Thursday 22 August 2013

वारसा ………. अंधश्रद्धेविरुध्द लढण्याचा !


आज आपण एकविसाव्या शतकात आहोत ही वस्तुस्थिती असली तरीही आपल्यापैकी कित्येकांची मने किंवा त्यांचे विचार प्रतिगामित्वाकडेच झुकणारे आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. अंधश्रद्धेचा विळखा निव्वळ ग्रामीण भागापुरताच सीमित नसून अनेक शिक्षित, शहरी माणसेही या अघोरी प्रथांना कवटाळताना आजही आपल्याला दिसतात. 
अफाट पैसा हवा आहे बाबाकडे जा, अपत्यप्राप्ती होत नाही मंत्रतंत्र कर, दुष्ट शक्तींपासून संरक्षण हवे आहे मंतरलेला धागा किंवा ताईत बांध असे अनेक उपाय आपल्या अवतीभवती पसरलेले बांधव राजरोस करत असतात.  घरात कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत पण अशा वेळेस भोंदू बाबांचा, त्यांच्या तांत्रिक शक्तींचा आधार घेतला जातो. कर्वे-फुले यांसारखे थोर पुरुष नुसते पुरुषांनीच नाही तर या देशातील स्त्रीनेही शिक्षित व्हावे म्हणून झटले, सावित्रीबाई फुलेही त्यांच्या यजमानांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. त्यांनी समाजाचा, सनातन्यांचा अपरिमित रोष सहन केला पण  बहुजनांना शिक्षित करण्याचा आपला लढा आमरण चालू ठेवला. आज त्यांचा वारसा सांगणारे आपण शिक्षित झालेले आपले मन बासनात गुंडाळून किती सहजतेने या बुवा-बाबांच्या चरणी अर्पण करतो ही खरोखरीच निंदनीय बाब आहे.     
रोज वर्तमानपत्रातून अशा कितीतरी बातम्या आपल्या दृष्टीस पडत असतात. काविळीवर योग्य ती वैद्यकीय उपाययोजना न करता मंत्रतंत्राचा अवलंब केल्याने सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू किंवा तुला लवकरच अपत्यप्राप्ती होईल असे सांगून एखाद्या बाबाने स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवून तिची फसवणूक केली. या बातम्यांतून कुणीच कसलाही बोध घेत नाही ही अनाकलनीय गोष्ट आहे. देवाला किंवा देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी बालकाचा किंवा कुमारिकेचा बळी देणे किंवा मुक्या जनावराचा बळी देणे अजूनही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र, गंडेदोरे, ताईत हे उपाय केल्यानंतर खरोखरीच जर माणसांचे सर्व प्रश्न सुटले असते तर वैद्यकशास्त्र अस्तित्वातच आलं नसतं, मानसोपचार तज्ञांची गरज भासली नसली, शालेय शिक्षण रद्दबातल झालं असतं.          
अठरा वर्षे अनेक राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवून डॉ. दाभोलकरांना जादूटोणाविरोधी विधेयक संमत करून घेण्यात अपयश आलं ही सगळ्या भारतवासियांसाठी खाली मान घालायला लावणारी बाब नाही का? कुणाकुणाचे हितसंबंध, राजकीय स्वार्थ यात गुंतले असल्या कारणाने हे विधेयक राजकीय पटावरून पुढे सरकवले जाण्यास असमर्थ ठरले आहे. अनेक चर्चा, वाद-वितंडवाद होऊनही या विधेयकाभोवती अनेक अंधश्रद्धांचा जीवघेणा विळखा पडलेला आहे. हवेतून उदी काढणे, ताईत काढणे किंवा अनेक वस्तू काढणे ही निव्वळ हातचलाखी आहे , या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक दृष्टीकोन नाही हे सप्रमाण सिध्द करून दाखवले गेले तरीही या भस्म-विभूती-मंतरलेले धागे मानवी मनाचा कब्जा सोडत नाहीत हे पाहून लाज वाटते.   
आज अशा अनेक बुवा-बाबांनी जादूच्या, हातचलाखीच्या बळावर जनमानसातील त्यांचं स्थान पक्कं केलं आहे. अध्यात्म्याच फक्त आवरण आहे पण आत मात्र सैतानाचा वावर आहे. तरुण मुली, स्त्रिया या अशा बाबांना सहज फशी पडतात, त्यांच्या अज्ञानाचा, निरागसतेचा फायदा ही मंडळी उठवतात. अनेक पुरुषही या बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. या बुवा-बाबां मध्येही श्रेण्या असतात. त्याप्रमाणे त्यांना शिष्यगण मिळतात, देणग्या मिळतात, त्यांची पब्लिसिटी होत राहते, हे महागड्या गाड्या, विमानांतून प्रवास करतात, गुबगुबीत मलमलचे गालिचे यांच्या पायांखाली अंथरले जातात,  अत्यंत महाग भेटवस्तू या बाबांना भक्तगणांकडून अर्पण केल्या जातात. चार-दोन प्रभावी प्रवचने ठोकली की यांच्या कार्याचा सर्वत्र उदोउदो होतो.                .     
आज डॉ. दाभोलकरांचे चाहते आणि वारसदार सर्वदूर पसरलेले आहेत, त्यांची शिकवण, त्यांचे विचार , त्यांचे संघटना कौशल्य आज समाजात रुजवण्याची नितांत गरज आहे. अंधश्रद्धेची पुटे समाजमनावरून कायमची पुसू पाहणाऱ्या आणि त्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या डॉ. दाभोलकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी हा पुरोगामित्वाचा लढा आज मोठ्या संख्येने पुढे नेण्याची गरज आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनीच या लढ्यात सहभागी व्हायला हवे तरच समाज-परिवर्तनाची आशा बाळगता येईल. सत्तेवरील आणि सत्तेच्या विरोधात बसलेल्या सर्व घटकांनी आपापले वैयक्तिक मतभेद बाजूला सारून या परिवर्तनाची कास धरली पाहिजे नाहीतर ही अंधश्रद्धेची काळरात्र  कधीच संपणार नाही आणि मानवाच्या सर्वकष प्रगतीला खीळ बसल्याशिवाय राहणार नाही.     

No comments:

Post a Comment