आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात अनेक अतर्क्य,अनाकलनीय अशा घटना केव्हा ना केव्हातरी घडत असतात. अशा घटनांच्या बाबतीत आपण किती सजग असतो अथवा आपल्या जाणीवा किती जागृत असतात हा भाग निराळा! परंतु या घटनांमागची योजना आपल्या विचारशक्तीला स्तिमित करून टाकणारी असते एवढं मात्र नक्की.
माझी आत्या तिच्या वयाच्या नवव्या वर्षी टायफाईडने आजारी पडली. त्या काळी आत्ताच्या सारखी या आजारावर प्रभावी औषधे नव्हती. माझे आजोबा पेशाने डॉक्टर परंतु त्यांना स्वत:ला फिट्सचा आजार असल्या कारणाने डॉक्टरकी करता आली नाही. त्यामुळे ते रेशनिंग इन्स्पेक्टर म्हणून काम करू लागले. आत्याची तब्येत जास्तच बिघडली. आजोबांनी त्यांच्या डॉक्टर मित्रालाच तपासायला बोलावलं. तिची नाडी अतिशय मंद चालली होती. सगळं शरीर पांढरफटक पडत चाललं होतं. आशेचा किरण अंधुक होत चालला होता. आणखी काही डॉक्टर मित्रही आले. सर्वानुमते तिची वाचण्याची चिन्हे जवळजवळ नव्हती. माझ्या आजोबांचे जिवलग मित्र डॉक्टर भाटवडेकर हे पुण्याहून मुंबईला यायला निघाले होते. माझी आजी आणि आजोबांच्या डॉक्टर मित्रांवर अत्यवस्थ असलेल्या आत्याला सोपवून आजोबा डॉक्टर भाटवडेकर यांना घ्यायला स्टेशनवर गेले.
पुण्याची गाडी आली पण आजोबांचे मित्र डॉक्टर भाटवडेकर काही आले नाहीत. आजोबा त्यांची वाट बघून थकले,हताश झाले,आपल्या मुलीचं काय झालं असेल या कल्पनेने अस्वस्थ झाले. स्टेशनवरून घरी परतत असताना त्यांना भूक लागली. अशा परिस्थितीतही आपल्याला भूक लागते आहे या गोष्टीचे त्यांना वैषम्य वाटले. पुड्यात बांधलेली कोरडी भेळ त्यांनी संपवली आणि तो कागद फेकणार इतक्यात त्या कागदावर लिहिलेल्या मजकुराकडे त्यांचे लक्ष गेले. टायफाईड या आजाराच्या शेवटच्या स्थितीत करावयाची उपाययोजना त्यात सांगितली होती. कापुराचे इंजेक्शन छातीत दिल्यास रुग्ण जगू शकतो अशा आशयाचा तो मजकूर होता. आजोबा तडक केमिस्टकडे गेले आणि ते इंजेक्शन मिळवून घरी परतले. आत्याला एव्हाना जमिनीवर काढून झोपविले होते. बाहेर पुढचे सामान आणण्याची तयारी चालली होती.
आजोबांनी त्यांच्या डॉक्टर मित्रांना या इंजेक्शन विषयी सांगितले. त्याचा काही उपयोग होणार नाही असे बहुतेक सर्वांनीच आजोबांना पटवून दिले. अखेर निर्वाणीचा उपाय आणि वेडी आशा म्हणून आजोबांनी त्यांच्या मित्रांना न जुमानता माझ्या आत्याच्या छातीत ते इंजेक्शन दिले. काही वेळ गेला. माझे आजोबा सोडून इतर सर्वांनीच आत्या वाचण्याची आशा कधीच सोडून दिली होती. पण काही वेळाने आजोबांच्या हाताला तिची नाडी जाणवली. त्यांना अत्यानंद झाला. पांढऱ्याफटक पडलेल्या शरीरावर गुलाबी झाक येऊ लागली. ती हळूहळू शुद्धीवर आली. आजूबाजूचे सगळेजण हा चमत्कार याची देही याची डोळा पाहत होते. पृथ्वीवरील तिचे प्रयोजन अजून संपले नव्हते.
यथावकाश माझी आत्या त्या आजारातून पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर जवळजवळ बासष्ट वर्षे जगली. नोकरी केली, प्रायोगिक नाटकांत कामे केली,देश-विदेशात भरपूर प्रवास केला, लेखिका म्हणून लौकिक मिळवला.
कालौघात इतिहासजमा झालेल्या घटनांकडे पाहताना आजही मला असे वाटते की डॉक्टर भाटवडेकरांना आणायला आजोबांचे स्टेशनवर जाणे, त्यांची वाट बघता बघता भुकेने व्याकूळ होणे, भेळेच्या कागदातली माहिती अगदी योग्य वेळेस त्यांच्या दृष्टीस पडणे,डॉक्टर मित्रांच्या सांगण्याला न जुमानता त्या इंजेक्शनचा प्रयोग आत्यावर करणे या सगळ्या गोष्टी जशा काही योजलेल्याच होत्या. त्या फक्त अंमलात आणल्या गेल्या आणि आत्या वाचली.
पुढे माझे आजोबा नर्मदा प्रदक्षिणेला गेले असता तिथे पूज्य टेंबेस्वामींचे शिष्य त्यांना भेटले. आजोबांनी त्यांच्या फिट्सच्या त्रासाबद्दल त्यांना सांगितले. उद्यापासून तू विडी ओढायला लाग तुझ्या फिट्स बंद होतील असा सल्ला त्यांच्याकडून आजोबांना मिळाला. तू ज्योतिषाचा रीतसर अभ्यास कर, तुला उदरनिर्वाहासाठी कुणावरही अवलंबून राहावे लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.
त्यांची आज्ञा,त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानून आजोबा पुढील आयुष्य उत्तम रीतीने जगले. सुपाराच्या खांडाचेही व्यसन नसणारे माझे आजोबा शेवटपर्यंत विडी ओढत होते. कारण फिट्स पूर्णतया थांबल्या होत्या. तसेच ज्योतिषाची बाराखडीही माहित नसलेल्या माझ्या आजोबांनी ज्योतिषशास्त्राचा रीतसर अभ्यास केला आणि अनेकांना मौलिक मार्गदर्शन केलं. नाटक-चित्रपट सृष्टीतील अनेकजण माझ्या आजोबांकडे ज्योतिषविषयक सल्ला घेण्यासाठी येत. बडोद्याचे संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडेही आजोबांनी राज-ज्योतिषी म्हणून काही काळ काम केलं.
आजोबांचे नर्मदा प्रदक्षिणेला जाणे ही सुद्धा एक योजनाच होती. डॉक्टर झालेल्या माझ्या आजोबांच्या पायाखाली नियतीने एक वेगळाच रस्ता सरकवला आणि त्यांच्या पुढील आयुष्यालाही वेगळाच अर्थ दिला.

No comments:
Post a Comment