हा नात्यांमधला गुंता सोडवण्यासाठी, आपल्याच व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आणण्यासाठी इतर नातेसंबंधांना धारेवर धरणे आणि आपल्या हातातील अमुल्य वेळ पुढील डावपेच आखण्यात खर्च करणे यात या माणसांनी काय साध्य केले? रात्री-अपरात्री घराच्या बेला वाजविणे,चिठ्ठ्या-चपाट्या लिहून दुसऱ्याला नामोहरम करणे,घरातील पैसे गायब करणे हे खेळ बालिश आणि अपरिपक्व वाटतात. हे सगळे पाहून असे वाटत होते की कोणीतरी विक्रम आणि नयनाचे वाईट करू पाहत आहे. त्यांच्या मुलीला पळवल्यानंतर तर या समजुतीवर शिक्कामोर्तब झाले. पण हाय! या सगळ्या कट-कारस्थानात नयनाही सहभागी होती. अशा तऱ्हेने आपण नवऱ्याकडून त्याचा कबुलीजबाब घेऊ शकू असे तिला वाटत होते. विक्रमला तर नयना बायको म्हणून हवी होती आणि अनन्याही गर्ल फ्रेंड म्हणून हवी होती. तो हे संबंध टिकवण्यासाठी सराईतपणे खोटे बोलत होता एवढेच नाही तर नयनाच्या मैत्रिणीचा विस्कटू पाहणारा संसार सांधण्यासाठी तो प्रयत्नशील होता. आपण आपल्यावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या बायकोची अशी रोज फसवणूक करत आहोत अशी साधी जाणीवही त्याच्या मनाला स्पर्शून जात नव्हती. पश्चात्ताप नावाचा शब्द त्याच्या शब्दकोशातून गहाळ झाला होता. देवीवर म्हणजेच त्याच्या मुलीवर त्याचे निरतिशय प्रेम होते आणि तिच्याबाबतीत अनन्याचे गैर वागणे तो खपवून घेत नव्हता. त्याला संसारिक आणि सामाजिक प्रतिष्ठाही प्रिय असल्याने आपले विवाहबाह्य संबंध तो खुबीने झाकू पाहत होता.
इकडे अभय त्याची शिपवरील चालू नोकरी तशीच सोडून अथवा तात्पुरती रजा घेऊन इथे आला. एकाच उद्दिष्टाने त्याला झपाटले होते. विक्रमला नेस्तनाबूत करणे. बायको अनन्यालाही तो वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होता, घाबरवत होता, तिचे मनोबल खच्ची करू पाहत होता. हा सगळा द्राविडी प्राणायाम बघितल्यानंतर असे वाटते की खरंच इतका मोकळा वेळ या माणसांकडे होता? वास्तवात असतो का? केवळ सत्य वदवून घेण्यासाठी हा इतका निष्कारण खटाटोप? आणि चोरी उघडकीला आल्यानंतर मात्र नयना आपला संसार विस्कटू नये म्हणून किंवा देवीच्या नजरेत तिचा 'dadaa' उतरू नये म्हणून किंवा आई-वडिलांनाही विक्रमचे खरे स्वरूप कळू नये म्हणून त्याला चक्क उदार मनाने क्षमा करते. अरे मग जर क्षमाच करायची होती तर तो इतका सैरभैर होईपर्यंत,मानसिकदृष्ट्या कोलमडून जाईपर्यंत ताणायची काय गरज होती? अनन्याही अभयला खरे सांगू शकली नाही. आंधळ्या सासऱ्याला फसवत राहिली. तिच्या मैत्रिणीच्या उपदेशाचा तिच्यावर परिणाम झाला नाही. पण याचाही शेवट नवऱ्याने तिला माफ करण्यात झाला. नयनाने मात्र तिला माफ न केल्याची खंत तिच्या मनात कायम राहिली.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवरा-बायकोकडून जरी अशी चूक घडली तरी सत्य उघडकीला आणण्यासाठी कुणी आपल्या प्रापंचिक,व्यावसायिक जबाबदाऱ्या बाजूला ठेऊन त्यांना नामोहरम करण्याच्या इतक्या वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढेल असं खरंच वाटत नाही. एकतर एकमेकांशी बोलून हा तिढा सुटेल, एकमेकांवर जर प्रेम असेल तर संसार तुटणार नाही अन्यथा चालू संसाराची सांगता होऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटात होईल.
मुळात आपल्या बायकोवर इतके अतोनात प्रेम करणारा पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे कसा आकर्षित होईल आणि समजा झालाच तरीही अनेक दिवस,अनेक महिने,अनेक वर्षे आपल्या बायकोशी आपण प्रतारणा करतो आहोत याची जाणीव त्याला झाल्यावरही उपरती होणार नाही का? आणि उपरती नाही,पश्चात्ताप नाही,गैरवर्तनाबद्दल मनात जराही गिल्ट नाही तर मग अशा नवऱ्याला कोणतीही बायको माफ का करेल किंबहुना असं नवरा क्षमा करण्याच्या लायकीचा असेल का?
हल्लीच्या बऱ्याच मालिका नाट्यमयतेच्या नावाखाली वास्तवाशी विसंगत होत चालल्या आहेत.
(या मालिकेचे शीर्षकगीत आवडले तसेच सर्व कलाकारांची कामेही फारच छान होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.)
(या मालिकेचे शीर्षकगीत आवडले तसेच सर्व कलाकारांची कामेही फारच छान होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.)
No comments:
Post a Comment