Tuesday 24 February 2015

कसं व्हायचं आपलं ……….


आपल्या सर्वांचीच कमाल आहे हं! म्हणजे आपण थंडीत म्हणतो केवढी थंडी आहे आणि उन्हाळ्यात म्हणतो केवढं उकडतंय. हे म्हणजे कॉंग्रेसच्या राजवटीत केवढा हा भ्रष्टाचार आणि भाजपच्या राजवटीत केवढी ही धर्मांधता असं म्हणण्यासारखं आहे.     
रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसले की आम्ही नाकावर रुमाल तरी धरणार किंवा रस्ता तरी बदलणार. आपल्या लहानपणापासून रस्त्यावरील, ट्रेनमधील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गलिच्छता  पाहूनही डोळ्यांना आणि नाकांना त्याची सवय होत नाही म्हणजे काय ? उघडी गटारे, घाणीने तुंबलेले नाले, पानांच्या पिचकाऱ्यांनी बरबटलेल्या भिंती, थुंकीने सजलेले रस्ते, क्रियाकर्म करून सजवलेले आडोसे हे सगळे आपल्या राज्याचे, देशाचे वैभव नाही का? म्हणूनच या घाणेरड्या सवयी अशा वर्षानुवर्षे जतन केल्या जातात.       
कुठेतरी, कोणातरी चिमुरडीवर पाशवी बलात्कार झाला तर आमचे मन एवढे आक्रंदून का उठते ? कित्येक वर्षांपासून अशाच प्रकारच्या बातम्या वाचून आणि ऐकून आपली गात्रे बधिर कशी होत नाहीत? बलात्कार करणारी माणसे आहेत का पशु? यांना आया-बहिणी नाहीत का? असे वांझोटे प्रश्न आपण स्वत:ला का पुन्हा पुन्हा विचारात राहतो? शिवाय बलात्कारा सारख्या अधम आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्याला शिक्षा मिळायलाच हवी असं कुठल्या बुकात लिहिलंय? आणि लिहिलं असेल तरी कायद्याच्या पळवाटा आहेतच ना त्यांच्या या कृष्णकृत्यावर पांघरूण घालायला?  सकाळी बातमी वाचून आपण मात्र सबंध दिवस उद्विग्न मनस्थितीत घालवणार. काय चाललंय या देशात असे विषण्ण होऊन म्हणणार. बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिलं पाहिजे, हत्तीच्या पायदळी दिलं पाहिजे, तोफेच्या तोंडी दिल पाहिजे, टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला पाहिजे, त्याचे हात-पाय कलम केले पाहिजेत असं संतापाने बोलत राहणार. स्वत:शीच. अहो इथे वेळ आहे कुणाला? ज्याला त्याला आपल्या चरितार्थाशीच मतलब आहे. शिवरायांचा जमाना केव्हाच इतिहासजमा झाला आहे हे तरी आपल्या लक्षात येते आहे का?         
  अंधश्रद्धेविरुध्द जन्मभर लढा देत ज्या वयात शरीराने आणि मनाने निवृत्त जीवन जगायचं त्या वयात एवढ्या तळमळीने समाजोद्धार करायला दाभोलकर का सरसावले? ८२ वर्षाचे वृद्धत्व अंगावर घेऊन गोर-गरिबांच्या न्याय्य हक्कासाठी आणि टोलविरोधी आंदोलनात पानसरे एवढे सक्रिय का झाले ? दोघांनाही माहिती होतं की दबा धरून बसलेला मृत्यू क्षणाक्षणाला त्याचा पाठलाग करतो आहे. तरी झपाटल्यासारखे काम करत राहिले. नतीजा? दोघांनाही या भूमीवरून एकाच प्रकारे नेस्तनाबूत करण्यात आलं. दाभोलकर गेल्यावर जशा चर्चा रंगल्या तशाच पानसरे गेल्यावरही रंगल्या. सरकार आणि विरोधकांची एकमेकांवर आगपाखड करून झाली. व्यवस्थेला दूषणे देऊन झाली. पोलिसांच्या हतबलतेबद्दल सुस्कारे सोडून झाले. गवसले का काही हाती? तो काळाकुट्ट दिवस आपण शोकमग्न अवस्थेत घालवला आणि दुसऱ्या दिवशी क्रिकेटचा सामना बघण्यात गर्क झालो. महाराष्ट्र बंद किती यशस्वी झाला?     
आजकाल काळ जणू शेतकऱ्यांच्या जीवावरच उठला आहे. पिकामागून पिकं उध्वस्त होताहेत. बागाच्या बागा जळून जात आहेत. मनाने आधीच मेलेला शेतकरी फास लावण्याचा केवळ उपचार पार पडतो आहे. पण विशेष काय त्याचं? सत्ताधारी पक्षाने कोट्यवधींची मदत जाहीर केली आहे. ती शेतकऱ्यांना मिळो वा न मिळो. शाब्दिक रित्या जाहीर करणं महत्वाचं. सत्ता कोणाचीही असो, शेतकऱ्याच्या नशिबी सत्यानाश हा प्रारब्धभोग लिहिलेलाच आहे. दुष्काळाने करपून गेलेली शेते किंवा अवकाळी पावसाने वाहून गेलेली शेते आपण उघड्या डोळ्यांनी बघत रहायची आणि ही दुर्दशा सहन न झाल्याने शेतकऱ्याने डोळे मिटायचे हीच वहिवाट आजवर चालत आली आहे. शेतकरी कर्जबाजारी होवो नाहीतर त्याची जीवनयात्रा संपून जावो, एकमेकांची उणीदुणी काढण्याचे राजकीय कर्तव्य सर्व पक्षांनी तत्परतेने करायचे हा रिवाज आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तर घडायच्याच. त्याने काय एवढे विचलित व्हायचे?     
शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना लाखो लिटर दूध वाया गेले तरी चालेल पण ते गोरगरीब मुलांच्या चुकूनही तोंडी लागता कामा नये. सण-समारंभ, शाही सोहळे, कुंभमेळे,डोळे दिपवणारी रोषणाई या सर्व गोष्टींवर कितीही वीज आणि पैसा खर्च झाला तरी चालेल पण हीच वीज आणि हाच पैसा कोणत्याही विधायक कामांकडे अजिबात वळवायचा नाही. भारताला शांघाय करायचा प्रयत्न करायचा पण अजूनही गावोगावी, खेडोपाडी केवळ पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणाऱ्या महिलांचे प्रश्न अनुत्तरितच ठेवायचे. टोलेजंग इमारती बांधायच्या पण पायाखालचे रस्ते खड्डेविरहित म्हणून करायचे नाहीत. भारत बलाढ्य राष्ट्र म्हणून छात्या फुगवायच्या पण या राष्ट्राच्या मुळावर येऊ शकणारे परप्रांतीय लोंढे थोपवायचे नाहीत. लोकसंख्येला आळा घालण्याचे वैध उपाय मनात सुद्धा आणायचे नाहीत. परदेशांच्या धर्तीवर नाईटलाईफच्या लंब्याचौड्या बाता मारायच्या पण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेचा धसास न लागलेला प्रश्न तसाच लोंबकळत ठेवायचा. स्कॉटलंड पोलीसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर असे अभिमानाने नुसते म्हणायचे पण या पोलिसांच्या राहत्या घराची अतिशय दयनीय अवस्था, त्यांचा तुटपुंजा पगार, त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण सोयीस्कररित्या दृष्टीआड करायचा.        
आणि शाळेत असताना शिकवलेले 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा' हे राष्ट्रभक्तीपर गीत आठवत आपण या निष्प्राण समाजव्यवस्थेकडे आणि निष्क्रिय सत्ताधारयांकडे बघता बघता आतून संपून जायचं.             

No comments:

Post a Comment