्ही  घडवून आणलंत पण 'सरकार आणि निष्क्रिय'हे समानार्थी शब्द आहेत असं समजणाऱ्या आम्हा जनतेच्या अंगवळणी ही सवय पडायला नको का?
आता ५०० आणि १००० च्या नोटांची असंख्य बंडले उरीपोटी कवटाळून बसणाऱ्यांची आम्हाला विलक्षण काळजी वाटू लागली आहे. काय करतील ते? कुठे जातील ते? नोटांबर स्वत:ही गंगेत जलसमाधी घेतील का ते?
मुळात सरकार काहीतरी करतंय हीच भावना आमच्या मनात नव्याने जन्माला आली आहे. राजकीय वाद-विवाद, तंटे, कोलांट्या उड्या, धोबीपछाड, हमरीतुमरी अनुभवत आम्ही आज इथवर आलो आहोत. पण या वांझोट्या माळरानावर आणि बरबटलेल्या वाटांवर स्वच्छ, शुभ्र आणि सच्चेपणाचा सुवास असलेली फुले उमलणार असतील तर मोदीजी आम्ही थोडाबहुत त्रास सोसायला नक्कीच तयार आहोत. 
आपल्या धाडसाला त्रिवार सलाम!

आश्चर्याच्या  धक्क्यातून अजून न सावरू शकलेली
जनता ......





1 comment: