Wednesday 17 April 2013

'आजचा दिवस माझा' या चित्रपटाच्या निमित्ताने……….


काही दिवसांपूर्वी प्रसृत झालेला हा चित्रपट चांगला आहे. सर्व राजकारण्यांनी पाहण्यासारखा आहे व त्यातून बोध घेण्यासारखा आहे. माणसाची, त्यातून सत्तेवरील माणसाची इच्छाशक्ती दुर्दम्य असेल तर एका रात्रीतही चमत्कार घडू शकतो याचा प्रत्यय चित्रपट बघताना येतो. सत्तेत प्रमुखपद भूषवणारा जर मनात आणेल तर जनहितासाठी योग्य बदल घडवत सामान्य माणसाच्या मनातील स्वप्नांना सत्याचे पंख देऊ शकतो. पण मुळात असा बदल घडवण्याची त्याची इच्छा असेल तरच! नाहीतर केवळ स्वत:च्या सगे-सोयऱ्यांची सोय करून इतर लायक लोकांची गैरसोय करणारेच या क्षेत्रात जास्त आहेत. 
अहो भर रस्त्यावरील खड्डे या राजकारण्यांना दिसत नाहीत का? पण ते बुजवण्याची इच्छा असलेले किती असतात? ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग मुळे बकाल झालेल्या भिंती, उघडी गटारे, नाक्यानाक्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग, रोजची वाहतुकीची होणारी कोंडी,  अनधिकृत इमारती, जंगलात जाऊन केलेली प्राण्याची शिकार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, पैशाअभावी सर्वसामान्यांना नाडणारी हॉस्पिटले, रोज काही ना काही कारणाने जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी रेल्वे, शिक्षणाचा होत  असलेला चुथडा, खिशाला आव्हान देणारी महागाई, राजकारण्याचे लांछानास्पद वर्तन, दुष्काळ, बेरोजगारी, बालमजुरांच्या समस्या, वृद्ध-अपंगाच्या समस्या असे अनेक प्रश्न तडीस लावून जनतेचे भविष्य सुकर करायचे सोडून स्वत:चे खिसे गरम करून आपले भविष्य सुकर करण्याच्या कामीच हे सत्ताधारी लागलेले असतात.   
राजकीय वाद , उद्घाटने, समारंभांची निमंत्रणे, भाषणे, बक्षिसांचे वितरण अशा अनेक मौलिक व्यापात व्यस्त असलेले हे सत्ताधारी इतर त्यांच्या दृष्टीने बिन-महत्वाच्या कामांत काय म्हणून लक्ष घालतील? अहो यांनी समारंभांना हजेरी लावली नाही तर समारंभाची शान बिघडणार नाही का? सत्ताधारयांच्या हातून पारितोषक स्वीकारण्यात काय मजा असते ते आम जनतेला काय कप्पाळ कळणार? शिवाय रिबिनी यांनी नाही कापायच्या तर कुणी कापायच्या? राजकीय वाद, एकमेकांवर कुरघोड्या, दोषारोप नाही केले तर पत्रकार सनसनाटी बातम्या कशा मिळवणार ? प्रत्येक वाहिनीचा टी. आर. पी कसा वाढणार? लोक टी. व्ही. ला  खिळून कसे बसणार? एकमेकांविरुद्ध षड्डू ठोकून, रिंगणात उतरून आपापल्या राजकीय सामर्थ्याचे प्रदर्शन करणारे मदमस्त सत्ताधारी लोक कसे बघू शकणार?    
निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतात तसतसे या क्षेत्रातील नामधारी हळूहळू जागे होतात. कार्यरत असल्याचे निदर्शनास आणतात.  नागरी वस्त्यांत फिरून जनमताचा कौल घेऊ लागतात. आता जनतेच्या समस्या यांना अंधुकशा दिसू लागतात. विजयाची गुढी उभारायची तर या जनतेला शरण जाण्यावाचून पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांच्या समस्यांवर तात्पुरती का होईना पण फुंकर ही घालावीच लागते. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे नाटक करावे लागते, धान्याचे-भाज्यांचे भाव कमी करावे लागतात, आश्वासनांचे डोस पाजावे लागतात, अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी समित्या नेमाव्या लागतात, समस्त स्त्री-वर्गाला संरक्षण देण्यासाठी काही उपाययोजना कागदावर तयार ठेवाव्या लागतात, झोपडपट्टीची पाहणी करून  त्यात राहणाऱ्या जनतेच्या गरजेनुसार त्यांना गोष्टी मोफत पुरवल्या जातात, पाणी-वीज या समस्यांवर तोडगे काढावे लागतात, अवेळी येणारा पाउस किंवा दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान, कर्जात आकंठ बुडालेला शेतकरी, नैराश्यापोटी त्याने केलेल्या आत्महत्या अशा सत्ताधाऱ्यांच्या गळ्यापर्यंत येणाऱ्या समस्या राजकीय कुशलतेने दूर ठेवण्यात यशस्वी व्हावे लागते, एकदा खुर्ची मिळाली की पुन्हा पाच वर्षांसाठी या प्रश्नांकडे पाठ फिरवली तरी काही बिघडणार नसते .      

मुळात मला या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे भले करायचे आहे ही प्रामाणिक इच्छा किती सत्ताधाऱ्यांच्या मनात असते ही संशोधनाचीच बाब आहे. शेवटी रामाच्या मंदिरात जाउन रामाला पूजणे सोपे आहे पण त्याच्या आदर्श राज्यकारभाराचा कित्ता गिरवणे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर खचितच पडण्यासारखे नाही. शिवबांच्या पुतळ्याला हार घालणे सोपे आहे परंतु त्यांच्यासारखा  निर्भीडपणे, निपक्षपातीपणे राज्यकारभार चालवणे महत्कठीण काम आहे. 
इतरांचे भले करण्यासाठी थोडेच आपण या सत्तेवर विराजमान झालो आहोत? आधी आपले भले करू मग इतरांचा विचार करू अशा विचारांच्या प्रवाहात स्वत:च्या माणुसकीच्या प्रतिमेचे विसर्जन करणाऱ्या सर्व सत्ताधाऱ्यांना माझा कोपरापासून ढोपरापर्यंत नमस्कार!


No comments:

Post a Comment