तळागाळातील पोचे आलेल्या जुनाट ट्रंकेसारखी
गावाच्या खबदाडातील ती जीर्णशीर्ण शाळा .....
घनगर्द वृक्षराजीत विरघळून गेल्यासारखी
राजकीय वादळवाऱ्याचे उडालेले लोट
थेट शैक्षणिक मनसुब्यांवर
खुराडेवजा वर्गात भिंतीवर तग धरलेले
एक काळे फळकुट
पांढऱ्या खडूचे फिकट सारवण अंगभर पसरून
एक मोडलेल्या हाताची खुर्ची अन पाय भंगलेले टेबल
कुठल्यातरी मास्तराच्या प्रतीक्षेत........
धुळीच्या रंगाचे, मोडीत निघाल्यासारखे
चार-पाच बाक
पाटी-दप्तराच्या स्पर्शाला आसुसलेले.........
कुठल्यातरी कोनाड्यात
'विद्या विनयेन शोभते' ची सुविचारात न्हालेली फळी
शालेय कोलाहलाची पुटे गिळून,चोहोबाजूंनी चालून आलेली
आक्रमक विषण्णता
निष्क्रिय, सुस्तावलेल्या अजगरासारखा
लोंबकाळणारा घंटेचा टोल
शाळेबाहेरील मातीत
अस्पष्ट होत गेलेले पायांचे ठसे
केस विस्कटून पिंजारावेत तशा
शाळेच्या कौलांना झोंबणाऱ्या वृक्षांच्या बेशिस्त फांद्या
दाढीचे खुंट वाढावेत तशी
जागोजागी शेवाळलेली शाळेची रोगट वास्तू
आजूबाजूच्या हिरव्यागार, शोभिवंत निसर्गाशी
बेईमानी करणारी
आता कावळे-कुत्रे तेथील अनभिषिक्त सम्राट
शाळेच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून
फडफडत एक कागद माझ्या पायाशी
निळ्या, सुबक अक्षरांना छातीवर झेलणारा
'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा'
या गीतावर उपहासणारा ..................
No comments:
Post a Comment