Tuesday 27 March 2012

देवदर्शनाचा बाजार

बहुचर्चित आणि ख्यात देवळांतील देवाचे दर्शन आज गरिबाला मर्सिडीज गाडीइतकेच स्वप्नवत झाले आहे. देवाची तुम्हाला दर्शन देण्याची लाख इच्छा असेल हो पण पुजाऱ्यांच्या अधिकृत परवानगीवाचून तुमची आणि त्याची दृष्टभेट होणे ही एक अशक्य कोटीतील गोष्ट आहे. 
माणसे दूरवरून जगाच्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून येऊन देवदर्शनासाठी अजस्त्र अशा रांगेत पूजेचे साहित्य घेऊन उभी असतात. डोक्यावर उन्हाची घमेली उपडी होत असतात. पदराने, रुमालाने घाम पुसत त्यांची ती देवदर्शनासाठी वाट पाहण्याची साधना चालू असते. हातातले पूजेचे ताट सावरण्याची कसरत पदोपदी करावी लागत असते. धक्काबुक्कीच्या प्रसंगांना उत आलेला असतो. प्रत्येकाला दर्शनाची घाई असते. कुणाला बोललेला नवस फेडायचा असतो. कुणाला आपले मूल देवाच्या किंवा देवीच्या पायांवर घालायचे असते.काही नवदाम्पत्ये आपल्या संसाराला आशीर्वाद घेण्यासाठी आलेली असतात. कुणी घराच्या आजारी माणसासाठी अंगारा न्यायला आलेला असतो. कुणी आपले हक्काचे घर व्हावे म्हणून साकडे घालायला आलेला असतो तर कुणी मला यंदाचे निवडणुकीचे तिकीट मिळू दे म्हणून प्रार्थना करायला आलेला असतो. प्रत्येकाच्या मनीचे हेतू वेगळे असतात परंतु त्यासाठी देवदर्शनाची वाट चोखाळणे  त्यांच्यासाठी अपरिहार्य असते.
आपण स्वस्थपणे रांगेत उभे असलो तरी आपल्याला विचलित करणाऱ्या देवाच्या आरत्यांचा भडीमार आपल्या कानांना सहन करावाच लागतो. या सगळ्या आरत्यांचा बेस बॉलीवूड स्टाइल गाण्यांचा असतो. त्यांना हिंदी सिनेमातील कोणतीही गाणी चालतात. त्यावर फक्त चपखल शब्द बसवण्याची कारागिरी करायची आणि मग चमत्कार पाहायचा. त्यामुळे प्रत्येक आरती  आपल्याला ओळखीची वाटते. 'धडकने लागी दिल के तारो की दुनिया' किंवा 'परदेसीया ये सच है पिया' किंवा 'ताकी ओ ताकी'किंवा 'तोफा तोफा लाया लाया' किंवा 'पहला पहला प्यार है' किंवा 'बाजीगर ओ बाजीगर' अशा सगळ्या गाण्यांवर आरत्या बांधल्या जाऊ शकतात. ह्या आरत्या ऐकून आपण आपले मनोरंजन करून घ्यायचे. काय माहीत त्या गाभाऱ्यातील परब्रम्हाचेही होत असेल! प्रत्यक्ष देवळात शिरून त्या विश्वरूपाचे दर्शन होण्याआधी आपली सगळी गात्रे शिणलेली असतात. आपण पूजेचे ताट पुजाऱ्याला देतो. पुजारी फुले, हार, वेण्या अक्षरश: फेकतात. नारळ दुसरीकडे जातो. देवावरचे एखादे फुल, अंगाऱ्याची पुडी आणि  फुटाणे घाईघाईत आपल्या हातात कोंबले जातात. दक्षिणा पेटीत पडते. ही सगळी प्रक्रिया केवळ काही मिनिटांत घडते त्यामुळे तिथून बाहेर पडल्यावर आपण देवाचा चेहरा आठवू लागतो. पुजाऱ्याने केलेली घाई आठवते. फेकलेला हार व नारळ आठवतो. पण ज्याचे दर्शन घेण्यासाठी आपण इतका वेळ तिष्ठत होतो त्या देव्हाऱ्यातील देवाला आपण डोळे भरून पाहिलेलेही नसते. बहुतांश गाजलेल्या देवळांमध्ये थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते. 
देवीच्या भरलेल्या ओट्या, वाहिलेले नारळ, वेण्या-फुले मागील दाराने परत विकण्यास येत राहतात. यानंतर देवाचा महिमा सांगणारी पुस्तके, दृक-श्राव्य सीडीज, माळा-अंगठ्या, मूर्ती-तसबिरी, अंगारा-प्रसाद घेतल्याशिवाय इतिकर्तव्यता होत नाही. लोकांच्या झोळ्यांत सामान आणि समाधान कोंबले जाते. आपल्या आत्तापर्यंत केलेल्या पापांचा निचरा झाला  असे देवदर्शन घेऊन आलेल्यांना वाटते. त्यात पवित्र नद्यांत, कुंडात डुबकी मारण्याचे पुण्यही बऱ्याच जणांच्या गाठीशी जमा झालेले असते. त्यामुळे नवीन दुष्कृत्ये ,अत्याचार, पापे करायचे लायसेन्स आपोआपच मिळून जाते. हा देवदर्शनाचा बाजार सार्वत्रिक आणि बारमाही चालू असतो. शिकलेले-बिनशिकलेले , सुसंस्कृत-असंस्कृत, उच्चस्तरीय-निम्नस्तरीय, देशी-विदेशी सगळ्या प्रकारची माणसे या दर्शनोत्सवात सामील झालेली आढळतात.   
काही वर्षांपूर्वी कृष्णाष्टमी निमित्त एका सार्वजनिक ठिकाणी एक देखावा आयोजित करण्यात आला होता. त्यात सुदर्शनधारी भगवान श्रीकृष्ण एका अतिशय सवंग गाण्यावर नाचातानाचे दृश्य होते. डोळे आणि कान पहावयाचे आणि ऐकवायचे नाकारत असल्याने काही भाविकांनी तेथून काढता पाय घेतला पण आयोजकांची मती मात्र या दृश्याला कसलीच हरकत घेत नव्हती. गणेशउत्सवातही कानांना खटकणारी गाणी असतात, बुद्धीला खटकणाऱ्या पडद्यामागील आर्थिक उलाढाली असतात, राजकीय चढाओढीखातर आयोजलेल्या स्पर्धा असतात, कोणाचा गणपती जास्त चांगला यावर आयोजकांची सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून असते. आपापल्या गणपतीची आरास जास्तीत जास्त दैदिप्यमान करण्यासाठी अनेक ठिकाणाहून जबरदस्तीने गोळा केलेल्या वर्गण्या असतात. गणपतीनंतर नवरात्र येते. सार्वजनिक उत्सवात दानपेट्या, फंडपेट्या ओसंडून वाहू लागतात. सोने-चांदी-रत्ने यांनी देवांना मढवले जाते. देवाला नैवेद्यास्तव अन्न-धान्य-दूध-तूप दान केले जाते. या देवस्थानाच्या आजूबाजूला गरीब, अन्नान्नदशा झालेली माणसे हा पैसेवाल्यांचा खेळ असहायपणे बघत असतात. त्यांच्या डोळ्यांत व्याकुळता असते, कारुण्य असते. पण त्यांचे हात मात्र अभावितपणे देवासमोर जोडले जातात. या आशेवर की एक ना एक दिवस आपलेही भाग्य उजाडेल. परमेश्वर आपल्याला प्रसन्न होईल. आपल्याला अन्न-वस्त्र-निवाऱ्याची भ्रांत पडणार नाही.  
जो तो या पुढे पुढे जाण्याच्या हव्यासापायी स्वत:ला, निजस्वरुपाला विसरत चालला आहे. पैसा कितीही कमवा पुरत नाही, गाडी-बंगला-नोकरचाकर यथास्थितपणे बाळगणारी माणसे देखील 'आता पुरे, मी एवढ्यात तृप्त आहे' हे वाक्य चुकूनही उच्चारत नाहीत. पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंनी देवाला सजवणे सोप्पे आहे पण हृदयातील भक्तिभावाने देवाला भिजवणे हे खूपच अवघड काम आहे. जे या भूमीतील संतांनी आम्हाला वारंवार अभंगांतून सांगितले ते आचरताना लोक दिसत नाहीत मात्र स्वार्थासाठी परमार्थ जवळ करणाऱ्यांचे जणू पेवच फुटले आहे. देवाची सोन्याने मढवलेली मूर्ती चोरीला जाण्याचे भय आहे पण हृदयात स्थापन केलेली भगवंताची मूर्ती चोरीला जाण्याची क्षितीच नाही.   

                                                  देव देव्हाऱ्यात नाही  देव नाही देवालयी 
                                                  देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई 
या ओळींचा गर्भितार्थ समजण्याची आज नितांत गरज आहे.


No comments:

Post a Comment