Sunday, 29 January 2012

जिणे एकटीचे ..........

अनेक वर्षे सुरक्षित कोशात राहिलेली, वावरलेली स्त्री अचानक एका आघातासरशी असुरक्षित होते. तिचं जग असलेला तिचा संसार उधळला जातो आणि तिचा एकाकीपणा गडद होतो. अनेक स्त्रियांच्या वाट्याला येणारे हे सत्य असले तरी प्रत्येक स्त्रीची या सत्याशी सामना करण्याची मानसिकता वेगवेगळी असू शकते. या एकाकीपणाची तीव्रता वयाच्या हिशोबातही भिन्न असू शकते.
माझ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी या आघाताला मी सामोरी गेले. माझ्यावर दोन मुलींची जबाबदारी होती. आघाताची जखम ओली असतानाच अनेक अनुभवांना मी सामोरी गेले. आपल्याकडे कर्तेधर्ते हे फक्त पुरुषच असतात असा एक निव्वळ गैरसमज आहे. पुरुषाइतकीच कर्तृत्व गाजवण्याची क्षमता स्त्रीमध्येही असते हेच कबूल करायला अनेक जिभा कचरतात. पेपरातून वाचलेल्या अशा एखाद्या बातमीचा उदोउदो होतो, त्या कणखर, कर्तबगार स्त्रीची प्रशंसा होते पण आपल्या घरात किंवा आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रीच्या धैर्याची,कणखरतेची किंवा कर्तबगारीची प्रशंसा करणारे अभावानेच सापडतात.
सांत्वनाच्या निमित्ताने घरी येऊन घर पाहणे, घरातल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेणे, अशी स्त्री तरुण असल्यास तिच्या स्वभावाचा, मानसिकतेचा अंदाज घेणे, तिच्या मुलींबद्दल अतीव जिव्हाळा असल्याचे दाखवणे ही नैमित्तिक कर्मे अनेकजण करतात. विशेषकरून अशा स्त्रीला नोकरीचा आधार नसेल, तिचे शिक्षण फारसे नसेल तर बाहेरील आधारस्तंभ अधिक सोकावतात. त्या स्त्रीला खरोखरच कोणाचा आधार हवा आहे का याचा विचार या 'सुज्ञ' लोकांकडून फारसा केला जात नाही. आपणच जणू काही या कुटुंबाचे पोशिंदे आहोत अशा अविर्भावात हे वावरू लागतात.  
माझ्यावर असा प्रसंग जेव्हा गुदरला तेव्हा अनेकजणांना असा प्रश्न पडला होता की माझे पुढे कसे होणार. तशी मला बऱ्याच जणांकडून विचारणाही झाली. माझे काय होणार म्हणजेच माझी पुढची पोटापाण्याची व्यवस्था काय हा प्रश्न जरी माझ्यासमोर होता तरी ह्या प्रश्नाचे उत्तरही मलाच शोधायचे होते. वास्तविक पाहता ह्या लोकांचे माझ्या दैनंदिन आयुष्याशी, माझ्या आर्थिक परिस्थितीशी काहीच देणे घेणे नव्हते तरी असे प्रश्न मला अशा परिस्थितीत विचारण्यात त्यांना धन्यता वाटत होती. माझे कुटुंब म्हणजे माझ्या दोन मुली वयाने लहान असल्यामुळे माझ्यावर अवलंबून होत्या. त्यांना कसलीही उणीव न भासू देणे, त्यांच्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करणे यासाठी मला प्रयत्नशील होणे प्राप्त होते. मार्ग मला शोधायचा होता आणि त्या शोधलेल्या मार्गावरील काट्याकुट्यांना शह देत मार्गक्रमणाही मलाच करायची होती. त्यामुळे इतरांच्या कासावीस होण्याला तसा फारसा अर्थ नव्हता. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी नाकारून माझ्या कुटुंबाची धुरा वाहण्याची मानसिकता त्यांची नक्कीच नव्हती आणि त्यांच्याकडून कसलीही मदत स्वीकारण्यात मला स्वारस्य नव्हते. 
समाजामध्ये अशा गोष्टी अनुभवताना मला असे दिसून आले की ह्या दु:खद घटनेमुळे तिच्याकडे आणि तिच्या मुलांकडे पाहण्याची समाजाची नजर बदलते. ह्या एकाकी स्त्रीला कुणी वाली नाही असा एक आसुरी आनंद देणारा गैरसमज काही लोकांच्या मनात फोफावतो. हीचे आणि हिच्या मुलांचे आता काहीच चांगले होऊ शकणार नाही अशी जाणीव अनेकांच्या मनात मूळ धरू लागते. त्यामुळे  अशा परिस्थितीतून स्व-प्रयत्नांनी स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला वर आणणारी स्त्री इतरांच्या असूयेचा विषय ठरते. 
हळदी-कुंकवाची आमंत्रणे, सौभाग्यालंकार, ओट्या भरणे, नावापुढे सौ. लावणे इत्यादी गोष्टींना ती वंचित होते. आजकाल अगदी चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे अशा स्त्रियांनी जरी पांढऱ्या साड्या नाही नेसल्या तरी त्यांचा विशिष्ट पेहराव अनेकांच्या भुवया उंचावतो. ती एखाद्या समारंभाला गेल्यावर ठराविक नजरानजर होते. तिच्या  दिसण्यावर, वागण्यावर तिच्या पाठीमागे टीका-टिप्पणी होत राहते. तिला लग्नाचे आमंत्रण येते. जावे की न जावे या दुग्ध्यात ती असते. नाही गेलो तर वाईट दिसेल म्हणून ती जाते.तिथे अनेक सुवासिनींचे घोळके नटून-थटून बसलेले असतात. त्यांच्या केवळ नजरांनीच तिला बहिष्कृत झाल्यासारखे वाटायला लागते. तिच्या परिचयाची माणसे अशा प्रसंगी तिला टाळू पाहतात. लग्न लागल्यानंतर हळदी-कुंकू देणाऱ्या सुवासिनींचे हात तिच्यापाशी आल्यावर थबकतात. इतरांचीही नजर तिच्यावर असतेच! तिची  घुसमट, तिची  घालमेल फक्त तिलाच ठाऊक असते. अशा समारंभांना उपस्थित राहिल्याबद्दल ती निव्वळ पश्चात्ताप व्यक्त करत राहते. 
आज संपूर्ण जग जरी प्रगत होत चालले आहे तरीही समाजमन मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांच्या जोखडातून आणि बुरसटलेल्या विचारांतून बाहेर येऊ शकलेले नाही. घरी-दरी अशा स्त्रीचे खच्चीकरण होत असते. तिची मुलेही स्वत:ला कसोशीने या आघातातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना 'नॉर्मल' आयुष्य जगायचे असते. मित्र-मैत्रीणीत मिसळायचे असते. जगण्याचा आनंद लुटायचा असतो. पण येणारी-जाणारी माणसे त्यांना भेटल्यानंतर उसासे सोडत, गहिवर काढत मुलांच्या मनातली पोरकेपणाची जाणीव ठळक करत राहतात. विसरू पाहणारे दु:ख, कालौघात बोथट होऊ पाहणाऱ्या दु:खद जाणीवा समाज त्यांना सहजासहजी विसरू देत नाही.   
काही काही प्रथांची, रुढींची,विचारांची तर मला मजाच वाटते. बायको नसलेला पुरुष आपल्या मुलांची लग्ने पाटावर बायकोच्या नावाची सुपारी मांडून करू शकतो पण नवरा नसलेल्या स्त्रीला मात्र अशी मुभा नाकारली जाते. अशा एकट्या पुरुषांकडे समाज विचित्र दृष्टीने पाहत नाही जसा बायकांकडे पाहतो. अशा पुरुषांच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येत नाही. त्यांचे अर्धांग हरपल्याची कोणतीही चिन्हे त्यांच्या पेहरावातून, अलंकारांतून आविष्कृत होत नाहीत. त्यांच्याकडे दयनीय, दयार्द्र नजरेने पहिले जात नाही.पुरुष आणि स्त्री हे समाजव्यवस्थेतील स्वतंत्र घटक असूनही त्यांच्या बाबतीतील सामाजिक संकेतांमध्ये हा जो दुजाभाव आढळून येतो तो म्हणजे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे दारूण अपयशच आहे. 
आज समाजात वेगवेगळ्या वयोगटांतील अनेक स्त्रिया हे असे उपेक्षित जिणे जगतात. समाजमन, समाजातील जाती जितक्या मागासलेल्या तितकी एकटीच्या वाट्याला येणारी दु:खाची तीव्रता जास्त! काही स्त्रिया दुसरे लग्न करून सामाजिक पत पुनश्च मिळवण्याचा आटापिटा करतात तर काही फक्त स्वत:चीच सोबत पसंत करतात. संगणकाच्या माध्यमातून अवघे जग कवटाळू पाहणारी माणसेही संकुचित विचारांना, आचारांना कवटाळणे सोडत नाहीत. स्त्री विवाहित असो, अविवाहित असो, सौभाग्य हरपलेली असो शेवटी ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे पटवून घेण्याची निरोगी मानसिकता काही मोजक्याच लोकांमध्ये आढळते. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचे समाजातील स्थान नाकबूल करण्याचा हक्क कोणालाही नाही. 
अनेक पिढ्या जन्मतात आणि काल:पटलावरून पुसल्या जातात. विचारांनी माणूस उत्क्रांत होत राहतो. यंत्रयुगात क्रांती होत राहते. नवे विचार, नव्या कल्पना भविष्यकालीन सामर्थ्याचे द्योतक असतात. शिशिरातील पानगळही जुने विचार,चालीरीती त्यजून नव्या गोष्टी अंगीकारण्याचे बाळकडू माणसाला देत असते. हे वैचारिक भान जेव्हा माणसा-माणसांत रुजेल तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने  प्रगतीपथावर असेल! आणि अशा समाजात सौभाग्यवती स्त्रियांच्या कुंकवाइतकेच महत्व आणि प्रतिष्ठा सौभाग्य हरपलेल्या स्त्रियांच्या कर्तबगारीला मिळेल! 

No comments:

Post a Comment