संगीत म्हणजे शुद्ध-कोमल-तीव्र अशा बारा स्वरांत खेळला जाणारा लडिवाळ खेळ. गवताच्या पात्यांवर पडणाऱ्या दवबिंदुंचा ताजेपणा संगीतात आहे. वाऱ्याच्या शीतल झुळूकीइतकेच संगीतही आल्हाददायी आहे. देवघरातील प्रसन्नता,पवित्य्र,मांगल्य संगीतात आहे. अमृताचा कैफही संगीतात आहे. परमात्म्याप्रत नेण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. अशा या संगीताचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत- एक शास्त्रीय संगीत आणि दुसरे सुगम संगीत.
शास्त्रीय संगीत ही स्वरप्रधान गायकी तर सुगम संगीत ही शब्दप्रधान गायकी असे समजले जाते. शास्त्रीय संगीतात ख्याल-गायन,द्रुपद-धमार-दादरा, टप्पा-ठुमरी, नाट्यसंगीत हे गानप्रकार मोडतात तर सुगम संगीतात भावगीत, भक्तीगीत, गझल,लावणी,कव्वाली असे गानप्रकार मोडतात.
आलाप, विलंबित ख्याल,छोटा ख्याल, तराणा, ताना-बोलताना यांच्या माध्यमातून राग प्रकट करणे ही शास्त्रीय संगीताची खासियत तर शब्द आणि भावना यांचे सुरावटीच्या माध्यमातून प्रकटीकरण करणे ही सुगम संगीताची खासियत!
आलाप, विलंबित ख्याल,छोटा ख्याल, तराणा, ताना-बोलताना यांच्या माध्यमातून राग प्रकट करणे ही शास्त्रीय संगीताची खासियत तर शब्द आणि भावना यांचे सुरावटीच्या माध्यमातून प्रकटीकरण करणे ही सुगम संगीताची खासियत!
शास्त्रीय संगीतातील ख्यालाची बांधणी ही त्यांतील घराण्यांवर अवलंबून असते तर सुगम संगीत हे संगीत दिग्दर्शकाने योजलेल्या वाटेवर चालते. ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीतात जयपूर-अन्त्रोली, मेवाती, रामपूर-सास्वान, ग्वाल्हेर, आग्रा, किराणा ही घराणी आहेत त्याचप्रमाणे सुगम संगीतातही वसंत प्रभू, हृदयनाथ मंगेशकर,सुधीर फडके, नौशाद,एस.डी.बर्मन, सलीलदा , मदनमोहन,सी.रामचंद्र, ओ.पी. नैय्यर अशांसारखी कैक घराणी आहेत. ज्याप्रमाणे प्रत्येक घराण्याची राग मांडण्याची शैली निराळी त्याचप्रमाणे प्रत्येक संगीत दिग्दर्शकाची गाणे स्वरबद्ध करण्याची पद्धत निराळी असते.
तुम्ही दोन तास गा अथवा तीन मिनिटे गा , तुमच्या गाण्याने रसिकांची मने काबीज करणे महत्वाचे आहे. जास्त वेळ गाणे म्हणजे चांगले गाणे नव्हे. तुमच्या विचारांतील वैविध्य त्या त्या विशिष्ट रागामार्फत तुम्हाला अचूकपणे मांडता यायला हवे. नियमांच्या चौकटीत राहून तुम्हाला लालित्यपूर्ण रीतीने स्वरांच्या रेशमी लड्या उलगडता यायला हव्यात. अतिशयोक्ती नाही परंतु बरेच वेळा जो परिणाम तास-तास गाऊनही साध्य होत नाही तो परिणाम केवळ काही मिनिटांचे गाणे साध्य करून जाते.
खूप वेळा मी स्वत: असे अनुभवले आहे की रागदारी गाणारे सुगम गाणारयाला तुलनेने कमी समजतात. सांज लोकसत्तेत जेव्हा मी संगीत परीक्षण करत होते तेव्हा अशी या संदर्भातली अनेक मते मी ऐकली. गाणारयाचा दर्जा, त्याची संगीतातील जाण, त्याची क्षमता ही तो कुठच्या प्रकारचे संगीत गातो आहे यावर अवलंबून नसते तर तो ते संगीत कशा पद्धतीने सादर करतो आहे यावर अवलंबून असते. काही माणसे केवळ खोट्या अहंकारापोटी आम्ही फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो असे म्हणतात. माणसांनी काय ऐकावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तरीही एखाद्या विशिष्ट गानप्रकाराला हीन लेखणे ही माणसातील दर्जेदार श्रोत्याची हमी नसते. ज्याप्रमाणे एखादा राग आवडतो किंवा नाही या कारणावरून त्या रागाचे महत्व उणावत नसते, त्याचप्रमाणे एखादे गाणे आपल्याला आवडते अथवा नाही यावरून ते गाणे कमी महत्वाचे ठरत नाही. ज्याप्रमाणे विशिष्ट राग किंवा गाणे आवडणे ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे त्याप्रमाणे संगीतातील विशिष्ट गानप्रकार आवडणे ही सुद्धा सापेक्ष गोष्ट आहे.
जसे ज्येष्ठ गायिका पं. किशोरीताई आमोणकर,पं.प्रभाताई अत्रे, पं.मालिनीताई राजूरकर, बालगंधर्व, कुमारगंधर्व, पं. जसराज, पं.अजय पोहनकर, पं.उल्हास कशाळकर यांसारख्या अनेकांनी प्रस्थापित केलेले, श्रोतृहृदयी रुजवलेले गाणे नि:संशय प्रशंसनीय आहे तसेच गानसम्राज्ञी लतादीदी,आशाताई भोसले.सुमनताई कल्याणपूर,बाबूजी,सुरेशजी वाडकर,रफीसाहेब,मन्नादा,किशोरकुमार यांनीही श्रोत्यांच्या हृदयात आपली गायकीने मिळवलेले चिरंतन स्थानही तितकेच महत्वाचे आहे.
कुठल्या संगीताशी आपली नाळ आपण पक्की करायची हा ज्याचा त्याचा स्वभावधर्म आहे पण संगीतातील इतर गानप्रकारांना कनिष्ठ लेखणे हा सुजाण श्रोत्याचा धर्म असता कामा नये. आज संगीताचे ऐश्वर्य ज्या कानांमुळे आपण उपभोगू शकतो त्या कानांच्या भिंती काही गानप्रकारांकरता आपण कसल्यातरी आकसापोटी मिटाव्यात हे उत्तम श्रोत्याचे लक्षण नव्हे. संगीतातून गाणारयाचे ऐकणारयाशी आणि ऐकणारयाचे गाणारयाशी नाते अधिकाधिक दृढ होत असते.
श्रेष्ठता-कनिष्ठता या दृष्टीकोनातून संगीताचे प्रकार न तपासता जर आनंदानुभूतीच्या दृष्टीकोनातून पहिले तर शास्त्रीय आणि सुगम अशा भेदाचे कारण उरणार नाही.
No comments:
Post a Comment