Monday, 29 August 2011

पैसा झाला मोठा ..........


"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी " ही थोरामोठ्यांची शिकवण आत्मसात करण्याचे दिवस केव्हाच गेलेत. हल्ली पैसा बोलतो , माणसे ऐकतात, त्याच्यापुढे झुकतात. हल्ली माणसाची माणसाशी बांधिलकी नसून ती पैशाशी असते. लाख-करोड-अब्ज हे शब्द एखादं शेंबड पोरही सहजगत्या उच्चारत असतं. पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा या लहानपणी शिकलेल्या कवितेतील ओळी आता पुसट झाल्या आहेत. आता पैसा इतका मोठा झाला आहे की पावसालाही खोटं ठरवण्याची  त्याची ऐपत आहे. पूर्वी रात्री निजताना,सकाळी उठल्यावर परमेश्वराचे नाव तोंडी असायचे आता मात्र झोपताना,उठताना पैसा हेच नाव सर्वतोमुखी असते. पैसा-प्रसिद्धी-प्रतिष्ठा या भावंडांनी समाजमनावर अतिक्रमण केलं आहे. 
मी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास  करताना असं वाचलं होतं की पूर्वीच्या काळी वस्तूच्या बदल्यात वस्तू असा व्यवहार होत असे. याला "बार्टर सिस्टीम" असे म्हणत. म्हणजे तांदूळ दे, डाळ घे  किंवा तूप दे,तेल घे याप्रमाणे. कालौघात ही पद्धत नष्ट झाली आणि पैसा नामक पाहुण्याची  सद्दी सुरु झाली. बघता बघता तो सर्वांच्याच गळ्यातला ताईत होऊन बसला. पैशामुळे आर्थिक देवाणघेवाण सुलभ झाली ,राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर आयात-निर्यात होऊ लागली आणि अप्रगत देशांना प्रगतीचे साधन निर्माण झाले. प्रगतीपथावर असलेल्या देशांची श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ सुरु झाली. पैसा कमावण्याच्या हव्यासापायी समाजमन ढवळून निघालं. जास्तीत जास्त पैसा ही परमोच्च सुखाची गुरुकिल्ली, हा सर्वच दु:खांवरचा रामबाण उपाय असे माणसे समजू लागली. आता पैशाचं अवडंबर एवढं माजलं की पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग माणसाला उपलब्ध झाले. माणसे चोऱ्या करू लागली,खून पाडू लागली,दरोडे घालू लागली. काळा म्हणजे असनदशीर मार्गाने मिळालेला पैसा परकीय पतपेढ्यांत साठवू लागली. सामाजिक,राजकीय भ्रष्टाचारांना उत आला. पैशाअभावी माणसे आत्महत्या करू लागली. माणसाची नीती,चारित्र्य ,शील यांचा लिलाव झाला. एकमेकांची सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी पैशाला शरण जाण्यावाचून पर्याय उरला नाही. एकमेकांचा जीव घेण्यासाठी मानवी बॉम्ब तयार झाले. उत्तुंग बांधलेली वास्तुशिल्पे पैशाच्या बळावर बेचिराख करण्यात आली. जितका जास्त पैसा तितका जास्त संहार असे जणू समीकरणच झाले. महत्तम मुल्यांची,तत्वांची कास धरून आयुष्य व्यतीत करणारे डबघाईला आले,त्यांना अनुयायीच राहिले नाहीत. थोडक्यात पैसा हे साधन न राहता अंतिम साध्य ठरले. 
मिळालेला अथवा कमावलेला पैसा, स्थावर-जंगम इस्टेट ,सोनेनाणे,गाड्या-घोडे याने माणसाला सगळी भौतिक सुखे विकत घेता आली. झोपायला मखमली पलंग मिळाला पण झोप विकत घेता आली नाही, पंच पक्वान्ने खरेदी करायला मिळाली पण  भूक विकत घेता आली नाही, राहायला आलिशान वस्तू मिळाली परंतु आपल्या माणसांचे प्रेम विकत घेता आले नाही. देवासाठी फुले विकत घेता आली पण भक्तीभाव  विकत मिळाला नाही. संतांच्या शिकवणीतील त्यागभावना पैशांच्या भाऊगर्दीत हरवून गेली. ढोंगी महंतांच्या उपासनांचे मार्ग रत्नजडीत झाले. माणूस माणुसकीला पारखा झाला. मोक्षाची संधी गमावून बसला. 
"सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है, न हाथी है न घोडा है वहा पैदलही जाना है"  या ओळींचा मतितार्थ पैशापायी आंधळ्या झालेल्या माणसाला केव्हा कळणार?

Sunday, 28 August 2011

पाश्चात्यांचे अंधानुकरण


मूल जन्माला येतं आणि अनुकरणाची प्रक्रिया सुरु होते. मोठी माणसे बसतात कशी,हसतात कशी,बोलतात कशी,त्यांचे हातवारे कसे होतात या सगळ्या गोष्टींचे अप्रूप त्या लहानग्यांना वाटते. आपल्या भोवतालची माणसे निरखितच त्यांचा प्रवास सुरू असतो. मुलांची बाल्ल्यावस्था ,शैशवावस्था संपते आणि ती तारुण्यात पदार्पण करतात. हा काळ फारच नाजूक असतो, मुलांसाठी आणि त्यांच्या आई-वडिलांसाठी! चांगल-वाईट यातील फरक न समजून घेता आपल्या मनाला जे भावतं, ज्या गोष्टी केल्याने मित्र-मैत्रिणींत आपलं स्थान पक्कं होत ती गोष्ट मुलांना साहजिकच करावीशी वाटते. मग डिस्को-पब्ज,नाईट-आउट्स,लॉंग-ड्राइव्ह, रेन-डान्स इत्यादी करण्यात तरुणाईला धन्यता वाटू लागते. जास्तीत जास्त उत्तान कपडे,भडक रंगरंगोटी, उंची परफ्युम , सिगारेट,दारू,क्वचित प्रसंगी ड्रग्ज या गोष्टी त्यांच्या सो-कॉल्ड प्रतिष्ठेच्या परिघात चपखल बसतात.
अशा वेळी साधे कपडे घातलेली , नाकासमोर चालणारी, हाय-फाय इमले नसणारी, नियमित अभ्यास करणारी मुलं-मुली यांना "डाऊन-मार्केट" वाटायला लागतात. मोठमोठ्या पार्ट्या अटेंड करणं, सोशल वर्तुळ वाढवणं , वाढदिवसानिमित्त महागड्या गिफ्ट देणं, विदेशी फ्रेंड्सच्या संपर्कात असणं हेच वास्तव आहे असं वाटू लागतं. मन वरण-भातापेक्षा 'पिझ्झा -बर्गर' संस्कृतीत रमायला लागतं. एखाद्याचं संपूर्ण नाव उच्चारण्यापेक्षा नावातला संक्षिप्त -पणा आवडायला लागतो. भरघोस केसांचा बो बांधणे, हनुवटीवर ओरखड्याएवढी दाढी ठेवणे,कानात डूल घालणे यात तरुणांना भूषण वाटते. "फोर-व्हीलर' न बाळगता येणारे अ-प्रतिष्ठित वाटायला लागतात.
वेळी-अवेळी मद्यधुंद अवस्थेत घरी येणं, वडीलधाऱ्यांना एकेरी संबोधणे, विवाह वगैरेच्या फालतू आणि आउट-डेटेड कल्पनांमध्ये न अडकता 'लिव्ह-इन " रिलेशनशिप पत्करणं यांतच तरुणांना इतिकर्तव्यता वाटू लागते. निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाऊन हे आधुनिक तरुण दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची रिकामी पाकिटे, चीवडलेल्या  अन्नाचे खोके निसर्गालाच बहाल करतात. तिथे आलेल्या पोरीबाळींची अश्लील छेडछाड करतात. आज अनेक तरुण-तरुणी परदेशवाऱ्या करतात. तिथली सार्वजनिक स्वच्छता - टापटीप , तेथील लोकांचा शिस्तशिरपणा,वक्तशीरपणा, त्यांच्या आचार-विचारांतील सुसंस्कृतपणा ह्या बाबी हेतुपुरस्सर दुर्लक्षून नेमक्या नको त्याच गोष्टी स्वीकारतात आणि त्यांतील फायदे-तोटे समजून न घेताच त्यांचे अंधानुकरण करतात. तेथे नियमितपणे चर्चला जाणारे येशूच्या तसबिरीसमोर आदराने नत होतात, प्रार्थना म्हणतात, त्या वास्तूचे पावित्र्य शांतता आणि स्वच्छता राखून पाळतात. आपल्याकडे मात्र कपाळावर मोठ्ठे लाल टिळे लावून, मंदिराच्या भोज्ज्याला शिवत, मोठ्मोठ्ठ्या देणग्या देत, एका हाताने नमस्कार केल्यासारखा करून भाविकपणाचा 'मूड' आणला जातो. विदेशी लोकांना सोयीची वाटणारी मॉल संस्कृतीही आज आपण आपलीशी करून छोट्या वाणसामान विक्रेत्यांच्या पोटावर गदा आणली आहे.
कधीकधी वाटतं, आपल्या देशात येऊन ती माणसे  आपल्या नको त्या गोष्टींचं अनुकरण  का करत नाहीत?
रस्तोरस्ती पडलेले खड्डे,नाक्यानाक्यावर साचलेले कचऱ्यांचे ढीग, लहान-मोठ्या गाड्यांवर विकले जाणारे अस्वच्छ पदार्थ , रेल्वे-लाईनीच्या दुतर्फा बसलेल्या रांगा, रुळांवर ठिकठिकाणी साचलेले प्लास्टिकच्या पिशव्यांचे डोंगर , सार्वजनिक शौचालायची इतस्तत: पसरलेली दुर्गंधी, गटार- गंगेकाठी  वसलेल्या झोपड्या, पाण्याच्या ट्रकमधून पाझरत असलेल्या पाण्यामागे धावणारी कुपोषित-बेकार-दरिद्री मुले-माणसे, रस्त्यावर चालताना पचापच थुंकणारी माणसे, लोकलच्या डब्यातून येणारी कुजलेल्या भाज्यांची,मासळीची,विष्ठेची घाण, सरकारी नोकरशहाचा उद्दामपणा,लाचाखोरपणा , वैद्य ,वकील,सरकारी कारकुनांपुढे तासनतास तिष्ठत बसलेली जनता!
पाश्चात्य आपलं अनुकरण करत नाहीत करणं त्यांना त्यांचा देश प्रगतीपथावर न्यायचा आहे आणि आपण मात्र त्यांच्या फक्त त्याच गोष्टीचं अंधानुकरण करतो आहोत ज्या गोष्टींमुळे आपला देश सामाजिक अध:पतनाच्या खाईत लोटला जाण्याची भीती आहे!

Wednesday, 24 August 2011

विद्या विनयेन शोभते


"विद्या विनयेन शोभते" हा शाळेच्या वर्गांच्या भिंतीवर असणारा सुविचार आता इतिहासजमा झाला आहे.  विद्या हि अलंकारासारखी वापरल्यास तिची सजावट खुलून दिसते अन्यथा तिच्या सजावटीतून अहंकाराचा दर्प येऊ लागतो. आजकाल तर जितकी जास्त विद्या तितके जास्त उच्च अधिकाराचे पद, तितका जास्त पैसा, तितका जास्त अहं हे जणू समीकरणच झाले आहे. मी तेवढा श्रेष्ठ बाकी सारे कनिष्ठ या भूमिकेतून जो तो दुसऱ्याला पाहत असतो. 
'तू खूप खूप शिकून मोठ्ठा हो किंवा मोठ्ठी हो' हे आशीर्वादपर वाक्य आपण शाळेत असल्यापासूनच ऐकत आलेले असतो. पण तू जरी खूप शिकलास तरी तुझे पाय जमिनीवरच ठेव , तू संपादन केलेल्या विद्येचा गर्व करू नकोस. असं किती वडीलधारे सांगतात? किती शिक्षक सांगतात? त्यामुळेच असं शिकत शिकत माणूस मोठा होतो आणि एकदा का तो मोठा झाला की मग त्याच्या मनात साठलेल्या अहंकाराचा फुगाही वरवर जात राहतो. 
शालेय अभ्यासक्रमात संस्कार नावाचा जो काही प्रकार शिकवला जातो त्या अंतर्गत श्लोक,साने गुरुजींच्या,देशभक्तांच्या काही गोष्टी,झाशीच्या राणीच्या,शिवरायांच्या काही वीररसप्रधान कथा किंवा बिरबलाच्या चातुर्यकथा यांचा फार फार तर समावेश असतो. काही गाणी,नाटुकली यांमधून सामाजिक प्रबोधनाचे थोडेबहुत बाळकडू पाजले जाते. परंतु इतिहासापासून प्रेरणा आणि बोध घेऊन त्यातील चांगल्या गोष्टी जर वर्तमानात अंमलात आणल्या तर आपला भविष्यकाळ सुकर होईल याचे ज्ञान चिमुकल्यांना कुणी देते का? इसापनीती आदी गोष्टींमधले तात्पर्य मुलांच्या मनावर किती प्रभावीपणे ठसविले जाते? 
शाळेतील सहामाही,वार्षिक परीक्षांमध्ये अव्वल येणारी मुलं इतर मुलांना कस्पटासमान समजू लागतात. उत्तम मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक साधारण मार्क मिळवणाऱ्या मुलांसोबत आपल्या पाल्ल्याला फिरकू देत नाहीत. शिक्षकही अशा काही निवडक विद्यार्थ्यांना जास्त 'फेव्हर' करतात. परिणामी शिक्षक,विद्यार्थी आणि पालक या तीनही स्तरांवर गटबाजी सुरु होते. अहंकाराची सुप्त बीजे मनात रुजू लागतात. वास्तविक पाहता इतर  विद्यार्थी खेळ,एखादी कला यात जास्त सरस असतात पण फक्त शालेय अभ्यासक्रमाची झापड लावलेले काही शिक्षक,विद्यार्थी आणि पालक हे त्यांचं कसब अतिशय गौण ठरवतात. 
मुले शाळा,कॉलेज हे शैक्षणिक टप्पे यशस्वीरीत्या पार करत आपल्या कर्तृत्वावर उत्तम नोकरी मिळवतात,काही विदेशी जाऊन स्थायिक होतात . यांच्या अहंकाराचा फुगा दिवसेंदिवस फुगत राहतो. वास्तविक पाहता यांना मिळालेल्या गलेलठ्ठ पगाराचा फायदा यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कुणालाही  होणार नसतो. मग सुमार शिक्षण घेऊन नोकरीसाठी उरस्फोड करणारी माणसे यांच्या टीकेचे लक्ष्य ठरतात. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्यांना हे मौलिक उपदेशांचे डोस पाजू पाहतात. एखाद्याचं आयुष्य आपल्याला असलेल्या ज्ञानातून सुकर करावं हा त्यामागील हेतू नसून त्यांना आपल्यातील शैक्षणिक कमतरतेची जाणीव करून द्यावी असा त्यामागील विचार असतो. 
उंच,विशाल वाढलेले वृक्ष हे एखाद्या तपस्व्यासारखे असतात. त्यांची मुळे जमिनीत घट्ट असतात. त्यांना लगडलेली मधुर,रसाळ फळे हि त्यांच्या परिपक्वतेची प्रचीती देणारी असतात. आपल्या लांबच लांब पसलेल्या फांद्यांमधून ते येणाऱ्या-जाणाऱ्यांवर शितलतेची सावली धरत असतात. पांथस्थ त्यांच्या छायेत येऊन सुखावतात, मधुर फळांचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. हे वृक्ष क्लांत मनाला श्रांत करतात. 
वृक्षांवर  निबंध लिहून बक्षिसे मिळवणारी "हुशार" मुलं शिकून खूप मोठ्ठी झाल्यावर या वृक्षराजांचा आदर्श डोळ्यांसमोर का ठेवत नाहीत? 

Tuesday, 23 August 2011

गणपतीबाप्पा जनउद्धाराणार्थ लवकर या ................


वाजतगाजत गणपती येतात. काही लाख रुपये खर्चून सजविलेल्या मखरात बसतात. वर्गण्यांची खैरात होते. सोने-चांदी अर्पून नवस फेडले जातात. गणेश भक्तांच्या रांगा लागतात. सेलेब्रिटीज येतात, नेतेमंडळी येतात . त्यांच्यामुळे काही सार्वजनिक गणपती जास्त प्रसिद्धी पावतात. बक्षिसांच्या आमिषाने गणेश मंडळांच्या अटीतटीच्या स्पर्धा सुरु होतात. देखावे,रोषणाई बघण्यासाठी माणसांचा महापूर लोटतो. या निमित्ताने नवनव्या ध्वनिफिती बाजारात येतात. त्यांची जाहिरात सुरु होते. मोदकांचे नवनवे प्रकार हलवायांकडे उपलब्ध होतात. त्याच्याही जाहिराती सुरु होतात. घरोघरी आणलेले गणपतीही स्पर्धेमेध्ये उतरतात. महाआरत्या होतात. महाप्रसाद वाटले जातात. शाळाशाळांमध्ये गणपती या विषयावर निबंध स्पर्धा घेतल्या जातात. या काळात सर्व प्रसारमाध्यमे गणपतीमय होतात. या निमित्ताने विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एकूण दहा दिवस जल्लोषाचे असतात. अनंतचतुर्दशीला गणपतींचे विसर्जन होते. सामुहिक नाच-गाणी-गुलालाची उधळण करत गणपतीबाप्पाला निरोप दिला जातो आणि मंडळीचे डोळे पुढील सार्वजनिक उत्सवाकडे  लागून राहतात.हे वर्षानुवर्षीचे चित्र आपण बदलू शकतो की नाही याचा विचार करण्याची वेळ खरोखरीच आली आहे. 
गणपतीबाप्पा हे सकलांचे आराध्यदैवत!  चौसष्ट विद्यांचा,कलांचा हा अधिष्ठाता! अनेक धर्मांच्या, जातींच्या, वर्णांच्या, वर्गांच्या लोकांना एकत्र आणणारा हा प्रथमेश! परस्परांतील शत्रुत्वाचा,वैमनस्याचा, मत्सरांचा , हेव्यादाव्यांचा विसर पडायला लावणारा हा वक्रतुंड! शांततेच्या, सहिष्णुतेच्या, भक्तिरसाच्या माध्यमातून दृग्गोचर होणारे त्याचे विश्वात्मक रूप! समस्त आबाल-वृद्धांना आकर्षून घेणारे त्याचे विलोभनीय स्वरूप!         
अशा या विश्वव्यापी गणरायाला इतक्या आधिभौतिक स्तरावर आणण्याचे प्रयोजनच काय? अडाणी माणसे,शिकली सवरलेली माणसे, राजकीय-सामाजिक कार्यात सक्रीय असणाऱ्या व्यक्ती, प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमांतून चमकणाऱ्या व्यक्ती ,व्यापारी,उद्योगपती  अशा सर्व थरांमधील माणसे ह्या भावनेच्या , श्रद्धेच्या मांडलेल्या बाजारीकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामील झालेली असतात. 
गणरायांना कुठे सोस असतो सोने-हिरे-चांदी यांनी मढविलेल्या रत्नजडीत आसनाचा?  गणरायांना कुठे हव्यास असतो लाखो-करोडोंनी वर्गण्या जमा करण्याचा? गणरायांना कुठे आकर्षण असते भक्तीभावनेशी कर्तव्य नसणाऱ्या नाच-गाण्यांचे? गणरायांना कुठे प्रलोभन असते लाखो रुपये खर्चून उभारलेल्या उंची देखाव्यांचे? गणरायांना कुठे आवडतात परस्परांतील हेवेदावे, स्पर्धेच्या निमित्ताने एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या? गणरायांना कुठे रुचतो ध्वनिक्षेपकावरून घातलेला धांगडधिंगा? गणरायांना कुठे भावतात लाजिरवाणी नृत्ये आणि कृत्ये? गणरायांना कुठे आवडतो लोकांच्या भावनेशी,श्रद्धेशी,भक्तीशी खेळला जाणारा हा खेळ?
आपल्या संस्कृतीत गणपती हे बुद्धीचे प्रतिक मानले आहे. हे आद्यदैवत आहे. त्याच्यापुढे या भूतलावरील सगळे मानव सारखेच! कोणी मोठा नाही व कोणी लहानही नाही. कोणी उच्च नाही व कोणी नीच नाही. कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही . 
 आपल्या देशापुढे  इतक्या वेगवेगळ्या आर्थिक समस्या उभ्या असताना , कित्येक  लोक उपाशी असताना, कित्येक लोक बेकार,बेघर असताना , कित्येक लोक देशाच्या रक्षणासाठी लढता लढता जीवन-मृत्युच्या सीमारेषेवर उभे असताना , भ्रष्टाचाराच्या वणव्यात कित्येकजण होरपळून निघत असताना , दीन-दु:खितांचे शोषण होत असताना या परमोच्च दैवताची करूणा भक्तीने भाकायाची की पैशांनी? महागाईचा भस्मासुर सामान्यांच्या जीवाचे पाणी पाणी करत असताना लाखो रुपयांची उधळपट्टी करून आपण या देवाला कसं प्रसन्न करून घेणार? स्वत: अ-नैतिक मार्गांनी कमावलेला पैसा या नीती-धर्माच्या पुरस्कर्त्याला  रुचणार? लोकांवर जोर-जबरदस्ती करून त्यांच्याकडून मोठ्मोठ्ठ्या देणग्या उकळून त्या पैशांनी गणरायांना सुशोभित केले तर हि गोष्ट गणरायांसाठी सन्मान्य असेल का? हा पैशांचा ओघ एखाद्या विधायक जनकार्यासाठी आपण वळवू शकलो तर गणरायांच्या आपण अधिक जवळ जाऊ शकू हा विचार या उत्सवाच्या संदर्भात जे सक्रीय असतात त्यांच्या मनात कसं येत नाही? जी बुद्धी आपणा सर्वांना ज्या गणरायाने बहाल केली तिचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग?  एक गोष्ट  प्रत्येकाने जरूर लक्षात ठेवावी की कोणताही देव हा फक्त भावाचा भुकेला असतो इतर कशाचाही नाही.

Monday, 22 August 2011

ज्योतिषशास्त्र


काही वर्षांपूर्वी एका लोकमान्य वर्तमानपत्रात "Nostradamus" नामक आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या भविष्यवेत्त्याचे भविष्यकथन सातत्त्याने येत होते. आजकाल तर टी.व्ही. च्या वाहिन्यांवर, वर्तमानपत्रात वेगवेगळे ज्योतिषी वाचकांवर,श्रोत्यांवर  भविष्याचा  नुसता पाऊस पडत असतात. दिवसाचे,आठवड्याचे,महिन्याचे अचूक (?) भविष्यकथन व समस्यांवरील मार्गदर्शन  कसलेले पंडित ,शास्त्रीबुवा करत असतात. हे भविष्य बहुधा राशीनुसार असते. ज्योतीषशास्त्राची  ऐशीतैशी म्हणवणारे तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत या माध्यमांवरून चालणाऱ्या कार्यक्रमांना आक्षेप न घेण्याइतके बदलले तरी कसे?
मुळातच ज्योतिषशास्त्र हे अतिशय व्यापक,तर्क -अधिष्ठित व अनुभवाधिष्ठित असे शास्त्र! कुंडली-कुंडली गणिक अनुभवाला येणारी ग्रहस्थिती निराळी आणि त्यावर निष्कर्शिलेले भविष्यही निराळे ! कुठलाही एक नियम सर्व पत्रिकांना सारखाच लागू होऊ शकत नाही. प्रत्येक कुंडलीनुसार त्यात अंतर्भूत असलेल्या भविष्याची व्याप्ती आणि त्याची येणारी प्रचीतीही निराळीच असते.
काही दिवसांपूर्वी या संदर्भात मला एक मजेशीर वाक्य वाचयला मिळालं. " ज्योतिषाने  कथन केलेलं ज्योतिष आणि एखाद्याच्या आयुष्यात तशीच नेमकी घडलेली घटना हा केवळ योगायोग असतो."  म्हणजे मधुबाला या नटीच्या आई-वडिलांना तिच्या वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिचे अचूक भविष्य सांगणारा फकीर, डॉ.नितू मांडक्यांच्या घरच्यांना त्यांच्या वयाच्या सहाव्व्या वर्षी हा मुलगा पुढे एक नामवंत शल्यविशारद होईल असे सांगणारा ज्योतिषी , सचिन तेंडुलकरच्या बाबांना हा मुलगा भविष्यात एक ख्यातनाम क्रिकेटपटू होईल असे सांगणारे शास्त्रीबुवा आणि ख्यातनाम स्रीरोग-तज्ञ बा.नि.पुरंदरे यांना आलेली भविष्याची प्रचीती या सर्व घटनांना योगायोगाच्या पंक्तीत नेऊन बसवायचे? 
ज्योतिषी हा माणसाचं भविष्य बदलू शकतो हाही असाच एक फोफावलेला गैरसमज! ज्योतिषी म्हणजे परमेश्वर नव्हे तर तुमच्या-आमच्यासारखाच दोन हात , दोन पाय , एक डोकं असलेला चालताबोलता प्राणी आहे हे लक्षात घेऊनच मग त्याची पायरी चढावी. ज्योतिषालाही प्रापंचिक जबाबदाऱ्या, कचेरीची कामे असू शकतात आणि बाकीच्या वेळी तो इतरांना ज्योतीषपर मार्गदर्शन करत असतो. 
मुळातच ज्योतिष हे नुसते एक शास्त्र नसून ती एक कला आहे. प्रत्येक ज्योतिषाचा कुंडलीकडे बघण्याचा, ती अभ्यासण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यांवरील तर्काधिष्ठित अनुमानेही वेगळी असतात. प्रत्येक ज्योतिषी निराळं भविष्य कसं सांगतो? मला कुणीतरी विचारलं. एकाच रोगाबद्दलची वेगवेगळ्या डॉक्टरांची मते वेगवेगळी असू शकतात की नाही? त्याचप्रमाणे एकाच व्यवसायामधील तज्ञा-मध्येही मतभिन्नता असू शकते. ज्याप्रमाणे काही काही रोग हे वैद्यकशास्त्राला आव्हान असतात त्याप्रमाणे काही काही कुंडल्याही नाणावलेल्या ज्योतिषाला बुचकळ्यात टाकू शकतात. पण एखादे निदान चुकले तरी एखादे शास्त्र त्याज्ज ठरू शकत नाही. 
मला मान्य आहे की बऱ्याच ज्योतिषांचा या शास्त्राकडे बघण्याचा  दृष्टीकोन पूर्णत: धंदेवाईक  असतो. वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याखेरीज त्यांना फार काही साधायाचेच नसते. ज्योतिषातील थोडफार ज्ञान आणि चारदोन उपाय अवगत असले की त्याच्या बळावर हे दुकान थाटतात आणि अशा दुकानांचा मोसम बारमाही असतो. कालानुरूप ज्योतिष बदलू शकतं, ते कथन करण्याची शैलीही बदलावयास हवी हा विचारही ज्योतिषी करत नाहीत. परिणामी तेच तेच गंज चढलेलं ज्ञान पुन्हा पुन्हा उगाळण्याचा प्रयत्न ज्योतिषी-महाशय करत राहतात. प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे व असते. त्या सीमित कक्षेत , परिघात ते शास्त्र मानवजातीला उपकारक ठरू शकते. तुमची व्यक्तिगत कुंडली, त्यातील ग्रहस्थिती , ग्रहांचे परस्परांशी होणारे बरे-वाईट योग, ज्योतिषाची कुंडली पाहण्याची पद्धत , त्याचा आत्तापर्यंतचा अनुभव, त्याचा या शास्त्राबाबाताचा अभ्यासू दृष्टीकोन या सर्व गोष्टींच्या सरमिसळीतून तुमचे भविष्य-कथन होत असते. एखाद्याला त्याच्या भविष्याविषयी चांगलं सांगण , अनुकूल सांगण  हे ज्योतिषाच्या स्वभावाला अनुसरून नसतं तर त्या त्या पत्रिकेच्या स्वभावाला अनुसरून असतं. पत्रिकेतील ग्रह, नक्षत्रे. राशी, योग हे एखाद्याचं चांगलं किंवा वाईट ठरवत असतात तेही त्याच्या पूर्व-कर्मानुसार! 
मी वाचलेलं , अभ्यासलेलं ज्योतिषशास्त्र हे एखाद्या महासागरातील थेंबाइतकच आहे. लोकांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलेल्या या शास्त्राबद्दलाच्या अपसमजांना दूर करण्याचा , त्यांच्या प्रश्नांचे थोडेबहुत निराकरण करण्याचा छोटासा प्रयत्न हा लेख लिहून मी केला आहे. यशापयशाची मला चिंता नाही. या आपल्या पूर्वजांनी रूढ केलेल्या अनमोल शास्त्राविषयीची अनास्था जर प्रस्तुत लेखाद्वारे मी थोडीशी दूर करू शकले तर माझे भविष्य उज्ज्वल आहे असे मी समजेन!

Saturday, 20 August 2011

असुरक्षिततेच्या विळख्यात


असुरक्षितता हे कलियुगातील एक भयाण वास्तवच म्हणायला हवं. सकाळी कामावर गेलेला माणूस संध्याकाळी घरी सुखरूप परतेल की नाही या विचारातील गांभीर्य दिवसेंदिवस अधिकाधिक गहिरं होत चाललंय. वेळेवर वाहन मिळण्याची हमी नाही, वेळेवर कार्यालयात पोहोचण्याची हमी नाही, आहे ती नोकरी टिकण्याची हमी नाही अशा अवस्थेत सर्वांच्याच आयुष्याच्या गाड्या अशाश्वत रुळांवरून धावत असतात. कोणता रूळ , कोणत्या क्षणी पायांखालून निसटेल आणि गाडी 'डिरेल' होईल याचा नेम नसतो.
आजकालच्या स्पर्धायुगात आपण कितीही शिकलो तरी अपेक्षेनुसार नोकरी मिळणे ही गोष्ट दुष्प्राप्य असते . ज्याप्रमाणे दुसऱ्याची बायको ही नेहमीच सुंदर वाटते त्याचप्रमाणे दुसऱ्याला मिळालेली नोकरीही जास्त सुखकर वाटते. आपली थोडी कमी पगाराची, जास्त सुख्सिविधा नसलेली नोकरी काही कमी महत्त्वाची नसते परंतु दुसऱ्याला मिळालेल्या नोकरीचे अवास्तव गुणगान करून आपण आपल्याला नकळत कुचकामी, दुय्यम गुणवत्तेचे ठरवून मोकळे होतो. आपण घेतलेलं क्वालिफिकेशन आणि आपल्याला मिळालेली नोकरी यात फार कमी वेळा उत्तम प्रकारची लिंक दिसून येते. आपण 'highly qualified' असल्याने हाताने काम करायची वाईट सवय आपण लावून घेतलेली नसते. आपला "shop-floor experience" झीऱो असतो .अशा वेळी आपल्या हाताखालचे लोक आपल्याला व्यवस्थित गंडवतात आणि आपल्या 'बॉस' पणावर खट्टू होण्याची पाळी आपल्यावर येते.
आजकाल लग्नाच्या बाजारात उभ्या असलेल्या मुलींचा भावही भलताच वधारलेला असतो. त्यांना प्रयेक बाबतीत 'सुपीरियर ' असाच वर हवा असतो. उच्चशिक्षित, प्रतिष्टित, गलेलठ्ठ पगार घेणारा, गाडी-बंगला-नोकरचाकर बाळगणारा शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणारा , राजकुमारासारखा दिसणारा, बायकोचे ऐकणारा वगैरे वगैरे. या मुलींच्या संभाव्य 'वरा' बद्दलच्या अपेक्षा वाचताना वा ऐकताना आपण दमेकरी आहोत असे वाटू लागते. तात्पर्य काय तर या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यास आपण समर्थ असलो तरच या विवाहाच्या रिंगणात उतरायला आपण योग्य असतो. आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना सोडून परदेशात जाणे आपल्याला शक्य नसते त्यामुळे आपली विवाहाची सुरक्षितताही धोक्यात येते.
घर,बायको,मुले,नोकरी सर्व काही शाबूत असूनही काही माणसे स्वत:ला अकारण असुरक्षित समजत असतात. प्रचंड नागरीवस्तीतील कुणा 'अबक' नामक इसमाचा मृत्यू होतो आणि यांची असुरक्षिततेची जखम ठसठसू लागते. आपल्याला बरं वाटत नाही असे उगीचच वाटू लागते. आपल्याला कोणाचा तरी आधार हवा आहे असे यांना वाटायला लागते. इतके दिवस बायको-मुलांवर गाजवलेला पुरुषी अहंकार एकदम लुप्त होतो आणि आता आपले काही बरे-वाईट झाले तर या विचाराने आपण हतबल होतो. आपल्याला एकाएकी चक्कर आल्यासारखी वाटते, मळमळल्या सारखे वाटते,हातापायाला मुंग्या आल्यासारखे वाटते, छातीत धडधडते आणि आपण यंत्रवत 'doctor' ची वारी करतो. या पेशंटची 'केस' खास नसल्याने doctor विशेष लक्ष पुरवीत नाहीत त्यामुळे आपल्याला त्या सद्गृहस्थांच्या ज्ञानाविषयी शंका येऊ लागते. गोळ्या घ्या,आराम करा हा  काहीश्या संदिग्धपणे दिलेला सल्ला आपल्याला पटत नाही व आपण तपासण्यांचा आग्रह धरतो . यथावकाश तपासण्या होतात, रिपोर्ट नॉर्मल येतात. एवढं सगळं आपल्याला होत असूनही रिपोर्ट्स नॉर्मल आलेच कसे या विचारांनी आपण सैरभैर होतो. पाण्यासारखा पैसा जातो पण असुरक्षिततेची भावना जात नाही.
आपण लोकलमधून प्रवास करत असतो. एवढ्या गच्च भरलेल्या गाडीत आपण शिरलो तरी कसे या आश्चर्याचा विचार करत एका हातात सामान व दुसऱ्या हाताने बार धरून कसेबसे उभे असतो. बाजूच्या डब्यातून आरडाओरडा ऐकू येतो. कुणीतरी बॉम्बसदृश वस्तू ठेवली आहे ही ऐकीव बातमी आपल्या हृदयाचे ठोके चुकवायला पुरेशी असते. जो तो दाराबाहेर उडी मारण्यासाठी जीवाचा आटापिटा करू लागतो. काही माणसे भरघाव लोकलमधून पडून मरण्यापेक्षा बॉम्बस्फोटाने मेलेलं बरं असा सुज्ञ विचार करून मागे सरकतात. यथावकाश गाडी स्टेशन येताच थांबते आणि लोकांचे लोंढे पुढचा -मागचा विचार न करता स्वत:ला झोकून देतात. या धावपळीत सामान विखुरले जाते,चष्मे फुटतात,चेंगरा चेंगरी होते . हे थरार -नाट्य काही वेळ चालते आणि बॉम्ब ठेवल्याची अफवा होती हे कळल्यानंतर आधी चिडाचीड,शिवीगाळ,धुसफूस व नंतर उपरोधिक विनोदाला वाचा फुटते. पण मनाला स्पर्शून गेलेल्या असुरक्षिततेच्या भावनेने आपण हादरून गेलेले असतो.
सुट्टीच्या दिवशी सकाळी जरा आनंदाने विसावून आपण टी.व्ही.समोर बसतो. गरमागरम वाफाळता चहा आणि  पोहे या भाग्याचा आस्वाद घेत! तोच कुठल्याशा वाहिनीवर बातमी आदळते. कोठेतरी जबरदस्त भूकंप झालेला असतो आणि संपूर्ण  कललेल्या बिल्डिंगा, ढासळलेल्या इमारतींचे अवशेष,इतस्तत: विखुरलेले मानवी अवयव ,रक्ता-मांसाचा खच, भग्न झालेली स्वप्ने , वाचलेल्यांचे भयानक आक्रंदन पाहून या भूतलावरील आपण सर्वात असुरक्षित प्राणी आहोत याची आपल्याला प्रचीती येते.            

Thursday, 18 August 2011

अभिमान


प्रत्येकाला कसला न कसला तरी अभिमान असतोच ! तसा मलाही आहे. मी भारतीय आहे.
मला येथील रस्त्यारस्त्यांवर वर्षानुवर्षे पडलेल्या खड्ड्यांचा मनापासून अभिमान वाटतो. त्या खड्ड्यांत साचलेल्या दुषित पाण्याचा अभिमान वाटतो. पावसाळ्यात याच खड्ड्यांत मुक्तपणे बागडणाऱ्या बेडकांचा व झुरळांचा अभिमान वाटतो. प्रत्येक रस्त्यावर, गल्लीबोळांत , कानाकोपऱ्यात अस्ताव्यस्त पसरलेल्या कचऱ्याचा व त्यात स्वैरपणे विहरणाऱ्या उंदीर-घुशींचा अभिमान वाटतो. रस्त्यांवर उघड्या असलेल्या गटारांचा मला विलक्षण अभिमान वाटतो. त्यावरची झाकणे चोरून ती विकणाऱ्या गटारचोरांचा तर मला हेवा करावासा वाटतो. मला विकलांग,वृद्ध,गरोदर,पिडीत,हतबल लोकांच्या आर्जवाला धुडकावून त्यांच्या नाकासमोर भरघाव रिक्षा नेणाऱ्या समस्त रिक्षावाल्यांचा अभिमान वाटतो. सरकारी कचेऱ्यांत कामानिमित्त गेलेल्या जनतेला रडकुंडीला येईपर्यंत ताटकळत ठेवणाऱ्या मुजोर व उद्धट कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला वेळेवर बसेस कधीच न आणणाऱ्या  बस कंडक्टरचाही अभिमान वाटतो. मला रस्त्यांवर जागोजागी पचापच थुंकणाऱ्या पादचाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला लोकलमध्ये भाजी निवडून कचरा तिथेच फेकणाऱ्या महिलांचा, एवढ्या तेवढ्या कारणांवरून परस्परांच्या आया-बहिणीचा उद्धार करणाऱ्या महिलावर्गाचा अभिमान वाटतो. मला लोकलमधून प्रवास करताना दोन्हीबाजूस अनुभवता येणाऱ्या विहंगम दृश्याचा अभिमान वाटतो. मला एकमेकांच्या वाढदिवसाची भिंतींवर डकवलेली भलीमोठ्ठी जाहिराताचित्रे व त्यात एकमेकांवर उधळलेली स्तुतिसुमने व त्यामुळे अशोभायमान झालेल्या भिंती व आजूबाजूचा परिसर याचा अभिमान वाटतो. मला नगरपालिकांच्या शाळांच्या गळक्या छ्प्परांतून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वर्षावाचा अभिमान वाटतो. मला मुलांना वर्गाच्या चार भिंतीत कोंडून त्यांच्याकडून परत परत तोच शालेय रटाळ परिपाठ करून घेणाऱ्या आणि त्यांचे बाल्य प्रयत्नपूर्वक नासावणाऱ्या शिक्षकांचा अभिमान वाटतो. मला मृत माणसाच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या वृत्तीचाही अभिमान वाटतो. नैसर्गिक आपत्तीत अथवा बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांच्या नातालागांपर्यंत मदत पोहोचण्याच्या आधीच ती खिशांत घालणाऱ्या महाभागांचा मला  अभिमान वाटतो. मला खून,माऱ्यामाऱ्या दरोडे,बलात्कार ही सत्कृत्ये राजरोसपणे करणाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला नाकावरची माशी न हलू देता , निरर्थक भाषणांतून फुटकळ आश्वासने देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा अभिमान वाटतो. मला सणासुदीच्या,उत्सवाच्या दिवशी सवंग गाणी वाजवून त्यावर बीभत्स हातवारे करून नाचणाऱ्या,आजूबाजूचा परिसर ध्वनीप्रदुषित करणाऱ्या तरुणांचाही अभिमान वाटतो. 
या अशा वेगवेगळ्या अभिमानांना खरोखरीच  अंत नाही !

Wednesday, 17 August 2011

अण्णा हजारे नावाची त्सुनामी


अनेक वर्षांपूर्वी एका गांधी टोपीने लाखो-करोडो लोकांना भुरळ घातली तश्याच एका गांधी टोपीच्या नेतृत्वाखाली आज लाखो-करोडोंनी आंदोलनाच्या मशाली पेटविल्या आहेत. अनेक धर्मांचे, पंथांचे, वयाचे, राज्यांचे नागरिक अण्णा नावाच्या एका झेंड्याखाली एकवटले आहेत. हा एवढा प्रचंड जनसमुदाय बघून वाटते की खरंच आज प्रत्येकाने मनात आणलं तर या भ्रष्टाचारी राजकारण्यांना मुळापासून हादरावण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. अण्णांनी स्वप्राणाने या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध रणशिंग फुंकले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळांत , घरांघरात ते दुमदुमले. 
आज सरकारानितीमुळे अण्णा तिहार जेलमध्ये आहेत . तिथून ते सुटतील आणि उपोषणाचा शड्डू ठोकतील. देशांतर्गत पाठिंबा तर वाढतोच आहे पण आता हे लोण विदेशापर्यंत पोहोचले आहे. आपलं तसंच आपल्या पुढच्या पिढ्यांचं भलं व्हावं या भावनेनं जो तो या भ्रष्टाचाराविरुद्धाच्या लढ्यात सामील होतो आहे. ही लढाई माझी आहे ,माझ्याबरोबरीच्या अनेकांची  आहे या गोष्टीची जाणीव आता प्रत्येकाला झाली आहे. अनेकजण आपापल्या मुलाबाळांना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. अनेक विचारवंत,चित्रपटसृष्टीतील नामवंत मंडळीही अण्णांच्या पाठीशी आहेत.
टी.व्ही.च्या अनेक वाहिन्यांवर राजकीय चर्चांना, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. जो तो बेंबीच्या देठापासून ओरडून माझ्या पक्षाची भूमिका कशी योग्य आहे हे इतरांना पटवून देण्यात नाहक गुंतला आहे. सर्वसामान्य माणूस आपण या राजकीय दुष्टचक्रात कसे भरडले जात आहोत, होरपळून निघत आहोत हे जाहीररीत्या कबूल करायला पुढे सरसावला आहे. भ्रष्टाचाराची कीड, महागाईचा रोग,अस्वच्छतेचा-प्रदूषणाचा एड्स ,गुंडगिरीच्या साथी या व अशा सर्व आजारांवर अण्णा हजारे नावाचा रामबाण उपाय आता  सर्वसामान्यांना सापडला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खुर्चीखाली अण्णा हजारे नावाचा टाईम बॉम्ब टिकटिक करतो आहे. इतर पक्ष वाहत्या गंगेत आपापले हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 
गेली अनेक वर्षे ज्या गोष्टींचा लाव्हा सामान्य माणसांच्या मनात खदखदतो आहे तो  अण्णा उर्फ किसन बाबुराव हजारे या रालेगनासिद्धीच्या विलक्षण रसायनामुळे रसरसून वाहू लागला आहे. अण्णांचा लोकपाल बिल संमत करून घेण्याचा हट्ट सत्ताधाऱ्यांच्या मुळावर येणार आहे. संसदेतील नियमांची ढाल कितीही पुढे केली तरी जनमताची धारदार तलवार तिला भेदून आरपार जाईल यात शंकाच नाही. सर्वसामान्यांचा वर्षानुवर्षे दबून राहिलेला  उद्वेग , राग एखाद्या प्रपाताप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर कोसळतो आहे. 
आता उपोषणे, पदयात्रा झडतील. सत्ताधारी पक्ष नामोहरम होईल. इतर पक्षांच्या नेत्यांनाही यांपासून बरंच काही शिकता येईल . सर्वसामान्य अण्णा नामक सुसज्ज शस्त्राच्या आधाराने भ्रष्ट सत्ताधाऱ्यांवर वार करतील आणि चारी मुंड्या चीत होण्याचा अनुभव या राजकारण्यांच्या पदरात पडेल अशी आशा बाळगायला हरकत नसावी .

पालकनीती


आजकाल आपापल्या पाल्याला वेगवेगळ्या क्लासेसला घालायची जणू स्पर्धाच लागलेली असते. आपापला मुलगा किंवा मुलगी अष्टपैलू कसा होईल किंवा कशी होईल याबाबत पालक कमालीचे दक्ष असतात. आपल्या पाल्याला एखादी गोष्ट न येणे त्यांना बहुधा कमीपणाचे वाटत असावे. अभ्यास, गाणे, चित्रकला, पोहणे, वाद्यवादन, नृत्य, संस्कार शिबिरे, अभिनय, मैदानी तसेच बैठे खेळ व असं इतरही बरंच काही आपल्या पाल्याला यायलाच पाहिजे हा बहुतांश पालकांचा अट्टाहास असतो. त्याच्या किंवा तिच्या उज्ज्वल भवितव्याच इंगित जणू या सर्व छंदांमध्ये दडलं आहे अशा भ्रामक समजुतीत ते वावरत असतात.  यांशिवाय शाळेतून आल्यानंतर त्या ट्युशन नावाच्या भयंकर आपत्तीला सामोरे जावे लागते ते वेगळेच! 
आपल्या पाल्याची बौद्धिक पात्रता , शारीरिक कुवत, त्याची मानसिकता लक्षात न घेताच केलेला हा केविलवाणा खटाटोप असतो. दिवसच्या दिवस एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखी मुले या दुष्टचक्रात फिरत राहतात. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची बिकट अवस्था होते. परत या सगळ्या छंदांमध्ये आपल्या पाल्याने अव्वल यावे अशा महत्त्वाकांक्षेने पालक पछाडलेले असतातच! त्यात नववी-दहावी नामक मुलांचे बाल्य गिळंकृत करणारा भस्मासुर असतोच! मग यातले काही क्लास तात्पुरते थांबवले जातात. टी.व्ही .वरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर चाललेला व मुलांना रुचणारा हैदोस थांबवला जातो. मित्रमैत्रिणी नामक व्रात्य प्राणी त्यांच्या त्यांच्या घरांतील पिंजऱ्यात बंदिस्त होतात. आवडत्या खाद्यप्रकारांवरही प्रकृती नीट राहावी या कारणास्तव गदा येते. घराघरात एक प्रचंड सुतकी वातावरण तयार होते. घरातील एक खोली ही दहाव्वीसाठी बळी  दिल्या जाणाऱ्या पाल्यासाठी राखून ठेवली जाते. नियमित वेळेस खाण्याच्या बश्या, जेवणाची ताटे आत सरकवली जातात. मोबाईल नामक डोकेदुखी कट-कारस्थान करून दूर ठेवली जाते. घरात मार्गदर्शनपर पुस्तकांचा, पेपरांचा जागोजागी  खच पडलेला असतो. काही पालकही पाल्याबरोबर परीक्षार्थी वाटायला लागतात. 
एकदाची परीक्षा संपते आणि नव्या जोमाने पाल्याला पुन्हा एकदा इतर छंदांच्या गराड्यात ढकलले जाते. निकाल लागतो आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छ्या पाल्ल्यावर कश्या लादता येतील याचा विचार करण्यात पालक मशगुल होतात. 
या सर्व सव्यापसाव्व्यातून किती हिरे निघतात आणि किती गारगोट्या  हे त्या परमेश्वरालाच ठाऊक!

Tuesday, 16 August 2011

विवाह संस्थेचे ढासळते बुरुज


"मी लग्न करून खरंच सुखी होईन का ?" माझ्या उच्चशिक्षित मैत्रिणीने मला विचारले. मी अंतर्मुख झाले. निर्णय तिचा तिलाच घ्यायचा होता. माझ्या उत्तराने तिच्या विवाहाबद्दलच्या दृष्टीकोनात तसूभरही फरक पडणार नव्हता . खरं म्हणजे या प्रश्नार्थक  वाक्यातच उत्तर दडले होते. 
लग्नाच्या बंधनात न अडकता एकत्र राहणे अशा स्थितीत  आज अनेक तरुण - तरुणी वावरत असतात. लग्न करणे हाच सुखी होण्याचा एकमेव मार्ग जरी नसला तरीही आपण निर्माण करणाऱ्या निष्पाप जीवांना समाजमान्यता मिळावी, आपल्याकडे बघण्याची इतरेजनांची दृष्टी आदरयुक्त असावी तसेच आपली कौटुंबिक जबाबदारीची जाणीव विस्तृत व्हावी यांसाठी विवाहाचा  आग्रह धरणे खचितच हितावह आहे असे माझे प्रांजळ मत आहे.
आज लग्नाच्या बाजारात उभी राहिलेली ती किंवा तो कुठल्यातरी पारंपारिक वा बौद्धिक चष्म्यातून एकमेकांना पारखून घेतात आणि कर्मधर्मसंयोगाने चतुर्भुज होतात. स्वत:चा  शैक्षणिक दर्जा, आर्थिक कुवत, समाजातील पत या मुळांना अहंकाराचे खतपाणी घातले जाते आणि  परस्परसामंजस्याची कवाडे कायमची बंद केली असल्याने उभयतांच्या व्यक्तिमत्वाची घुसमट होऊ लागते. 
अविवाहित राहणं , विवाहिताचे आयुष्य जगणं किंवा लग्न न करता एकत्र राहणं या तीनही गोष्टी आपापल्या ठिकाणी रुजलेल्या बऱ्या-वाईट उर्मींशी, आजपर्यंत आलेल्या अनुभवांशी , अंगिकारलेल्या धोरणांशी,तत्वांशी निगडीत असतात. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याची कालपरत्वे ज्याची त्याला प्रचीती येतेच. 
विवाह केला म्हणजे सगळ्या समस्या सुटतात असं मुळीच नाही. विवाह होतात आणि त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. कुटुंब वाढते. सुरवातीचे काही दिवस स्वप्नांचेच असतात. काही काळानंतर स्वप्नांचे धुके  विरते आणि वास्तवाचे ऊन पोळू लागते.नोकरी-घर ,सासर-माहेर हि कसरत किचकट वाटायला लागते. प्रत्येकाला  दुसऱ्याने आपल्याला समजून घ्यावे असे वाटू लागते. या वाटण्याचे रुपांतर वादात होते. दुसऱ्याकडून अपेक्षिलेल्या गोष्टींची यादी वाढतच जाते. वरवर चांगला दिसणारा संसार  आतून भुसभुशीत, पोकळ व्हायला लागतो. या आगीत तेल ओतायला अनेकजण आपापल्या शक्तीनिशी सज्ज असतातच. मी कशी बरोबर आणि दुसरे कसे चूक या वादाला अंत नसतोच. हळूहळू घराला कोर्टाचे स्वरूप  येते. साक्षीपुरावे होतात. अशा तऱ्हेने विवाहवेदीवर चढलेल्या या दाम्पत्याची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण न होता घटस्फोटाच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागते. 

अभ्यासाचे ओझे

शाळा आणि अभ्यास यांचे नाते जरी अतूट  असते असे मानले तरी केवळ पुस्तकी अभ्यास शिकवणे हा कोणत्याही शाळेचा एकमेव उद्देश नसावा.  नुसता अभ्यास करवून घेण्यापेक्षा  अभ्यासू दृष्टीकोन विकसित करणे महत्वाचे आहे असे मी मानते. 
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उत्कृष्ट निरीक्षणशक्ती असते. घरातील व घराबाहेरील घडामोडी मुल अचूक टिपत असते. एका विशिष्ट वातावरणाच्या संस्कारात प्रत्येक मुल आपापली आंतरिक शक्ती आजमावत असते. शाळा नावाच्या कोंडवाड्यात ही शक्ती ते मुल वापरू शकत नाही. केवळ लिखित अभ्यास, प्रश्नोत्तरे आणि घोकंपट्टी या अस्त्रांच्या सहाय्याने ही मुले आपापल्या आवडत्या वाटा चोखाळू शकत नाहीत. मनातल्या हाकांना प्रतिसाद देऊ शकत नाहीत. यामुळे अभ्यासातली गम्मत हरवून जाते आणि अभ्यासाचे ओझे वाटायला लागते. फुलपाखराच्या पंखांवरील रंग बघण्याची ओढ असलेले मन गणिताचे पाढे आणि इतिहासाच्या रुक्ष तपशिलांमध्ये रमू शकत नाही. पाऊस प्रत्यक्ष पाहण्याची संधी पावसावर कश्याबश्या लिहिता आलेल्या निबंधामुळे निसटून जाते. शिक्षक फळ्यांवर लिहितात आणि विद्यार्थी वहीत उतरवतात , परीक्षेत जमेल तसे पेपरावर खरडतात आणि थोडेबहुत मार्क मिळवतात.  या सर्व खटाटोपात साक्षर बनण्यापलीकडे मुले इतर काही बनू शकतात असे मला वाटत नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सृजनशीलतेची आणि सक्षमतेची ओळख त्यांना शाळा नावाच्या कारखान्यात खरोखर पटते का?  बाहेर निरभ्र , विस्तीर्ण  आकाश त्यांना साद घालत असताना शाळेच्या चार  भिंतीमध्ये आपले आकाश कसे शोधायला मिळणार?  तासंतास निरिच्छपणे अभ्यास आणि आनंदाचा होतो ऱ्हास! आपण विद्यार्थी तयार करतो की परीक्षार्थी हे ही शाळेच्या अधिकाऱ्यांनी जरूर तपासून पाहावे. मुलांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या वर्तमानाला वेठीस धरू नये. त्यांना त्यांच्या परीने मुक्तपणे फुलू द्यावे.