Wednesday 21 November 2012

क्षणभंगुर परि ऐसे जीवन ..........

उणापुरा तीस वर्षाचा तरुण काही एक दृश्य स्वरूपाचे कारण नसताना अचानक काही सेकंदात होत्याचा नव्हता होतो आणि समस्त जीवित जातीच्या क्षणभंगुरतेवर शिक्कामोर्तब होते.आदल्या दिवशी नातेवाईकांच्या, मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात मनसोक्त गप्पा मारणारा तरुण एकदम एकाएकी 'Pulmonary Cardiac Arrest' चा बळी ठरतो यावर मन विश्वास ठेवायला तयार होत नाही. तेही ऐन दिवाळीच्या दिवसांत आणि पाडव्याच्या दिवशी. लग्नाला जेमतेम दोन वर्षे पुरी होतात न होतात तोच बायकोला पाडव्याच्या दिवशी एवढी भीषण ओवाळणी मिळावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास! सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेला आपला मुलगा, घरी-दारी आनंदाची उधळण करणारा आपला मुलगा, नियमित व्यायाम करणारा आपला मुलगा असा अचानक कसा गेला हे न पेलणारे आणि न सुटणारे कोडे घेऊनच आता वडील उर्वरित आयुष्य जगणार. तर नऊ मास पोटात वाढवून, संगोपन करून, सगळे लाड-कोड पुरवलेला  आपला मुलगा या जगातूनच निघून गेला या जाणीवेने माउली आजन्म अश्रू ढाळत राहणार. तिची व्यथा तर इतरांच्या जाणिवांच्या कक्षेत न बसणारी. ती अंतर्यामी उध्वस्त झालेली. ज्याला आपला मानला , नातिचरामी म्हणत ज्याच्या सोबतीने अग्नीभोवती सात फेरे घेतले, ज्याच्या साथीने आयुष्य सुंदर होण्याची स्वप्ने बघितली आणि ज्याचा हात प्रगाढ विश्वासाने हातात घेतला तो आपला हात सोडून न परतीच्या वाटेवर निघून गेला हा नुसता विचारही तिला भयानक ग्रासणारा. त्याच्या फक्त आठवणींवर आपले यापुढील आयुष्य कंठायचे ही तिच्या मनाला पदोपदी विदीर्ण करणारी जाणीव आणि आता सुख-दु:खाच्या वाटेवर यापुढे आपल्या सोबत तो नाही ही मनातील अंधार अधिक गहिरा करणारी जाणीव घेऊन तिने जगायचे नव्हे स्वत:ला जगवत ठेवायचे. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी चार दिवसांपुरते. काही दिवसांनी आपापल्या व्यापात व्यस्त होणारे.  
 कसलेही व्यसन नसलेला माणूस एकाएकी दगावतो आणि वर्षानुवर्षे व्यसनांच्या आधीन असलेली माणसे क्वालिटी नसलेले जीवन जगत राहतात. धुम्रपान केल्याने कर्करोग होतो अशी भीती असते पण म्हणून प्रत्येक धुम्रपान करणारा कर्करोगाला बळी पडत नाही किंबहुना अनेक वर्षे जगतोही! व्यसने न केल्याबद्दलच्या शिक्षा मात्र अनेक लोक भोगत राहतात. निर्व्यसनी, मिताहारी, नियमितपणे जगणारा कुणी कधीही होत्याचा नव्हता होऊ शकतो. निर्व्यसनी आयुष्य अधिक नियमित आयुष्य म्हणजे प्रदीर्घ आयुष्य असे आयुष्याचे समीकरण खात्रीपूर्वक मांडता येत नाही. अपघात होऊ नये म्हणून आपण गाडी कितीही सावधपणे आणि नियमांचे उल्लंघन न करता चालवली तरी समोरून येणारे वाहन तुम्हाला तेवढेच सुरक्षित आयुष्य बहाल करेलच याची हमी देता येणे सर्वथैव अशक्य आहे. शंभर फुट दरीत कोसळलेल्या बसमधील एखादे लहानगे मूल शरीरावर कुठेही साधा ओरखडाही न येता जिवंत राहते आणि घराच्या घरी पेपर वाचताना माणसाचा अंत होतो. कोणत्याही शास्त्रीय मिमांसेच्या पलीकडील या गोष्टी आहेत. गतकाळात माणसाला हृदयविकाराचा झटका आला होता का तसेच आता आला आहे का हे 'ECG' या साधना मार्फत समजू शकते परंतु  ECG काढून बाहेर येताच माणूस दगावतो ही घटना सगळ्या वैद्यकीय शास्त्राची पाळेमुळे हादरवते. 
हे सगळे पहिले, ऐकले की जीवनाच्या क्षणभंगुरतेची प्रचीती येते. आपल्या योजना आणि 'त्याच्या' योजना नेहमीच 'coincide' होतात असे नाही. मनात रचलेले बेत आणि 'त्याचे' बेत यांची गोड युती होतेच असे नाही. आपल्या ललाटरेखेचे सामर्थ्य तोकडे ठरते. आपली संकुचित जाणीव त्या सर्वेश्वराच्या व्याप्तीला ओळखू शकत नाही. भविष्यात आपल्यापुढे कोणते फासे तो 'सर्वात्मक' टाकणार आहे आणि त्यात आपली पट तरुन जाण्याची शाश्वती किती हे गणित अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच पैसा-अडका, दागिने, स्थावर-जंगम, मानमरातब, प्रतिष्ठा, खानदान या गोष्टी जरी मनुष्याला प्राप्य असल्या तरी ती जीवन समाप्त करणारी निर्णायक 'उल्का' कधी कशी आणि कोणावर कोसळेल याचा थांग लावणे ही समस्त मानवजातीच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे हे आस्तिक-नास्तिक, प्रगत-अप्रगत, गरीब-श्रीमंत, उच्चभ्रू-सामान्य अशा प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.     

No comments:

Post a Comment