Saturday 4 May 2013

वो भारत देश है मेरा ?

पूर्वी भारत देशाची शान सार्थ करणारं दिवंगत पृथ्वीराज कपूरवर चित्रित झालेलं एक गाणं 'छायागीत' या कार्यक्रमात अनेक वेळा ऐकलं जायचं. ते गाणं होतं, '  जहाँ डाल डाल पर सोनेकी चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा'. या गाण्यात भारत देशाविषयी अभिमान वाटण्याजोग्या अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या. आता पृथ्वीराज कपूर, ते गाणं आणि त्यात दाखवली गेलेली भारताची शान इतिहासजमा झाली आहे.   
सद्यस्थितीत भारत देशात चाललेल्या कोणत्या गोष्टींबद्दल अभिमान बाळगायचा? सध्याच्या भारत देशाचे  ' जहाँ नाके नाके पे बलात्कारी डाले है अपना डेरा, वो भारत देश है मेरा' असे दु:खद वर्णन करायची पाळी येथील नागरिकांवर आलेली आहे. व्यासांनी रचलेल्या महाभारताचा पदोपदी नको तेवढा प्रत्यय येतो आहे. महाभारतात एक दु:शासन होता आता जागोजागी, गल्लोगल्ली,बोळाबोळांत ,नाक्यानाक्यावर असे खंडीभर दु:शासन कोणताही मुलाहिजा न बाळगता कोणत्याही वयातील मुलींच्या आणि महिलांच्या पदराला बिनदिक्कत हात घालत आहेत. सुनसान गल्ली, अंधारा रस्ता आणि एकटीदुकटी स्त्री या तीन गोष्टी कोणत्याही स्त्रीचे शील तिच्यापासून हरवून घेण्यास समर्थ आहेत. रात्रीची वेळ, ट्रेन, बस किंवा इतर काही वाहने स्त्रीची अब्रू तिच्यापासून हिरावून गेण्यास समर्थ आहेत. यावर उपाय काय तर मुलीने किंवा स्त्रीने बाहेर जाणे टाळावे. गेलीच तर बरोबर एखादा पुरुष असावा. म्हणजे एकट्या पुरुषानेही मार खाण्याची किंवा प्रसंगी जीव गमावण्याची तयारी ठेवावी. व्यवसायानिमित्त एखाद्या स्त्रीला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असेल किंवा ती शिफ्टमध्ये काम करत असेल तर अशा गैरप्रकारांना बळी पडण्याची तिने मानसिक तयारी करून ठेवावी.   
भारताची राजधानी बलात्कारांच्या आकडेवारीच्या बाबतीत अग्रेसर आहेच. पण इतरही अनेक ठिकाणी जणू पेव फुटल्यासारखे बलात्कार होतच आहेत.  मोर्चे, निदर्शने, आक्रोश, संताप, उपोषण कोणत्याही मार्गांनी सत्ताधारी जराही मुळापासून हलत नाहीत. ते समित्या बसवतात, अहवाल सादर करतात, चर्चा करतात पण एखाद्या वांझेसारखे त्यातून कोणतेही ठोस उपाय, निर्बंध, कडक कायदे प्रसवत नाहीत. पोलिस, रिपोर्ट्स, कोर्ट-कचेऱ्या, जबान्या, आरोप-प्रत्यारोप,वकिली पवित्रे, टेबलाखालील पाकिटांचे वजन, कायद्याची चौकट ई. च्या योग्य वा अयोग्य रसायनातून पिडीत मुलीचे वा स्त्रीचे बरे अथवा वाईट भवितव्य ठरते.       
 दुष्काळग्रस्तांसाठी जमा झालेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही ही व्यथा सांगणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्यंत हिडीस उपाय ऐकण्याची पाळी राज्यातील एका जबाबदार व्यक्तीमुळे येते.  अनधिकृतरित्या भूखंड हडपणारे  आणि राजरोस लाच घेणारे शासनातील महत्वाची पदे भूषवतात. याशिवाय ऐन परीक्षेच्या वेळी होणारे अक्षम्य घोटाळे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे अपरिमित नुकसान, निराशेपोटी मुलांनी केलेल्या आत्महत्या, राज्यातील पोलिसदलावर पडणारा अतिरिक्त ताण, त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन, महागाईने मोडलेले सामान्य माणसांचे कंबरडे,  मुंबई सारख्या शहरात येणारे परप्रांतीयांचे लोंढे,  जागोजागी उखडलेले रस्ते, अनेक ठिकाणी साचलेला कचरा त्यातून पसरणारी दुर्गंधी व रोगराई , अनेक हॉस्पिटलांची झालेली दुरवस्था, यांतील कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा?  नाईलाजास्तव धक्के खात सकाळी ट्रेनमध्ये आपला देह कोंबून संध्याकाळी त्याच जीवघेण्या गर्दीतून सहीसलामत बाहेर आल्याबद्दल अभिमान बाळगायचा की पचापचा थुंकून ट्रेनच्या दरवाज्यांवर चित्रकलेची प्रात्यक्षिके करून दाखवल्याबद्दल सदरहूंचा  अभिमान बाळगायचा? बसच्या कंडक्टर - ड्रायव्हरच्या प्रवाशांचा खास उर्मट शब्दांत पाणउतारा करणाऱ्या बोलीचा अभिमान बाळगायचा की गटारे उघडी ठेवून त्यात चिमुरड्यांचा बळी देऊ पाहणाऱ्या बेपर्वा पालिका कर्मचाऱ्यांचा अभिमान बाळगायचा? आम्ही तुमच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर अवतरलेले परमेश्वराचे अवतार आहोत असे सांगून भोळ्या जनतेला, बाया -बापड्यांना ठकवून करोडोंची पुंजी जमवणाऱ्या सिद्धबाबा नामक महाभागांचा अभिमान बाळगायचा की आपली अवैध मार्गाने जमवलेली माया स्विस बँकेत ठेवून आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही असे अत्यंत निर्ढावलेपणाने छाती पिटीत सांगणाऱ्या राजकारण्यांचा अभिमान बाळगायचा?  पादचाऱ्यांना पदोपदी डॉक्टरांकडे पाठवणाऱ्या उचकटलेल्या रस्त्यांचा अभिमान बाळगायचा की माणसांच्या तोंडचे पाणी आणि घरातील वीज गायब करून उपासमार आणि अंधाराचे साम्राज्य पसरवणाऱ्या अधिकारी वर्गाबद्दल अभिमान बाळगायचा? 
आमच्या मनातील भारत वेगळा आहे. आमची भूमी सुजलाम सुफलाम आहे. इथे वर्णभेद,जातीभेद यांना थारा नाही. इथे अन्न-धान्याचा तुटवडा नाही. इथे बेकारी, बेरोजगारी नाही. इथे अन्यायाला कडक शासन आहे. इथे भ्रष्टाचारी माणसांना हद्दपारीची शिक्षा आहे. इथे आयाबहिणींची अब्रू लुटणाऱ्या गिधाडांना मरणप्राय शासन आहे. इथे स्वच्छता, स्वास्थ्य, आरोग्य या गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे. इथे समाजकंटकांना जगण्याची मुभा नाही. इथे प्रदुषणाला पूर्णविराम आहे. या देशात वीज आणि पाणी मुबलक आहे. इथे श्रद्धेचा, शिक्षणाचा बाजार मांडलेला नाही. इथे माणूस माणसाचा आणि निसर्गाचा आदर करतो आहे.                 
 या मनोराज्यातील शिवधनुष्याला प्रयत्नांची प्रत्यंचा लावण्यासाठी आपण सारे भारतवासी कटिबद्ध आहोत असे वाटण्याइतपत तरी आपण जागे आहोत का? 

No comments:

Post a Comment