Saturday 31 March 2012

मुलाखत - एका सुप्रसिद्ध चोराची ( आंतरराष्ट्रीय चोर संमेलनाच्या निमित्ताने)

या मुलाखतीच्या खास कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत.
नमस्कार.
आपले नाव?
ढापू चोरघडे.
केव्हापासून आपण हा व्यवसाय करताय?
अगदी लहानपणापासून. आमच्या रक्तातच आहे.
आपल्या घरीही......
माझे आजोबा,माझे वडील, माझे काका, माझा मोठा भाऊ, झालंच तर...
बाप रे! केवढा वारसा मिळालाय आपल्याला!
आमच्या घराच्या बायकाही काही कमी कर्तृत्ववान नाहीत. 
आपल्याला हाच व्यवसाय पत्करावा असे का वाटले?
शाळेत बाई विचारायच्या, तुम्हाला मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे? कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर, कोणाला पायलट तर कोणाला चार्टर्ड अकाउंटट व्हायचे असायचे. मी मात्र त्याचवेळी ठरवले की काहीतरी जगावेगळे करून दाखवायचे. दुनियेला चकित करून सोडायचे. व्यवसायात कसे थ्रील हवे. कामात सफाई हवी. ह्या कानाचे त्या कानाला कळता कामा नये. त्या दृष्टीने हाच  व्यवसाय योग्य वाटला.
भक्कम वारसा तर आपल्याला लाभलेला आहेच. पण या व्यवसायातील आपले प्रेरणास्थान कोण आहे?
बोका.
तो कसा काय?
मी लहान असताना रात्री आमच्या घरी तो गुपचूप येऊन पातेल्यातील दुध सायीसकट फस्त करायचा. कसला आवाज नाही. हुं की चू नाही. सकाळी उठल्यावर आई पातेले उघडते तो काय, पातेले रिक्कामे! तिने पातेले बदलून बघितले तरी तो बोका तिच्यापेक्षा सवाई निघाला. आम्हाला सकाळी ओट्यावर उमटलेली त्याची छोटी पावले फक्त दिसायची. त्याच्या चोरीचा रागसुद्धा यायचा नाही. या व्यवसायातील प्रेरणा मला त्याच्यापासून मिळाली.
आपण आत्तापर्यंत एकूण किती चोऱ्या केल्यात?
थांबा हं. डायरी बघून सांगतो. एकूण १९९९ चोऱ्या. अजून एक चोरी केली की मी माझ्या वडिलांचा रेकॉर्ड ब्रेक करेन.
तुम्ही आजवर एकदाही पकडले गेला नाहीत हे खरं आहे का?
शंभर टक्के. अहो मी पकडला गेलो असतो तर माझ्या घराण्याचा बदलौकिक झाला असता. माझ्या कुळाला बट्टा न  लागू देण्याचं वचन मी वडिलांना दिलं आहे आणि मी अभिमानाने आज सांगू शकतो की मी ते वचन प्राणपणाने पाळले आहे.
तुम्ही इतक्या यशस्वीपणे चोऱ्या कशा काय करू शकता?
अहो ताई, त्यासाठी रीतसर अभ्यास करावा लागतो. ते काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे.
नक्की कसला अभ्यास करता तुम्ही?
असं बघा, प्रथम चोरी नक्की कुठे करायची आहे त्या एरियाचा अभ्यास करावा लागतो. नंतर कोणत्या सोसायटीत, कोणाच्या घरी करावयाची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवावी लागते. म्हणजे बघा, गुरखे कधी झोपतात, कधी आपली जागा सोडून जातात, ज्यांच्याकडे चोरी करावयाची आहे त्यांच्या घरी कोण कोण असते, तिथे कोण मोलकरीण काम करते, घरात एकूण ऐवज किती असेल, घराला कोणत्या वेळेस कुलूप असते, आजूबाजूचा शेजार, त्या मजल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या वेळा. आता तुम्हीच विचार करा की किती जोखमीचे काम आम्ही करतो ते. 
बाप रे! मला तर नुसतं ऐकूनच घाम फुटला. यापेक्षा साधी नऊ ते पाच नोकरी करणं परवडलं. शिवाय या कामासाठी तुम्हाला साहित्यही भरपूर लागत असेल नं?
ऑफकोर्स. कुलूप तोडण्याचे हत्यार, डबल डोअर असल्यास आणखी एक-दोन प्रभावी हत्यारे वापरावी लागतात. आत शिरल्यानंतर मुख्य कपाटाच्या किल्ल्या, त्या नसतील तर कपाटाला खिंडार पाडण्यासाठी स्पेशल हत्यार, मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी खास पिशवी, रोकड वाहून नेण्यासाठी खास कप्पेवाली पिशवी आणि हे सर्व करताना सतत आपली नजर सावधपणे फिरवावी लागते.
तुम्हाला यासाठी काही खास काळजी घ्यावी लागते का?
अर्थातच. मी हातमोजे वापरतो जेणेकरून माझ्या हाताचे ठसे कुठेही उमटणार नाहीत. मला उगाचच घरात उसकाउसकी केलेली आवडत नाही. काम कसे शिस्तशीर पाहिजे. ह्याला हात लागला हे फुटलं, ते विस्कटलं हे मला बिलकुल खपत नाही. घरातील कोणत्याही इतर वस्तूला माझा हात लागणार नाही याची काळजी मी घेतो. नेमके जे आहे तेच आणि तेवढेच मी उचलतो. चोर येऊन गेला आहे ते सहजासहजी कळता कामा नये  हा माझा कटाक्ष असतो.
व्वा व्वा, फारच छान! तुम्ही अगदी तत्वाचे पक्के आहात.
माझं असं म्हणणं आहे की त्या घरातील दागिने आणि रोकड चोरून एवीतेवी आपण त्यांना मनस्ताप दिलाच आहे तर मग निदान त्यांच्या घरातील बाकीच्या वस्तू तरी सहीसलामत राहिल्या पाहिजेत. बाहेरून आल्यानंतर यजमानांना घर अस्ताव्यस्त दिसता कामा नये. पसारा करायचा नाही. अहो ते तरी एकदम किती व्याप निस्तरतील?    
बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही यजमानांच्या मानसिकतेचाही चांगलाच विचार करता. 
का नाही करायचा? अहो एवढं काही त्यांच्याकडून मिळणार असतं मग इतकं तरी दाक्षिण्य नको का दाखवायला? 
या चोरीचे वाटे तुम्ही कसे काय करता?
सरळ हिशेब असतो. या कामात ज्याने ज्याने म्हणून हातभार लावलेला असतो त्याचे ठराविक परसेंटेज असते. मदत करायचे इतके, प्रत्यक्ष चोरी करायचे इतके, असीस्टंट म्हणून काम करायचे इतके हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे नंतर पैशांवरून आमच्यात कोणताही लोच्या होत नाही.   
हा व्यवसाय बदलावासा कधी वाटतो का?
का वाटावा?
या व्यवसायामुळे आपली नितीमत्ता ढासळते किंवा चारचौघांत आपल्याला उजळ माथ्याने वावरता येत नाही असे वाटते का?
नाही बुवा. मंत्रीसुद्धा उजळ माथ्याने वावरतातच की! त्यांची करोडोंची बिंगे फुटली तरी त्यांना त्यांची नितीमत्ता  ढासळल्यासारखी कुठे वाटते?
अहो ते राजकारण करतात. चोरी थोडेच करतात?
कसं असतं ताई, जो सापडतो तो चोर आणि जो सापडला जात नाही तो साव. अहो जगाचा न्यायच आहे तसा.  
तुम्हाला राजकारणात कितपत रस आहे?
गाईला जेवढा कुरणात चरण्यापुरता रस असतो तेवढाच. 
आपल्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे. कसे वाटते आहे?
उत्तम. 
युवा पिढीला आपले काय सांगणे आहे?
व्यवसाय कोणताही निवडा पण त्यात स्वत:ला झोकून द्या. हा व्यवसाय निवडलात तर कुलूप-किल्ली या गोष्टींवर कमांड आली पाहिजे. त्या त्या विभागाचा, स्थानिक माणसांचा अभ्यास पक्का व्हायला पाहिजे. तुमची देहबोली आत्मविश्वासपूर्ण हवी. कामात सफाई हवी. नजर तीक्ष्ण हवी. समोरून येणाऱ्या पोलिसाच्या नजरेला नजर भिडवता यायला हवी. तुरुंगाशी सलगी नको. या विषयात एकदा का तुम्ही पी.एच.डी. केलीत की मग कोणीही तुमचा हात धरू शकणार नाही.
आपण आज इथे आलात, आपल्या व्यवसायासंबंधी भरभरून बोललात आणि तरुणांना मार्गदर्शन केलंत त्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद!   
आपण मला आज इथे सन्मानपूर्वक पाचारण करून चार शब्द बोलायची सुसंधी दिलीत याबद्दल मी आपल्या वाहिनीचा आभारी आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!
 
    
     

 
     


     

No comments:

Post a Comment