Sunday 10 January 2016

रागाचे कलेवर……….

"राग शिकवता की रागाची प्रेते शिकवता? ज्या रागांची नावे घेण्याचे आजही धाडस होत नाही, असे राग वर्षभरात कसे शिकवून होतात?" हे उद्विग्न पश्न विचारले आहेत गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी. एम ए, एम फिल झालेले विद्यार्थीही शास्त्रीय संगीताचा रियाज कसा करायचा हे प्रश्न विचारतात ही लज्जास्पद गोष्ट आहे. मुळात शाळा, कॉलेज, महाविद्यालये या सर्वच ठिकाणी काय प्रकारचे, काय दर्जाचे शास्त्रीय संगीत  शिकवले जाते यावर या निमित्ताने  एक भलेमोठे प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.        
मुळात आपण शास्त्रीय संगीत का शिकायचे हा विचार किती जण करतात? मला केवळ 'संगीत विशारद', 'संगीत अलंकार' या certificate चा धनी व्हायचे आहे अशी मानसिकता त्यामागे असते का हे प्रत्येकाने तपासून पाहण्याची गरज आहे. उत्तम शास्त्रीय गायक कोणाला व्हायचे आहे आणि उत्तम मार्क मिळवणारा परीक्षार्थी कोणाला व्हायचे आहे हे त्या त्या व्यक्तीच्या सांगीतिक जाणीवेप्रमाणे ठरवले जात असतेच. लिखित ज्ञान आणि मौखिक ज्ञान यात फरक हा असतोच. ज्याप्रमाणे साहित्य हा विषय घेऊन एम ए झालेला प्रत्येक विद्यार्थी हा लेखक होऊ शकत नाही त्याचप्रमाणे संगीत हा विषय घेऊन एम ए झालेला प्रत्येक विद्यार्थी गायक होऊ शकत नाही. ख्यालाचे पाढे गाणारे अनेक असतात पण दुसऱ्याच्या हृदयाला भिडणारे गाणे गाणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. लोकानुरंजनासाठी चमत्कृतीपूर्ण गाणारे ढीगभर असतात परंतु घराण्याच्या प्रवाहाची चौकट न मोडता त्यातील सौंदर्याचे लालित्यपूर्ण दर्शन घडवणारे संख्येने खूपच कमी असतात.          
कोणत्याही प्रकारचे संगीत असो त्यासाठी रियाज हा अपरिहार्य असतो. मी गेली २० वर्षे सुगम संगीत शिकवते आहे. आजमितीला अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत.  गाणं शिकणाऱ्याकडे संयम आणि चिकाटी तर हवीच पण गानसाधनेसाठी द्यावा लागणारा विशिष्ट वेळही हवाच. रियाज नक्की कसा करावा हे सांगणारा गुरुही हवाच. परंतु बदलत्या जीवनमानानुसार वेळ ही गोष्ट दुरापास्त होत चालली आहे. त्यामुळे शिकायची तर इच्छा आहे पण रियाजाला पुरेसा वेळ नाही अशी तक्रार ऐकू येते. शिवाय अनेक सक्रिय माध्यमांमुळे आज आपल्याला येत असलेले गाणे 'show case' करण्याची कोण चढाओढ  लागलेली असते. 'Instant ' हा शब्द अनेकांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होत चालला आहे. काय शिकवलं यापेक्षा किती शिकवलं याला अवास्तव महत्व दिलं जातं. किती महिन्यात गाणं शिकून तयार होता येईल हा प्रश्न अनेक इच्छुकांकडून विचारला जातो. स्पर्धांमध्ये पटकावलेली बक्षिसे हे यांच्या उत्तम गायकीवरील अधिकृत शिक्कामोर्तब असते. शिकणारा प्रदर्शनाच्या आहारी जातो आणि त्याची सांगीतिक वाढ खुंटते.  
शास्त्रीय संगीत हा आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला अमुल्य ठेवा आहे. प्रत्येक घराणे वेगळे, त्यांची राग सादरीकरणाची, ख्याल मांडण्याची पद्धत भिन्न असते. अमक्या घराण्याचे गाणे चांगले तमक्या घराण्याचे वाईट असे वादसुद्धा अनेकदा कानावर येतात. ऐकणाऱ्यांचे गट पडतात. शास्त्रीय संगीत केवळ प्रतिष्ठेखातर ऐकणारेही खूप आहेत. आज भीमसेन ऐकला, किशोरी ऐकली, काय गाते राव मालिनी राजूरकर, कशाळकरांचा  गौड सारंग ऐकलाय का?  संजीवचा मधुकंस आणि अश्विनीचा ललत जीवघेणा आहे रे. अशी मतांची कारंजी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी नाहीतर आपण शास्त्रीय संगीताचे केवढे मोठ्ठे चाहते आहोत हे दाखवण्यासाठी चारचौघांत फवारली जातात. सवाई गंधर्व महोत्सव असो वा राम मराठे महोत्सव असो अनेकांना ते गाढ झोप येण्याचे हमखास ठिकाण वाटते ही अभिमानास्पद गोष्ट आहे काय?          
मारवा-सोहोनी, भूप-देसकार, भिन्न षड्ज-हेमंत या रागांच्या तफावतीच्या सीमारेषा इतक्या धुसर आहेत की एका रागातून दुसऱ्या रागात शिरणे सहज शक्य आहे. यामध्ये रागरसहानीचा मोठा धोका आहे. ह्या सारख्या रागांची मांडणी मोठ्या कौशल्याने करावी लागते. ह्या तफावती गळ्यात उतरवण्यासाठी  अथक परिश्रम घ्यावे लागतात. गळ्यालाही त्या विशिष्ट रागाचे वळण लागावे लागते. बरेच वेळा असं होतं की पेपरवरील थिअरी अचूक असते पण गळ्यातील थिअरी तिच्याशी तादात्म्य पावू शकत नाही. अनेक विद्यार्थी तेवढी तयारी झाली नाही या कारणास्तव ख्याल ताना वगळून गाताना ऐकले आहेत. तयारी नसताना असे अर्धवट गाणे गावेच का असा प्रश्न त्यांना कसा पडत नाही याचेच आश्चर्य वाटते.               
गाणे ही गुरुमुखातून प्रवाहित होणारी गोष्ट आहे. पण शिकवणारा झरा जर मूळचाची नसेल तर शिकणारयाच्या आत पाझरणारे पाणी सुद्धा अभिजात असेल याची ग्वाही कुणालाही देता येणार नाही. गान संस्कारांचा वटवृक्ष फोफावण्यासाठी जसे रियाजाचे खतपाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे उत्तम बियाणे पेरणेही तितकेच आवश्यक आहे. नाहीतर मग अशी रागांची निश्चेष्ट पडलेली कलेवरेच श्रोत्यांना ऐकू येतील.      

No comments:

Post a Comment