Friday 31 January 2014

दंगलींचे राजकारण............


 निवडणुका जसजशा जवळ येतात तशा खपली धरलेल्या जखमा खरवडून त्याचे राजकारण सुरु होते. तळागळात दफन केलेले मुडदे वर येतात. अगदी जाहीर सभांमध्येही राजकीय वक्ते त्याचा झणझणीत परामर्श घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत.  विविध वाहिन्यांचे संपादक, वार्ताहर, मुलाखतकार राजकीय व्यक्तींवर एखादे सावज मिळाल्यासारखे तुटून पडतात.  एखाद्या पक्षाचा प्रवक्ता दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यावर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवतो. हीच संधी साधत तो प्रवक्ताही  शब्दांच्या डरकाळ्या फोडत त्याच्या शत्रू पक्षाला चारी मुंड्या चित केल्याचा आव आणतो. अशी सारी राजकीय रणधुमाळी आपण सर्वचजण रोजच टीव्ही वर पाहतो. त्यातून काहींचे मनोरंजन होऊ शकते  तर काहींना मनापासून या गलिच्छ राजकारणाचा संताप येऊ शकतो.     
आजकाल दंगलींचे राजकारण जिथेतिथे जोरात सुरु आहे.  १९८४ ची दंगल व्हर्सेस २००२ ची दंगल असे त्याचे स्वरूप आहे. मध्ये कुठेतरी १९९३च्या बाबरी मशिदीचा उल्लेखही मधेच डोकावतो. गांधी व्हर्सेस मोदी असे राजकारण सुरु असल्याने इंदिरा गांधी गेल्यानंतरच्या दंगली आणि गोध्रा हत्याकांडा नंतरच्या  दंगली अशी आग पुन्हा एकदा जनमानसांत पसरवली जात आहे .  या दंगलींच्या पटावर राजकारणातील प्यादी आपापली सरशी करू पाहत आहेत.  
हे म्हणजे कसं आहे की मी नव्याण्णव उंदीर मारले आणि तू शंभर . अर्थात तुझे पातक माझ्यापेक्षा जास्त, त्यामुळे सत्ता उपभोगायला मी तुझ्यापेक्षा जास्त लायक असा युक्तिवाद चालला आहे. तू हजार घरफोड्या केल्यास आणि मी केवळ नऊशे नव्याण्णव तेव्हा सिंहासनावर आरूढ व्हायला तुझ्यापेक्षा मीच जास्त योग्य नाही का असा सवाल, असे प्रश्न दुसऱ्या पक्षाला विचारले जात आहेत.    
इंदिरा गांधी गेल्यानंतर असंख्य निरपराध शिखांचे शिरकाण झाले. पोलिसांची कुमक तिथे योग्य वेळेस पोहोचली नाही . राजीव गांधी नुकतेच पंतप्रधान म्हणून घोषित झाले होते . ते या क्षेत्रात अननुभवी होते. त्यांनी या प्रसंगी उधृत केलेली वाक्ये आणि एकंदर शिखांच्या मनात कायमचा उमटलेला ओरखडा या सर्व गोष्टी जनतेला ज्ञात आहेत. गोध्रा हत्याकांड झाल्यानंतर गुजरातेत याचे उमटलेले हिंसक पडसाद सुद्धा समस्त जनतेने अनुभवले. पोलिस तिथेही योग्य वेळेत पोहोचू शकले नाहीत. ही सारी किमया नक्की कुणाची हे न कळण्याइतपत जनता दुधखुळी नाही.        
सध्या भारतापुढे उभे असलेले ज्वलंत प्रश्न सोडवण्यास एकही राज्यकर्ता उत्सुक नाही. देशाचा विकास साधण्याचा खटाटोप करण्याऐवजी स्वत:चा विकास साधण्यासाठी किंवा यातून स्वत:च्या पक्षाला राजकीय लाभ मिळवून देण्यासाठीच जो तो झटतो आहे. दंगलीत किती माणसे मारली गेली याचे  statistics दाखवून आणि तुमच्या पक्षाने आमच्या पक्षापेक्षा शंभर-दोनशे अधिक मारली असे म्हणून पापक्षालन होणार आहे का?  सत्ता उपभोगणे हा अंतिम हेतू असल्यामुळे हे पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी कोणत्याही थराला शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे.  
एका वाहिनीवरून एक मुलाखत प्रक्षेपित होते. मुलाखतकार दंगली संबंधी प्रश्न विचारतो आणि  जे उत्तर येते त्यामुळे काही वर्षांपूर्वी दुखावलेली, अपमानित झालेली मने पुन्हा एकदा नव्याने दुखावली जातात. मग मोर्चे, निदर्शने यांना उत येतो. दु:खद आठवणी जाग्या होऊन ठुसठुसायला लागतात. दंगली कोणी पेटवल्या, सक्रिय सहभाग कुणाचा, पोलिस कधी आले, किती माणसे मेली या सर्व  मुद्द्यांवर परत एकदा चर्विचर्वण होते. पक्षाचा आणि वाहिन्यांचा TRP वाढायला याची मदत होत असावी . मात्र या दंगलींत प्रत्यक्ष भरडल्या गेलेल्या लोकांना याचा किती त्रास होत असेल असा साधा विचारही कुणाच्या मनात येत नाही. आपल्या गेलेल्या माणसांच्या दु:खावर काळ हेच औषध आहे असे समजून जी माणसे आज मानसिक दृष्ट्या सावरली असतील त्यांना पुन्हा त्याच भीषण गोष्टींची आठवण हे राजकीय पक्ष आणि इतर संबंधित का करून देऊ इच्छितात ?      
आमच्या भारत देशाची प्राचीन परंपरा, संमृद्ध संस्कृती, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता या गोष्टींचा मागमूस तरी आता राहिला आहे काय असा प्रश्न पडतो.  जळी-स्थळी स्त्रीची होणारी अवहेलना, तिची दिसामाशी ढळणारी मानसिकता, तिला भेडसावणारी असुरक्षितता, अशिक्षितता, बेकारी, चोऱ्या-दरोडे-खून,  नैराश्यापोटी होणाऱ्या आत्महत्या, अस्मानाला भिडणारी महागाई, जीवनावश्यक गोष्टींची टंचाई,  हॉस्पिटल्सची दुरावस्था, सार्वजनिक अस्वच्छता,  चुकीच्या शिक्षणक्रमात भरडून निघणारे बाल्य, बालमजुरी, शेतकऱ्यांच्या समस्या, पोलीसदलाच्या समस्या, अंगणवाडी महिलांचे प्रश्न, रस्ते-वीज-पाणी, बोकाळलेली अश्लीलता  या आणि अशा कित्येक मुलभूत प्रश्नांना हात घालण्याऐवजी  केवळ दंगलींचे राजकारण पेटवून त्यावर स्वत:ची पोळी भाजणारे सर्व पक्ष म्हणजे असंवेदनशील प्रवृत्तीचे एक जितेजागते उदाहरण आहे.           
आज कोणत्याही राजकीय पक्षाला कसलेही तारतम्य, कोणताही विधिनिषेध उरलेला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. एक मुद्दा निवडायचा आणि त्यावर रान उठवायचे असा प्रकार सर्रास चाललेला आहे. सत्ता कोणाचीही येवो , जनसामान्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अजिबात शाश्वती नाही. महिलांच्या सुरक्षिततेची निश्चिंती नाही. स्वस्ताईची हमी नाही. तेव्हा कोणालाही मत देणे म्हणजे काळोख्या गल्लीत पुनश्च फिरून येणे यापेक्षा अन्य काही साध्य होईल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे.      

No comments:

Post a Comment