Tuesday 25 June 2013

प्रेम, आकर्षण, लग्न वगैरे वगैरे…………


सध्या मद्रास हायकोर्टाने दिलेला स्त्री-पुरुष संबंधा विषयीचा निकाल वेगवेगळ्या कारणास्तव गाजतो आहे. अनेक रोमीओंचे धाबे यामुळे दणाणले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात प्रेम, लैंगिक आकर्षण आणि कायदेशीर विवाह या संबंधीच्या कल्पना खूपशा वैयक्तिक असतात. पुरोगामी, प्रतिगामी असे वेगवेगळ्या  विचार प्रवाहांचे गट अत्यंत निरनिराळी मते समाजात मांडताना दिसतात. पण या सगळ्याचा उहापोह न करता एक पुरोगामी विचाराची स्त्री म्हणून मला काही मते मांडावीशी वाटतात.      
सर्वसामान्य स्त्रीची प्रेमाची व्याख्या ही पुरुषाच्या प्रेमाच्या व्याख्येपेक्षा निश्चित वेगळी असते. आपण ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करतो त्याने आपल्याशी लग्न करावं, आपल्याला आधार द्यावा, आपलं रक्षण करावं, आपल्या मुलांना पित्याचं प्रेम द्यावं, आपला संसार सुखाचा करावा अशा भावना मनाशी बाळगून स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करू पाहते. पण पुरुषांचा प्रेम या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन असा असतोच असे नाही. त्यांच्या मनातील स्त्री विषयक लैगिक आकर्षण आधी जागं होतं आणि कालांतराने प्रेमभावना जागी होते पण ती प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असेही नाही. पुरुषाला सर्वस्व अर्पण करणारी स्त्री त्याच्याशी संसार करण्याच्या इराद्यानेच पुढे जात असते तथापि एखाद्या स्त्रीशी शारीरिक दृष्ट्या समरस होणारा पुरुष तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशानेच जवळ येतो असे नाही. लग्न हा केवळ सामाजिक उपचार असतो. मंगळसूत्र, अंगठ्या, कायदेशीर विवाह नोंदणी ही स्त्री-पुरुष  संबंधांना मिळालेली समाजमान्यता असते एवढाच याचा अर्थ आहे. लग्ने जमतात, जमवली जातात पण प्रेम जमवून, ठरवून करता येत नसते. आपल्याकडे विवाह हा एक 'स्टेटस सिम्बॉल' मानला जातो. समारंभांना नवरा-बायकोने जोडीने जाणे ही गोष्ट प्रतिष्ठेची 
मानली जाते. मग अशा नवरा-बायकोत प्रेमाचा अंश असो वा नसो, रूढार्थाने असे पती-पत्नीचे लेबल लावून त्यांना समाजात मानाने फिरता येऊ शकते.  लौकिकार्थाने 'आदर्श' संसार करता येऊ शकतो आणि मुलेबाळे सुद्धा प्रसवता येऊ शकतात.    
प्रश्न असतो तो परस्परांमधील नात्याचा, संबंधांचा! निसर्गनियमानुसार लैंगिक आकर्षण आणि त्यानंतर सहवासाने निर्माण होणारं प्रेम जर दोघांत रुजलच नाही तर संसार हा केवळ एक बाह्य उपचार ठरतो. ना अशी स्त्री कधी सुखी राहू शकत ना पुरुष! आजमितीला अशी अनेक जोडपी असे उपचार पार पडताना आढळतात. संसाराचे रहाटगाडगे, संसाराचा गाडा अशी शुष्क संबोधने वापरून हे उभयता दिवस रेटत राहतात. स्त्रिया अकाली पोक्त दिसू लागतात. यांच्या पुरुषांची नजर इतरत्र वेध घेत फिरू लागते. दोघांतील दुही वाढू लागते. आपण लग्न का केलं हा विचार अंतरबाह्य पोखरू लागतो  आणि लग्न या संकल्पनेवर आपण उपहासाने हसू पाहतो.       
स्त्रीने पुरुषाचा संसार करायचा, त्याच्यापासून होणारी मुले मोठी करायची , घरची चूल सांभाळायची आणि पुरुषाने स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची, कुटुंबाचा आर्थिक भार उचलायचा आणि आपला वरचष्मा कुटुंबावर आणि पर्यायाने स्त्रीवर प्रस्थापित करायचा हे दिवस आता सरले आहेत. आज स्त्री शिक्षित आहे, कमावती आहे, स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा सांभाळ करण्या इतपत सक्षम आहे. तिलाही वर हवा आहे पण इच्छित ! कुणाच्याही गळ्यात वरमाला घालून त्याला जन्मभरासाठी आपला पती म्हणून स्वीकारणारी स्त्री एकतर ग्राम्य, विचारांनी मागासलेली अथवा आर्थिक दृष्ट्या परावलंबी तरी असावी,          
प्रेम हे एक अजब रसायन आहे. प्रेमासाठी जीव घेतले जातात तसेच दिलेही जातात. पण या धकाधकीच्या आणि संपूर्णपणे अस्थिर आणि क्षणभंगुर आयुष्यात हिरवळ फुलवण्याचे सामर्थ्य निव्वळ प्रेमभावनेत आहे. जो तुम्हा-आम्हा सर्वांचा हक्क आहे. लैंगिक आकर्षण ही वयानुसार कमी होत जाणारी बाब आहे तर प्रेमभावना ही चिरंतन टिकणारी अशी गोष्ट आहे.   
यापुढे प्रत्येक स्त्रीने सर्वार्थाने इतके सक्षम व्हावे की तिला स्वत:ला हवे तसे जगता येईल, आपल्या प्रेमासाठी लायक असलेल्या माणसाशी लग्न करता येईल आणि जिथे प्रेमाखेरीज आदर या भावनेचीही सम विभागणी होईल. जिथे केवळ तिच्या शरीरावर नाही तर तिच्या विचारांवर प्रेम करणारा, तिच्या मतांचा यथायोग्य आदर करणारा सहचर तिला लाभेल. त्यामुळे केवळ लैंगिक आकर्षणावर टिकलेला लग्न नामक उपचार मोडीत निघाल्यावर पोटगी मागण्याची वेळ तिच्यावर येणार नाही. त्याच्या आधाराशिवाय स्वत:च्या पोटात वाढणारे बाळ तिला या जगात येऊ देता येईल किंवा लग्न या सामाजिक उपचारापर्यंत न जाता ही तिची प्रेमभावना अबाधित ठेवता येईल.                    

No comments:

Post a Comment