Thursday 19 February 2015

निमित्त ......


शरीराचे वस्त्र उतरवायला प्रत्येकालाच काहीना काही निमित्त होतं. जो शरीररूपी वस्त्र चढवतो त्या प्रत्येकाला कधी ना कधी इथेच या धरेवर ते उतरवायलाच लागते. हे वस्त्र चढवण्या-उतरवण्यामधील जो काही वेळ असतो त्याला आपण आयुष्य म्हणून संबोधतो. जे वस्त्र धारण केले आहे त्याचा त्याग करायला हा लागणारच हा अटळ भोग माहित असूनही या दरम्यान जो तो चरितार्थासाठी म्हणा किंवा निव्वळ स्वार्थासाठी प्रचंड उपद्व्याप करत असतो. 'जितनी चावी भरी है रामने उतना ही चले खिलौना'  हे ज्ञात असूनही इतरांच्या भरलेल्या चाव्या आपल्या इंजिनाला लावायचा निष्फळ खटाटोपही  अनेक जण करत असतात. हा पृथ्वीतलावरचा 'पपेट शो' आहे हे मान्य करावेसे कुणालाच वाटत नाही.       
रस्त्यातून चाललेला धडधाकट मनुष्य अचानक चावी काढून घेतल्यासारखा गतप्राण होऊन खाली कोसळतो तर काही खेळणी रडत-कुंथत इच्छा नसून सुद्धा चावी काढली गेली नाही म्हणून संसार नामक भयानक वास्तव रेटत राहतात. झोळी पसरून 'मरण दे देवा' असे रोज त्या परमेश्वराला विनवत शरीर नामक सांगाडा अंगावर बाळगणारी माणसे शरपंजर अवस्थेत कित्येक वर्षे खितपत पडून असतात आणि रात्री मित्रांबरोबर मनसोक्त गप्पा मारणारा कुणी 'अ' नामक भिडू दुसऱ्या सकाळी निद्रावस्थेतच देह सोडतो. हे थ्रिल कमी असते की काय म्हणून तलवारी,बंदुका,सुरे,गुप्त्या या शस्त्रांनी  दुसऱ्याच्या आयुष्यातील थ्रिल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया,टी. बी.आणि असे असंख्य आजार दरमहा सगळ्यांचीच एक्साईटमेंट वृद्धिंगत करत राहतात.     
रस्त्यांवरचे दिसणारे आणि अदृश्य खड्डे ज्याची वेळ आली त्या येणाऱ्या जाणाऱ्या कुणाच्याही शरीरातील हाडांची चाचणी घेतात आणि निखळलेली हाडे सांधण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जनचं गतजन्मीच ऋण चुकतं करावं लागतं. (सगळ्यांच्या पोटाची खळगी भरायची व्यवस्था वरच्याने केली आहे याची अशावेळेस बालंबाल खात्री पटते) दारू ढोसून आणि बेदरकारपणे गाडी चालवून त्याखाली दोन-पाच माणसे सहजगत्या चिरडणे हा तर लोकसंख्या कमी करण्याचा हमखास उपाय आहे असे काही महाभागांना वाटत असावे. शिवाय गोरगरिबांना या जगात राहण्याचा काय हक्क आहे असेही काही गेंड्याच्या कातडीच्या मनुष्यवजा प्राण्यांना वाटू शकते. आपल्या देशात किडा-मुंग्यांसारखी माणसे मरतातच, त्यात विशेष काय असं म्हणायचं आणि वर्तमानपत्राचे पान उलटायचे हा रिवाज आहे.       
 शेतात धान्याचे पिक येण्याऐवजी आत्महत्याचं पिक येत चाललंय. सरकार भरघोस मदत (असं शासनकर्तेच सांगतात) जाहीर करतं पण ती मदत शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही. न पोहोचलेली मदत करून सरकार सुटकेचा निश्वास टाकते आणि कसलीच मदत न मिळाल्याने शेतकऱ्याच्या मरणाचा भाव वधारतो. देवदर्शनाला गेलेली माणसे चेंगराचेंगरीत मारणे, लग्नाचे वऱ्हाडच्या वऱ्हाड बससकट नदीत कोसळणे हे थ्रिल सुद्धा दर  दोन-तीन महिन्यांनी पाहायला मिळतेच. शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट, विमाने त्यातील प्रवाशांसकट गायब होणे, बिल्डिंगा रहिवाशांसकट कोसळणे अशा वैविध्यपूर्ण आपत्तींच्या सिरियल्स चालूच असतात. बलात्कार आणि हत्यांचे डेली सोप्सही असतात. एवढी सगळी निमित्ते असूनही आपल्या देशाची लोकसंख्या काही करून कमी कशी होत नाही हे जगातलं आठवं आश्चर्य मानायला हरकत नाही.                
ब्लडप्रेशर, डायबेटीस हे आजच्या तरुणाईच्या मते चिंधी रोग आहेत. ते काय होतातच. माणसे काय तशातही जगतातच! कामाच्या भयंकर व अनियमित वेळा पोटातील भूक शमवू देत नाहीत. त्यात सतत संगणकासमोर बसून डोळे, मान, खांदे, पाठ हे अवयव काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतात. दुसरया व्यक्तीशी अथवा कंपनीशी स्पर्धा करण्याच्या नादात आज तिशी-पस्तिशीत केसांना पांढरा मुलामा चढतो आहे. 'वर्क प्रेशर' च्या नावाखाली अनेकांची धडधाकट हृदये कमकुवत होत चालली आहेत. ही 'दिल की घडी' कधीही टिकटिक करायची थांबवेल इतकी ही जीवघेणी मानसिक दमछाक आहे. त्यात 'स्ट्रेस डायबेटीस' हा प्रकार तर अगदी कोवळ्या मुलांच्या दप्तरातच जाउन बसला आहे. कॅन्सर नामक आजाराच्या उच्चारातच माणूस अर्धा मरतो. उरलेलं मरण त्याला त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आप्तांच्या नजरेत दिसतं. 'मलाच का' या प्रश्नाचं उत्तर शोधेपर्यंत पुढच्या जन्माच्या प्रवासाची वेळ येउन ठेपते.     
आपल्या जन्माला आपले आई-बाप निमित्त होतात आणि मरणाची अगणित निमित्ते आपल्या आत आणि बाहेर अव्याहतपणे घिरट्या घालत असतात. कुठल्या निमित्ताकारणे कोणाला व कधी ही इहलोकीची यात्रा आटोपती घ्यावी लागेल हे रहस्य मात्र काळाच्या कुपीत घट्ट बंद असते.        
  

No comments:

Post a Comment