Wednesday 20 February 2013

स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली ज्ञानाची संकल्पना



स्वामीजींना अभिप्रेत असलेले ज्ञान हे पुस्तकाच्या मर्यादित पानांत बंदिस्त नसून माणसाच्या मनातील कोशात उपजत:च साठलेले आहे. त्यांच्या मते कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाचा उगम हा मनाच्या अंतर्गर्भात असतो किंबहुना ज्ञानाची उपलब्धी बाहेरून कधीच होत नाही. माणूस नवीन काही शिकतो म्हणजेच त्याच्या आत्म्यावरील अज्ञानाचे एक पटल तो दूर करतो. एक अमर्यादित स्वरूपाचा असा विश्वकोश माणसाच्या मनात सामावलेला असतो. माणूस ज्ञानापासून वंचित राहतो कारण स्वत:तील ज्ञानाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो. 
सर्व प्रकारच्या शक्ती आणि सर्व प्रकारचे ज्ञान मनुष्याच्या आत वसलेले असते. बाह्यसूचना आणि अंतर्गत ज्ञान यांचा मिलाप होतो आणि चिरंतन ज्ञानाचा आविष्कार होतो जो विश्वव्यापी असतो. बाह्य जगतातील गुरु अंतर्जगतातील गुरूला एक सूचना करतो आणि त्या सूचना आत जतन केलेले ज्ञानाचे समृद्ध भांडार जगापुढे रिते करतात. स्वामीजी उदाहरणादाखल म्हणतात, ज्याप्रमाणे एक आकाराने प्रचंड असलेले आणि अनेक एकर जमीन व्यापणारे वडाचे झाड एका छोट्या बी मध्ये लपलेले असते त्याप्रमाणे मानवी बुद्धीचा प्रचंड आवाका एका पेशीत साठलेला असतो. 
ज्ञानाची कुठलीही शाखा उपशाखा असो, कोणताही मार्ग असो अंतिमत: त्याचा उद्देश माणूस घडवण्याकडे असला पाहिजे. बाहेरून चकचकीत दिसणारी पण आतून काजळी धरलेली वस्तू काय कामाची? प्रत्येक शिक्षणाचा आद्य आणि अंतिम उद्देश हा माणसातील मानवता वर्धिष्णू होण्याकडे असला पाहिजे. मानवाची आत्मिक उन्नती त्यातून साध्य झाली पाहिजे. एक उत्तम व्यक्तित्व घडवण्यासाठी अणुरेणुंचे नेमके काय रसायन लागते ते भौतिकशास्त्राच्या वा रसायनशास्त्राच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकते काय? तत्ववेत्ते आणि संतपुरुष यांत हाच फरक आहे. तत्ववेत्ते त्यांच्या विद्वत्तापूर्ण बोलण्याने  मानवजातीवर प्रभाव टाकतात पण संत त्यांच्या ओजस्वी वाणीतून मानवातील संवेदना जागवण्याची किमया करतात.  
जे ज्ञान इतरांच्या पायाखालच्या वाटा प्रकाशमय करते त्या ज्ञानाचा मूलस्त्रोत हा माणसाच्या मनातच अव्यक्त स्वरुपात असतो. माणूस कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असो, त्याच्या व्यक्तिमत्वाला सशक्त, सक्षम करणारी असाधारण गोष्ट त्याच्यापाशीच असते. माणसातला माणूस जागवणारा धर्म आपल्याला हवा आहे, उत्तम मानवाला जन्म देणाऱ्या 'थिअरिज' आपल्याला हव्या आहेत, शिक्षणाने सर्वकष समृद्ध झालेला माणूस आपल्याला हवा आहे. पुस्तकी शिक्षणाने साक्षर होता येते, शैक्षणिक कक्षा रुंदावतात हे खरे पण आत्मोन्नती साधता येतेच असे नाही. स्वामीजी म्हणतात, अगदी मुंगीसारख्या  क्षुद्र कीटकापासून ते मानवापर्यंत आत्मा हा एकाच असतो फक्त त्याची आविष्कृती, अभिव्यक्ती निरनिराळी असते.  
प्रामाणिकपणे विश्वजागृती करण्यासाठी झटणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच असतात. वेद, उपनिषदे, गीता पठण करणारे अनेक असतात पण स्वत:च्या वर्तनात रुजवणारे अभावानेच आढळतात. स्वत:च्या देशाचा इतिहास सहजपणे विसरणारी माणसे कोणते गौरवास्पद कार्य करू शकणार बरे? माणूस पुस्तकी शिक्षण घेतो आणि श्रद्धा, उपासना, भक्ती या मानव वंशाच्या मुळाशी असलेल्या तत्वांना दाराच्या उंबरठ्यातच उभे करतो. अनेक युगांचा वारसा लाभलेल्या संस्कृतीवर शिक्षणाचा नांगर फिरवून स्वत:ची पाठ थोपटून घेतो. 
स्वामीजी म्हणतात, हे तरुणांनो जागे व्हा, आपल्या आत्मिक तेजोबलाने आपल्या अवतीभवतीचा परिसर तेजोमय, ज्ञानमय करा. आपल्या शारीरिक क्षमतांना बुद्धीनामक ज्योतीने प्रज्वलित करा. समस्त मानववंशाचा उद्धार करा. धर्माच्या,नीतीच्या, जातीपातीच्या, उच्च-निचतेच्या चुकीच्या कल्पनांचे अवडंबर माजवून मानवजातीच्या जन्माचे उद्दिष्ट असफल करू नका. अंतर्यामीच्या उज्ज्वल प्रेरणांनी आकाशाला गवसणी घाला. धीट व्हा, सावध व्हा, जागृत व्हा, कृती करा, आपल्या डोळ्यांवरील मायेचे पटल  दूर सारून अंतर्ब्रम्हाचे दर्शन घ्या. 

No comments:

Post a Comment