Wednesday 6 January 2016

शाही विवाह सोहळे …….


लग्न सोहळा ही प्रत्येकाची खाजगी बाब असते मान्य. परंतु ज्या व्यक्ती आज देशाच्या राजकारणात, समाजकारणात सक्रिय असून महत्वाची पदे, स्थाने भूषवित  आहेत त्या व्यक्तींनीच या देशातील सामाजिक परिस्थितीचे भान न ठेवता कोट्यावधी रुपये नुसत्या विवाह सोहळ्यावर खर्ची करणे ही दुर्दैवाची गोष्टच म्हणावी लागेल. असे समारंभ नित्यनेमाने संपन्न होत असतात. दुष्काळग्रस्त जनतेच्या, आर्थिक दृष्ट्या कंगाल झालेल्यांच्या जखमांवर मीठ चोळत असतात.      
आपल्या देशात गरीब-श्रीमंतातील दरी इतकी मोठी आहे की अनेकांच्या घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे तर दुसरीकडे फक्त विवाह सोहळ्यावर खर्च करण्यासाठी आर्थिक गंगा दुथडी भरून वाहते आहे. हा एवढा पैसा कुठून येतो हा भाग अलहिदा पण तरीही हा इतका अमाप पैसा एखाद्या विधायक गोष्टीसाठी वळवण्याची मानसिकताच लोप पावली आहे हे मात्र खरे. एकीकडे 'नाम' सारख्या संस्था अनेकांच्या तोंडात अन्नाचे निदान दोन घास पडावेत यासाठी प्रयत्नशील आहेत, दुष्काळात होरपळून गेलेल्यांची घरे सावरावीत म्हणून त्यांना आर्थिक मदत देऊ करत आहेत तर दुसरीकडे आपण जणू या देशाचा भागच नाही, इथल्या आर्थिक परिस्थितीशी आपले काहीच देणेघेणे नाही, येथील जनतेच्या सुखदु:खाशी आपले काहीच सोयरसुतक नाही अशा थाटात हे सोहळे साजरे करून केवळ हौशीखातर आणि लोकांचे डोळे दिपावेत म्हणून कोट्यावधींचा चुराडा केला जातोय.     
विवाह समारंभ साजरे करायला आक्षेप असायचं कारण नाही पण या सोहळ्यावर किती पैसा खर्च करावा हे तारतम्य तरी बाळगाल की नाही? आज कमीत कमी गेली तीन-चार वर्षे तरी मराठवाडा दुष्काळाच्या छायेखाली आहे. शेतकऱ्याचे हाल कुत्रेही खाणार नाही अशी अवस्था आहे. वीज नाही, पाणी नाही, शेतीसाठी अवजारे नाहीत, पाउसपाणी नाही म्हणून पिके नाहीत, मुले-बाळे उपाशी, गुरांना खायला हिरवा चारा नाही, बहुतांश शेतकरी अथपासून  इतिपर्यंत सावकाराच्या कर्जात बुडालेले, उपासमारीने पोटे खपाटीला जाऊन हाडे वर आलेली, पैशाअभावी मुलांचे शिक्षण बंद, साधी आन्हिके उरकण्यासाठीही पाणी नाही अशी बिकट अवस्था, याचा परिणाम म्हणून अनेकांनी गळा आवळणाऱ्या फासाशी सख्य जोडलेले, निसर्गाचं बिघडलेपण आणि अनेक सधनांचे औदासिन्य यामुळे इथले अनेक श्वास अवघडलेले आहेत. 
ज्या जनतेच्या जीवावर आपण राज्य करतो,  ज्यांनी आपल्याला निवडून दिल्यानेच केवळ आज हे महत्वाचे स्थान आपल्याला प्राप्त झाले आहे त्या जनतेच्या दु:खावर डागण्या दिल्यासारखे शाही विवाह सोहळे पार पाडायचे हे म्हणजे एकप्रकारे त्या जनतेच्या असहायतेवर उपहासणेच नव्हे काय? अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल, अठरापगड प्रांतांचे पदार्थ, पेये आणि त्यावर मनसोक्त ताव मारणारे सगेसोयरे, कोट्यावधी खर्च करून उभारलेली महाल सदृश्य वास्तू, लाखो फुलांच्या कमानी, बिछायती, अलिशान गाड्यांचे ताफे, नखशिखांत सोन्याने मढलेली मंडळी हे कितीही नेत्रसुखद वाटत असले तरी ज्या प्रांतात हा सोहळा संपन्न होतो आहे तेथील बिकट परिस्थिती सोयीस्कररित्या डोळ्याआड करणे असा त्याचा अर्थ होत नाही का?                          
अशा समारंभांना अंत नाही. असे सोहळे होतच असतात. आपण हळहळतो. ज्यांच्या मुखात दोन वेळचे अन्न जात नाही त्या आबालवृद्धांची चेष्टा केल्यासारखे वाटते.  एक प्रश्न मला राहून राहून विचारावासा वाटतो की ज्यांच्यासाठी हा एवढा घाट घातला जातो त्या उत्सवमूर्ती व्यक्तींच्या संवेदनाही तितक्याच बोथट असतात का? इतर आप्तस्वकीय या वारेमाप उधळपट्टीला आक्षेप कसा घेत नाहीत? इतकी भावनाशून्यता यांच्या ठायी असते का? भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे अजिबात भान न ठेवणे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्यांची जराही कदर न करणे एवढाच राजकीय बाणा हे जपतात का? ह्या प्रश्नांचा जर गांभीर्याने विचार करणारा कुणी असता तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती नजरेआड करून त्याने इतरांच्या दु:खावर आपल्या दांभिक ऐश्वर्याचा महाल कधीच उभा केला नसता. उलटपक्षी इतरांच्या कोमेजलेल्या अपेक्षांना आपल्या दातृत्वाचे खतपाणी घालून त्यांच्या स्वप्नांची इमारत त्याने बुलंद केली असती.  

No comments:

Post a Comment